सोडा हा अतिपर्यटनाचा हव्यास, मोकळा करा निसर्गाचा श्वास, शोधाना आपल्या जवळच कास

Kaas Pathaar

सोडा हा अतिपर्यटनाचा हव्यास, मोकळा करा निसर्गाचा श्वास, शोधाना आपल्या जवळच कास .

१९९० च्या दशकातील गोष्ट आहे.  तेंव्हा पुणे-सातारा हमरस्ता हा दोन पदरी होता.  ठोसेघर चाळकेवाडी परिसरात पवनचक्यांचा पत्ता नव्हता  आणि साताऱ्याहून बामणोली ला  दिवसातून १/२ च बस जायच्या ..  बाकी एखाद दुसरी दुचाकी.. त्यातुन  जाणाऱ्या वाटसरूंना खिडकीतून बऱ्याचदा रंगीबेरंगी फुले दिसायची .  पण ती नित्याचीच असल्याने कोणी तिकडे मान वाकडी करून पाहायचे नाही !

जागतिकीकरणाच्या हवेबरोबर , चाळकेवाडीच्या पठारावर पवनचक्क्या  फिरू लागल्या ..  थोडेफार रस्ते झाले आणि  मग पवनचक्क्याबरोबर ठोसेघर सर्वत्र प्रसिद्ध झाले.  पुणे-सातारा रस्ता चार पदरी झाला आणि त्याचसुमारास बऱ्याच लोकांच्या दारी पण चार चाकी वाहन येऊ लागले.. आणि मग पावसाळ्यात ठोसेघर-सज्जनगड-कास-बामणोली  अशा पर्यटकांच्या तीर्थयात्रा सुरु झाल्या. कास चा काच तलाव झाला.  आणि ह्या सर्व स्थित्यंतरात , काय अवस्था झाली कास-ठोसेघर-बामणोली च्या निसर्गाची ?  त्याचीच ही  काहीशी संक्षिप्त कथा. मुख्यतः कास पठाराबद्दलची.

सुरवातीला काही दुचाकीवर येणारे लोक दिसू झाले. येणारे फुले जवळून पाहायचे.  कुंपण, मार्गदर्शक असला प्रकार नव्हता .  मोबाईल आणि त्याला जोडून कॅमेराही  नव्हता. त्यामुळे आलेले लोक काही वेळात बघून निघूनही जायचे.  काही  जण फुले तोडून घ्यायचे. काही जण ती रोपे पण उपटून घरी घेऊन जायचे. बागेत लावायला !!  काही जण फुलात लोळायचे , पळायचे.  काही जण  तो मातीचा हलकासा थर  खरडून न्यायचे.   सांगून काहीही  उपयोग नव्हता ! येणारे लोक पण तुलनेने कमी होते त्यामुळे नुकसान पण कमी व्हायचे.

बऱ्याचदा पाठरावरच्या  दूरच्या कोणत्या कोपऱ्यात काही संशोधक पण दिसायचे. ते सर्वाना कळवळून सांगायचे की  हा वारसा आपल्याला शक्यतोवर जपायचा आहे.  त्यामुळे जेव्हढी जमेल  तेव्हढी काळजी घ्या आणि जेव्हढी कमी शक्य आहे तेव्हढीच   प्रसिद्धी करा. त्यांना जणू काही पुढील भविष्य माहीत होते.

त्यातीलच कुणीतरी सांगितलेले आठवतेय. “सर्व सह्यद्रीच अशा विविधतेने आणि फुलांनी नटलेला आहे.  तो फक्त अशा काही थोडक्या दिवसात भरभर बघायचा नाही, तर वर्षभर शांतपणे अनुभवायचा आहे.  काही दशकापूर्वी पाचगणी च्या पठारावर पण अशीच फुले दिसायची पण अतिपर्यटनाने ती नाहीशी झाली . “

गंमत म्हणजे  करोना बंदीच्या काळानंतर मला पाचगणीच्या पठारावर काससारखी काही रानफुले दिसली होती. निसर्गाला तुम्ही थोडी जागा आणि  बहरायला वेळ द्या, तो (गाजावाजा न करता )परत येईलच  🙂

सातारा ते कास हा रस्ता मस्त घाटांचा , दोन्ही बाजूला हिरवळीचा, फुलांचा होता. बामणोली पर्यत एकही  हॉटेल नव्हते. होत्या फक्त एक दोन चहाच्या टपऱ्या.  एक पेट्रीला आणि दुसरी यवतेश्वर जवळ.  बाकी सगळी निसर्सगाची मुक्त उधळण. प्राणी-पक्षी याना मुक्त संचार. वाहनांचा आणि लोकांचा संचार अतिशय मर्यादित.

काळ असाच पुढे २० वर्षे पुढे सरकला. आता सर्वांच्या हातात कॅमेरा , जवळ भरपूर पैसा आणि गाड्या.    आणि हे सर्व सौंदर्य अनुभवायला नाही तर ते

 विविध करामती करत समाजमाध्यमांवर टाकायला असणारा उत्साह..   सगळेच भरपूर.

पूर्वी पुणे-सातारा अंतर कापयला तीन तास लागायचे. आणि सातारा कास ला २० मिनिटे. 

 आता पण सुट्टी च्या दिवशी सातारा पोहोचायला लागतात अडीच/तीन  तास आणि कास ला पोहोचायला कधी अर्धा तास तर कधी २ तास पण. पूर्वी निवांत असणारा सातारा कास रस्ता आता अखंड वाहता असतो. रस्त्याच्या दुतर्फा दिसतात  असंख्य रिसॉर्ट्स आणि लोकांना ह्या निसर्गात राहायला/बांधायला  बोलावणारी सिमेंटची आमंत्रणे ..

का करायचा हा अट्टाहास ? कासच का ? महाराष्ट्राच्या वाट्याला जवळपास ५०० किलोमीटर लांबीचा सह्याद्री मिळालेला  असताना, का करायची गर्दी ह्या साधारण ५/१० किमी लांबीच्या पट्ट्यात ?  सह्यकड्यावर अशी पठारे सर्वत्र आहेत. लाव्हारस थंड  होऊन झालेली पठारे  आणि त्या दगडाच्या वरच्या थराची  झीज होऊन झालेला हा मातीचा थर  आणि त्यावर वेगवेगळ्या ऋतूत उमलणारी रानफुले. हे दृश्य सर्वत्रच आहे.   त्यासाठी एव्हढ्या दूरवर , एव्हढा प्रवास करून , वेळ  इंधनाचा अपव्यय करून, तेथील आधीच नाजूक परिस्थितीत असलेल्या निसर्गाचा  ऱ्हास  का करायचा ?  कदाचित इतर पठारावर एव्हढी विविधता नसेल, एव्हढ्या संख्येने फुले येत नसतील. पण मग अशी गर्दी करून  आपण कास ची अवस्था पण मागे म्हणाल्या प्रमाणे पाचगणी च्या पठारा सारखी  होऊ द्यायची का?

कासच नाही, तर पावसाळ्याच्या सुरुवातीला मुळशी,  हिवाळ्यात भिगवण , दिवाळीत कोकणकिनारे.. आपण सर्वदूरपणे  वेळोवेळी गर्दी करून  तेथील निसर्गावर असाच  कधीही  न पुसता येणारा ठसा सोडून जात आहोत ..

पुण्याजवळ किती तरी टेकड्या आहेत. सुदैवाने बऱ्याच टेकड्यावर अजूनही विविधता टिकून आहे. बर्याच संस्था ह्या टेकड्यावर विविधता आणायचा प्रयत्न करत आहेत.  वर्षातून एकदा कास/मुळशी/भिगवण -वारी  करून  निसर्गाचा बूस्टर डोस  घेण्यापेक्षा, घेऊ शकतो ना आपण त्याचा मंद आस्वाद.  अशा संस्था बरोबर काम करून आपण बोलवू शकतो कासलाच आपल्या नजीक. आणि  अगदी पूर्ण वर्षभरासाठी …

आपल्या जवळच्या टेकडीवर सकाळच्या वेळी एक निवांत फेरी मारली. कोणत्या झाडाला नवी पालवी आली आहे, कोणत्या झाडाला नवीन कळ्या फुलताहेत, काही झाडांची ऋतूनुसार पाने सुकताहेत. काही झाडात पक्षी घरट्याची लगबग करताहेत.  अशी कितीतरी दृश्ये आपल्याला  निवांत पाने आपल्या डोळ्यात साठवता येतील.  सकाळचा मंद वारा आणि त्याबरोबर  दरीतून येणारा  पानं-फुलाचा मंद सुवास आणि पक्षांचा किलबिलाट,  आपल्याला कासच्या  गर्दीत कधी मिळणार आहे ?

आपल्या आवडत्या झाडाजवळ बसून त्याची पाने /फुले हळुवार पणे हाताळताना, त्याची वैशिष्ट्ये निरखून बघताना , त्या झाडाची काळजी घेताना, वेळ कसा निघून जातो कळणार पण नाही.   इथे कुणी तुम्हाला हटकणार पण नाही किंवा तुमच्या मागे रांग लावून थांबणार नाही  किंवा आमचा एक फोटो काढा असे म्हणणार पण नाही.  जमलेच तर एखादी छोटी नोंदवही पण आपण घेऊन जावू  शकतो आणि सभोवतालचे बदल टिपून घेऊ शकतो. ते बदल त्या  झाडाजवळच्या माती बद्दल असतील, किंवा झाडाच्या पानाफुलांबद्दल असतील, झाडाजवळ दिसणाऱ्या पक्षांबद्दल असतील किंवा मग त्या झाडाजवळ पाठ टेकवून पडल्यावर दिसणाऱ्या आकाशाबद्दल  असतील ..  पण ते सर्व तुमचे स्वतःचे, काही खास आणि युनिक अनुभव असतील..

सर्वात महत्त्वाचे, हे सर्व निसर्गसंस्कार आपण आपल्या पुढील पिढीवर जाणीवपूर्वक करायला हवेत. पाऊस म्हणजे फक्त धबधब्यात दाटीवाटीने उभे राहून फोटो काढणे किंवा कांदाभजी खाणे , किंवा  रिसॉर्टवर जाऊन रेनडान्स करणे नव्हे, तर पाऊस म्हणजे, पहाटे उठून पावशाची आर्त  हाक ऐकणे, आपल्या जवळचे निर्झर, ओढे  जवळून पाहणे, त्या भोवती वाढणारी नवीन रोपटी, सूक्ष्म जीव ओळखणे  हे पण आहे.   हे नवीन पिढीला अशा जवळपासच्या ठिकाणी नेवून  निसर्गातील असे बदल दाखविणे महत्त्वाचे आहे.  श्रावणातील सणाबरोबर,  त्यांना त्या सणाशी निगडीत पाने-फुले ओळखता आली पाहिजेत.  एखाद्या शांत जागी जाऊन ओढ्याची खळखळ , त्यातील  एका  डबक्यात  चक्रे उमटवणारी  निवळी, किंवा टपकन उडी मारणारा  बेडूक  कधीतरी अनुभवाला पाहिजे.

निसर्ग म्हणजे घाईघाईत जाऊन काही लुबाडणे नव्हे तर शांत पण वारंवार जाऊन हळुवार पणे अनुभवणे  आहे .  ती एक कधीतरी घडणारी घटना नाही तर दिनक्रमाचा भाग आहे, हे आपण नवीन पिढीला पटवू शकलो. तर कास चा  मूल्यवान वारसा आणि निसर्गस्नेही जगण्याचा  आपली भारतीय परंपरा चिरंतर टिकून राहील.  मागच्या हजारो पिढ्यानी हा निसर्ग  आणि वारसा सांभाळला आहे. आपण तो आपल्या प्रगल्भ, सक्रिय आणि निसर्गानुकूल वागण्याने टिकवला/वाढविला पाहिजे.  मग नक्कीच, कास भ-‘कास ‘ होणार नाही तर त्याचा आणि आपला खऱ्या अर्थाने वि -‘कास’ होईल.

4

शरद ऋतूमधील आहार-विहार

शरद ऋतूमध्ये सूर्याच्या प्रखरतेमुळे बाह्य वातावरणातील उष्णता वाढते.याचा अतिशय अनुकूल परिणाम होतो, तो आपल्या पचनशक्तीवर ! पावसाळ्यात कमी झालेली पचनशक्ती या काळात वाढायला सुरुवात होते. साहजिकच त्यामुळे अन्नाचे चांगले पचन होऊन शरीराची ताकद वाढण्यास हातभार लागतो. याच काळात सूर्याचे दक्षिणायन म्हणजेच सूर्य उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धात जाण्यास सुरुवात होते. याचाही उपयोग शरीराची ताकद वाढण्यास निसर्गत:च होत असतो. एकूणच शरीराला व पचनशक्तीला बल देणारा हा ऋतू आहे, असे म्हणता येईल.

या सर्वच दृष्टीने भात, ज्वारी, गहू यांचा आहारात उपयोग करायला हवा. मुगाचे सगळे पदार्थ म्हणजेच मुगाचे वरण, मुगाची खिचडी, मुगाचे लाडू या ऋतूमध्ये हितकर असतात. मटकी, मटार यांचाही आहारात समावेश असावा. हरभरा हा सुद्धा पित्त कमी करणारा उत्कृष्ट पदार्थ. यासाठीच हरभऱ्याची डाळ खाण्यात असावी. हरभऱ्याची डाळ, गहू आणि गूळ यांपासून तयार केली जाणारी ‘पुरणपोळी’ पक्वान्न म्हणून या ऋतूत अतिशय योग्य असते. पुरणपोळीबरोबर दूध, साजूक तूप मुक्तहस्ते उपयोग करावा. अशा प्रकारे पुरणाची पोळी घेतल्याने पित्त कमी होतेच, शिवाय ती गोड असल्याने शरीराची ताकदही वाढते. नवरात्रीला देवीच्या नैवेद्यासाठी ‘पुरणपोळी’च केली जाते ती यासाठीच. अर्थात सगळेच गोड पदार्थ पित्त कमी करणारे, शरीराची ताकद वाढवणारे असल्यामुळे अशा इतर पदार्थांचाही उपयोग जरूर करावा.

गोड पदार्थांप्रमाणेच कडू, तुरट चवीचे पदार्थही पित्त कमी करतात. म्हणूनच कार्ल्याची भाजी, कढीलिंब, हळद, कवठ यांसारखे पदार्थही आहारात असावेत. पिकलेली व गोड अशी चिक्कू, केळी, सफरचंद, संत्री, मोसंबी यांसारखी फळेही या ऋतूत उपयुक्त आहेत. आंबट चवीचे पदार्थ पित्त वाढवतात. म्हणून यांचा उपयोग टाळावा. अर्थात याला अपवाद आहे, लिंबू, आमसूल यांचा. लिंबाचा रस, लिंबू सरबत यांचा भरपूर उपयोग करण्यास हरकत नाही. आवळा हासुद्धा आंबट असला, तरी पित्तशामक म्हणून उत्कृष्ट काम करतो. याचसाठी आवळ्याचे चूर्ण, आवळा सरबत घ्यावे. आवळ्यामध्ये साखर घालून तयार केला जाणारा ‘मोरावळा’ जरूर घ्यावा. मोरावळ्याप्रमाणेच गुलकंद हा देखील या ऋतूत हितावह आहे. या हीटच्या काळात दूध, साजूक तूप याप्रमाणेच गोड, ताजे ताक, लोणी यांचाही अवश्य उपयोग करावा.

तिखट पदार्थ पित्त लगेच वाढवतात. म्हणूनच हिरवी मिरची, गरम मसाला यांसारखे पदार्थ कमी वापरावेत. मिरे, हिंग, तळलेले पदार्थही जपून सेवन करावेत. सगळेच मसाल्याचे पदार्थ या काळात काळजीपूर्वक घ्यावेत. पावसाळ्यात अत्यंत उपयुक्त असणारा लसूण या ऋतूत अल्पच वापरावा. म्हणून मिरे, लसूण अशा पदार्थांऐवजी धने, जिरे, कढिलिंब, कोथिंबीर हे पदार्थ वापरावेत. कारण हे पदार्थ अन्नाला चव आणतात व पित्तही कमी करतात. या काळात ब्रेड, इडली, ढोकळा, डोसा असे आंबवलेले पदार्थही शक्यतो टाळावेत. त्याचप्रमाणे शिळे पदार्थ, दही यांचाही वापर टाळायला हवा. पित्त वाढू नये म्हणून लोणचेसुद्धा कमी प्रमाणात घ्यावे. वापरायचे झाल्यास कैरीच्या लोणच्यापेक्षा लिंबाचे लोणचे किंवा ओली हळद व लिंबू यांपासून बनवलेले लोणचे वापरणे चांगले. स्वयंपाकात करडई तेल वापरू नये. कारण ते अतिशय पित्त वाढवणारे आहे.

अन्न सेवन करताना खूप गरम असू नये. तसेच जेवताना नेहमी दोन घास कमी खावेत. दोन घास कमी खाल्ल्याने पचनशक्तीवर फार ताण येत नाही. पिण्याचे पाणी वाळा घालून गार करून प्यावे. दिवसभरचा उकाडा कमी करण्यासाठी पंखे, एअरकंडिशन यांचा उपयोग करावा. नागरमोथा, कचोरा, चंदन, उशीर अशा शीतल औषधांचा लेप शरीरावर करणे उपयुक्त ठरते. उकाडा कमी करण्यासाठी पोहण्याचा व्यायाम योग्य असतो. आंघोळीसाठी देखील गार पाणी वापरावे. उन्हाचा त्रास कमी व्हावा म्हणून सुती, रेशमी व सैलसर कपड्यांचा उपयोग करावा.

रात्रीच्या मनोहारी चांदण्याचा या ऋतूत भरपूर आनंद घ्यावा. अशा प्रकारे आहार-विहार ठेवला, तर ऑक्टोबर हीटचा फारसा त्रास होत नाही. त्यामुळे शरीर व मन दोन्ही तंदुरुस्त राहतात. आगामी दिवाळीच्या स्वागतासाठी !

डॉ . मयुरेश आगटे

3

श्रावणातील पूजा आणि आयुर्वेद

Shravan Pooja

श्रावणामधील व्रतवैकल्यांमागे असणारी शास्त्रीय भूमिका आपण पाहात होतो. श्रावणात येणारे असंख्य उपवास, मांसाहारवर्ण्यता हे विषय आपण पाहिले होते. श्रावण महिन्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इतर कोणत्याही महिन्यात न आढळणाऱ्या मंगळागौरी, सत्यनारायण, जीवती अशा विविध पूजा. १२ महिने उपलब्ध असताना एका श्रावणातच पूजांची गर्दी करण्याची गरज आपल्या परंपरेला का वाटत असेल ? या पूजांमागे पौराणिक कथा सांगितल्या जातात. त्यात तथ्य असेलही कदाचित ! पण आपण २१व्या शतकात वावरताना पौराणिक कथांपेक्षा त्यामागे काही शास्त्रीय, तर्कसंगत दृष्टिकोन असू शकेल का, असा विचार माझ्या मनात येतो. नीट विचार केल्यावर या प्रश्नाचे उत्तर सापडले ते आयुर्वेदोक्त वर्षाऋतुचर्येत !

मागील भेटीत मी ‘दुर्दिन’ असा शब्दप्रयोग केला होता. पावसाळ्यात अनेकदा बाहेर धुवाँधार पाऊस असतो. बाहेरचे वातावरण ढगाळ कुंद असते. अशा वातावरणात एक प्रकारचा निरुत्साह जाणवतो. घराबाहेर पडावेसेच वाटत नाही. अशा दिवसांना ‘दुर्दिन’ असे नाव ग्रंथकारांनी दिले. असा ‘दुर्दिन’ असताना कोणतेही काम करू नये. अगदी अभ्यासही टाळावा असा सल्लाही दिला आणि असा दुर्दिनांचा अतिशय सुरेख उपयोग आपल्या परंपरेने करून घेतला तो विविध पूजांच्या माध्यमातून ! एरवी प्रत्येक मनुष्य आपापल्या कामधंद्यात व्यस्त असतो. त्या व्यापात त्याला देवधर्माला-परमार्थाला वेळ देता येईलच असे नाही. पण श्रावणातील बाहेरच्या वातावरणामुळे त्याला घराबाहेर जावेसेच वाटत नाही. हा अनायसा मिळणारा रिकामा वेळ खऱ्या अर्थाने सत्कारणी लागावा, म्हणून इतक्या विविध पूजांची वर्णी श्रावणात लागली असावी.

            वर्षाऋतुचर्या आणि श्रावणातील पूजा यांच्यात दिसून आलेला सहज संबंध तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न केला आहे. या पूजांचेसुद्धा एक वैशिष्ट्य आहे. इतर सणासुदींना आपण हार, फुले वापरत असतो. श्रावणातल्या पूजांमध्ये हार, फुले यांच्याइतकेच महत्त्व असते ते विविध वनस्पतींच्या पत्रींना. या पत्रींना म्हणजे पानांना खरं तर फुलांसारखा सुगंध किंवा सौंदर्य नसतानासुद्धा यांची वर्णी लागली, ती त्यांच्यातील अनेक औषधी गुणधर्मांमुळे ! पावसाळ्यात सर्दी, खोकला, थंडी-ताप, उलट्या, जुलाब, पचनशक्ती मंदावणे, जंत होणे, अम्लपित्त, दमा अशा अनेकविध रोगांची निर्मिती होत असते. दर पावसाळ्यात दिसणारे हे आजार थांबवता कसे येतील ? असा विचार सुरू झाला. यातूनच या पत्रींचा समावेश पूजांमध्ये करण्यात आला. कारण पूजेच्या निमित्ताने या पत्री आपल्या घरात आणल्या जातात आणि घरात कोणी आजारी पडले तर त्यांचा लगेच उपयोग व्हावा, हा या पत्रींमागचा खरा ‘शास्त्रीय’ उद्देश ! शिवाय नुकताच पाऊस पडल्यामुळे सर्व वनस्पती ताज्या असतात. त्यांच्यातील गुणधर्म अतिशय परिपूर्ण असतात. अर्थातच त्यामुळे त्यांचा परिणामही उत्तम दिसतो.

आपण यातील प्रमुख पत्रींविषयी माहिती घेऊ. सगळ्याच पूजांमध्ये लागणारे व श्री सत्यनारायणाला प्रिय असे तुळशीचे पान हे श्वसनसंस्थेवरील उत्तम औषध आहे. सर्दी, खोकला यात तुळशीचा रस मधाबरोबर चाटवावा. डोकेदुखीमध्ये तुळशीच्या रसाचे थेंब नाकात घालावेत. घसा खवखवत असेल तर तुळशीची पाने चघळावीत. थंडीतापात तुळशीचा रस किंवा तुळशीच्या पानांचा काढा उपयोगी ठरतो. भूक न लागणे, पोटदुखी, पोटात जंत होणे याकरताही तुळस उपयुक्त ठरते. दमेकऱ्यांची घुसमट कमी होण्यासाठी तुळशीचा रस वारंवार द्यावा. हीच सगळी कार्ये मंगळागौरीला वाहिला जाणारा आघाडाही करतो. पूजेमध्ये लागणारा पारिजातक हे थंडीतापावरचे उत्तम औषध आहे. अनेकदा पावसाळ्यात येणाऱ्या तापाचे कारण कळत नाही. असा येणारा ताप किंवा मलेरियातील ताप यात पारिजातकाच्या पानांचा काढा अतिशय उपयुक्त ठरतो.

डोरलीसारखी वनस्पती खोकला, सर्दी कमी करते. दमा कमी करण्यासाठीसुद्धा डोरलीचा उपयोग होतो. या आजारांवर उत्तम काम करणारे आणखी एक पान म्हणजे ‘धोतऱ्याचे पान. धोतऱ्याचे पाने जाळून त्यांचा धूर घेतल्यास वरील आजार कमी होतात. अपराजिता किंवा गोकर्ण ही आणखी एक उपयुक्त वनस्पती. अपराजिता वात, पित्त, कफ या तीनही दोषांचे शमन करते. कफ चांगला सुटण्यासाठी गोकर्णीच्या मुळांचा रस उपयोगी पडतो. वाढलेल्या टॉन्सिल्स कमी होण्यासाठी बिया उपयोगी पडतात. अर्धशिशीत मुळांच्या रसांचे थेंब नाकात टाकतात.

या ऋतूमध्ये पचनशक्ती मंदावलेली असते. पचनशक्ती सुधारण्यासाठी पत्रींमधला माका उपयोगी असतो. माक्याचा रस हे यकृतावरील उत्तम औषध आहे. त्यामुळे भूक न लागणे, अपचन यांसारखे विकार बरे होतात. पोटातील जंतांवर सुद्धा माका हे चांगले औषध आहे. यकृतावरील आणखी एक चांगले औषध म्हणजे बेल. बेलांच्या पानांचा काढा किंवा पानांचे चूर्ण वापरावे. बेलाचे कच्चे फळ जुलाबावरील उत्तम उपाय आहे. फळांचा मगज किंवा मुरंबा वापरावा. बेलाच्या मुळांचा काढा वर्षाऋतूत होणारा वातप्रकोप कमी करतो. दवण्यासारखी तीक्ष्णगंधी वनस्पती ताप, तापातील अंगदुखी कमी करते. सर्दी, खोकला यांवर उपयोगी पडते. त्याचप्रमाणे भूक वाढणे, जंत होणे, यकृताचे कार्य सुधारणे यांसाठीसुद्धा उपयोगी पडते.

दूर्वा, जाई, जुई यांसारख्या वनस्पती पावसाळ्यात होणारा पित्ताचा संचय कमी करण्यास उपयोगी ठरतात. शमीचे पानसुद्धा पित्तशामक असते. जुलाब थांबवण्यासाठीसुद्धा याचा उपयोग होतो. या सगळ्या वनस्पतींचे इतरही अनेक उपयोग आहेत. इथे आपण मुख्यतः पावसाळ्यातील आजारांशी निगडित उपयोग पाहिले आहेत.

प्रपंच असो वा परमार्थ ! दोन्ही साधण्यासाठी साधन असतं – आमचं निरोगी शरीर. पावसाळ्यातील विविध व्रतवैकल्यं पार पाडण्यासाठी या ऋतूमधे निर्माण होणाऱ्या आजारांपासून रक्षण होणे महत्त्वाचे असते. विविध पूजांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या वनस्पती म्हणूनच पूजेच्या निमित्ताने आमच्या घरात येतात आणि आम्हांला आरोग्यासाठी उपयोगी पडतात. मित्रांनो, वर्षाऋतुचर्या आपण पाहिली. श्रावणातील व्रतवैकल्ये व त्यांचा आयुर्वेदोक्त वर्षाऋतुचर्येशी असणारा जवळचा संबंधही आपण पाहिला. श्रावणाची ही ‘साठा उतरांची कहाणी’ इथंच संपवतो.

डॉ . मयुरेश आगटे

सूचना :- कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर या लेखात नमूद केलेली सर्व औषधे वापरा.

3

श्रावणातील व्रतवैकल्य आणि आयुर्वेद

Importance of Shravan

परवा सकाळीच फोन खणखणला. फोनवर माझ्या अगदी जवळच्या मित्राचा आवाज. खूप दिवसांत भेट नाही, म्हणून जेवणाच्या निमित्ताने भेटण्याचे आग्रहाचे आमंत्रण त्यानं मला दिलं. माझा हा मित्र मांसाहाराचा शौकिन. त्याचं त्यासाठीचं आवडतं हॉटेलही ठरलेलं. केवळ औपचारिकता म्हणूनच मी ‘त्या हॉटेलमध्ये भेटायचं ना’ असं विचारलं. मात्र, या वेळी मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्यानं चक्क शुद्ध शाकाहारी हॉटेलचा पत्ता देऊन तिथं भेटायला बोलावलं. आम्ही प्रत्यक्ष भेटेपर्यंत मी या आश्चर्याच्या धक्क्यातच वावरत होतो. म्हणूनच ठरलेल्या वेळी भेटल्यावर मी आधी या ‘शुद्ध शाकाहारी’ प्रकाराबद्दल विचारणा केली, ‘अरे का रे, तुझी तब्येत ठीक आहे ना ! चक्क तू आणि ‘व्हेज’ हॉटेलमध्ये !’ त्यावर कानावर हात ठेवत ‘विनयपूर्वक’ उत्तर त्यानं दिलं. ‘मित्रा, ‘श्रावण’ सुरू आहे. आपण श्रावण कडक पाळतो. मांसाहार खाणं सोड, पण श्रावणात त्याचं नाव पण घेत नाही.’

‘पण खाल्लं तर बिघडलं कुठं ? श्रावणात नॉन-व्हेज खाऊ नये, असा कुठे कायदा आहे ? इतर सगळ्या महिन्यात पोटभर ताव मारतोस, मग बिचाऱ्या श्रावणाने काय घोडं मारलं. श्रावणात नॉन-व्हेज खाल्ल्यामुळं पाप लागतं आणि एरवी खाल्ल्यामुळं पुण्य वाढतं का ?’ माझ्या या एकामागोमाग एक विचारलेल्या प्रश्नांमुळे माझा मित्र निरुत्तर झाला होताच. पण त्याच्या चेहऱ्यावर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं कुतूहल मात्र स्पष्ट दिसत होतं. सुदैवानं मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं माझ्याजवळ तयार होती. कारण यांची उत्तरं दडली होती आयुर्वेदोक्त वर्षाऋतुचर्येमध्ये !

गेल्या लेखात पावसाळ्यात असलेल्या शारीरिक स्थितीचा आपण आढावा घेतला. त्यात ‘पचनशक्ती कमी असणे’ हा महत्त्वाचा उल्लेख केला होता. याच पार्श्वभूमीवर श्रावणातलं मांसाहार संदर्भातील ‘पथ्य’ आपण ‘परंपरे’च्या अंगरख्याखाली पाळत असतो. मांसाहार पचायला अतिशय जड असतो. त्यामुळे त्याचे सेवन हे अजीर्ण आदी पचनसंस्थेच्या विकारांना आमंत्रण देणारे ठरते. म्हणून या महिन्यात आपण मांसाहार वर्ज्य करावा, हा यामागचा उद्देश ! केवळ मांसाहारच नव्हे, श्रीखंड, बासुंदी अशी पचण्यास जड अशी पक्वान्नंसुद्धा टाळणं गरजेचं आहे. मांसाहार घ्यायचाच झाल्यास मटण किंवा चिकन सूप या स्वरूपात, तोही कमी प्रमाणात घ्यावा. तसेच हे सूप करताना त्यात मिरपूड, हिंग, जिरे टाकण्यास विसरू नका. या पदार्थांमुळे हे सूप पचण्यास सहकार्य मिळते.

श्रावणात आपण असंख्य ‘उपवास’ करतो. श्रावणी सोमवार, शुक्रवार, शनिवार असे इतर कोणत्याही महिन्यात न दिसणारे उपवास या महिन्यात आवर्जून हजेरी लावतात. यामागेसुद्धा उपवासाच्या निमित्ताने पचनशक्तीवर ताण पडू नये हाच उद्देश असतो. अर्थात, यात खरोखरच पूर्ण लंघन किंवा राजगिरा, फळे असे पचनास हलके पदार्थच खाणे अपेक्षित आहे. सध्याच्या उपवासाचे विविध पदार्थ बघता हा उद्देश कितपत साध्य होतो हा विषय आपण पाहिला आहेच.

या ऋतूमध्ये पित्तही शरीरात साठत असते. म्हणून इडली, डोसा, ढोकळा, ब्रेड असे आंबवलेल्या पदार्थांचे अतिसेवन झाल्यास अम्लपित्तासारखे आजार डोकं वर काढतात. म्हणूनच या पदार्थांचे सेवन हे टाळलेलेच बरे ! ब्रेड खायचा झाल्यास भाजून टोस्ट करून त्याला लोणी लावून खाण्यास हरकत नाही. याच दृष्टीने वडे, भजी असे तळलेले पदार्थ जरा जपूनच खावेत. दहीसुद्धा या ऋतूत निषिद्धच ! फ्रीजमध्ये ठेवलेले सर्व ‘गार’ पदार्थ या ऋतूत कटाक्षाने टाळले पाहिजेत. कारण असे पदार्थ पचायला जड तर असतातच, शिवाय सर्दी, खोकला अशा अनेक आजारांना आमंत्रित करतात. या ऋतूत कोणताही पदार्थ खाताना गरम आणि ताजा असणे हितकर असते. ‘तव्यावरची पोळी’ म्हणतात तसं जेवण म्हणजे आदर्शच !

हा जो अपथ्यांचा ‘ना’चा पाढा मी वाचतोय, त्याविषयी एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते. या सगळ्या अपथ्यांपैकी काही गोष्टी सेवनात आल्या की लगेचच प्रत्येक वेळी आरोग्याची मोठी समस्या निर्माण होईल, असा याचा अर्थ नाही. हे सगळे पदार्थ रोगांना कारणीभूत ठरू शकतात, याची जाणीव आपल्याला असणं आवश्यक आहे. म्हणजे आपोआपच आहारात त्यांचा वापर कमी होईल.

विहाराचा विचार करताना पावसात बाहेर पडताना छत्री, रेनकोट यांचा वापर करावा. पावसाळी बुटांचा वापर अधिक चांगला. कपडे वापरताना ते दमट, नसावेत. यासाठी चांगले इस्त्री केलेले किंवा धुपवलेले कपडे वापरावेत. पावसात भिजल्यास खुप वेळ अंगावर ओले कपडे असू नयेत. शक्य तेवढ्या लवकर अंग कोरडे करणे महत्त्वाचे आहे. बाहेरच्या गारव्याचा प्रतिकार करण्यासाठी जाड सुती किंवा लोकरीचे कपडे वापरात ठेवावेत. घर उबदार राहण्यासाठी रूम हीटर्सचा उपयोग करायलाही हरकत नाही.

पावसाळ्यात काही वेळा सर्वत्र दिवसभर तुफान पाऊस कोसळत असतो. ढगाळ, कोंदट हवामानात घराबाहेर जावेसेच वाटत नाही. निरुत्साह जाणवत असतो. अशा दिवसाचे वर्णन ग्रंथकारांनी ‘दुर्दिन’ असे केले आहे. दुर्दिन असताना कोणतेही काम करू नये, अगदी अभ्यासही टाळावा. अर्थात दुपारी झोपणे मात्र टाळावे.. दिवसांचासुद्धा खूप सुरेख उपयोग आपल्या परंपरेने करून घेतला. कसा माहीत आहे ?

मी त्याविषयी काही बोलणार इतक्यात त्या हॉटेलचा वेटर म्हणाला, ‘साहेब, बराच वेळ झाला. आता तरी ऑर्डर द्या.’ या वाक्याने मी आणि माझा मित्र दोघेही भानावर आलो. माझ्या बोलण्याची त्यानं गांभीर्यानं दखल घेतली असावी. कारण त्याची आवडती पण ‘पचायला जड’ असणारी पंजाबी डिशची ऑर्डर टाळून चक्क त्यानं जिरा राईस मागवला. त्या दिवशीचं संपूर्ण बिल त्यानं दिलं आणि त्या मोबदल्यात माझ्याकडून आश्वासन घेतलं, श्रावणातील परंपरा आणि वर्षाऋतुचर्या याविषयी ‘पुढील भेटीत’ गप्पा मारण्याचं !

डॉ . मयुरेश आगटे

4

आहारातील महत्त्वाची पथ्ये

डॉ’क्टर, खरंच सांगतो. घरातलचं खाणं करतो. बाहेरचं अजिबात खात नाही. घरातसुद्धा नेहमीचच खाणं करतो. सगळेच पदार्थ व्यवस्थित जेवतो. तरी पण बऱ्याच वेळा पोट गच्च होतं. गॅसेस होतात. अजीर्ण झाल्यासारखं वाटतं. हे कशामुळे होत असेल ?’ अशी तक्रार सांगणारे अनेक रुग्ण असतात. त्यांच्या आहाराच्या पदार्थात खरोखरच कोणतीच फारशी चूक नसते. तरीसुद्धा पचनाशी संबंधित काही ना काही त्रास त्यांना वरचेवर होत असतात. अशा वेळेला त्यांच्या आहारासंदर्भातील सवयींचा विचार करावा लागतो. त्याचप्रमाणे त्यांच्या शरीराची मूळ प्रकृती व आहाराची पद्धत यांचाही अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते. इतकेच नव्हे, तर बाह्य ऋतू, आपण राहतो तो प्रदेश, अन्न शिजवण्याची पद्धत, अन्नाचे रंगरूप अशा अनेक गोष्टींचा विचार महत्त्वाचा असतो. कारण या सगळ्यांचा परिणाम आहाराच्या पचनावर व त्यापासून मिळणाऱ्या पोषणावर कळत- नकळत घडत असतो. म्हणूनच आतापर्यंत आहारामागचे ‘शास्त्र’ पाहिल्यावर या आहारावर परिणाम करणाऱ्या इतर गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत.

अनेक लोकांना एकदा जेवण झाल्यावर काही काळ जाण्याच्या आतच पुन्हा काहीतरी खाण्याची सवय असते. पहिले घेतलेले अन्न तोपर्यंत पचलेलेही नसते. मग पचनशक्तीवर पडणाऱ्या या ‘नवीन’ ताणामुळे पहिले व आताचे दोन्ही अन्न पचत नाही. नेहमीचे ‘योग्य’ पदार्थ खाण्यात असले, तरी मग अजीर्णाचा त्रास होतो. म्हणूनच पहिले घेतलेले अन्न नीट पचल्याशिवाय नवीन अन्न घेऊ नये. पहिले अन्न पचल्याची खात्री करण्यासाठी काही लक्षणे आपल्या स्वत:लाच तपासता येता यामध्ये पोट हलके होणे, नवीन उत्साह येणे, मल-मूत्र यांची व्यवस्थित प्रवृत्ती हो जेवणानंतर काही काळाने येणारी ढेकर करपट किंवा कोणताही वास नसणारी असणे, अन्न पचल्यावर ‘खरी’ भूक व तहान लागणे यांसारखी लक्षणे निर्माण होतात. ही लक्षणे निर्माण होण्यासाठी साधारण तीन ते चार तासांचा किमान अवधी लागतो. म्हणून एकदा जेवल्यावर किमान इतका वेळ ‘काहीही’ न खाणे आवश्यक असते, या काळानंतर भुकेची संवेदना निर्माण झाल्यावरही ‘पोटभर’ खाणे अपेक्षित नाहीच !

एकदा नीट जेवल्यावर लगेचच पुन्हा भूक लागत असेल, तर ती अनेकदा ‘खोटी’ भूक असते. म्हणूनच प्रत्येकाने अन पचल्याचा अंदाज घेऊनच अन्न सेवन करावे.

जसे एकावर एक अन्न घेणे अयोग्य आहे, त्याचप्रमाणे अयोग्य वेळी कमी वा जास्त प्रमाणात अन्नसेवन चुकीचे आहे. भूक लागलेली नसताना केवळ जेवणाची वेळ झाली म्हणून जेवण करणे ही सवय अनेकांना असते. तसेच भूक कडकडून लागलेली असताना कामाचा ‘व्याप’ हे कारण सांगून जेवण करण्याचे टाळले जाते. या दोन्ही ‘वेळा’ आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक आहेत. वेळेच्या बाबतीत म्हणूनच ‘अभ्यासपूर्वक’ नियमितपणा आणायला हवा. भुकेची संवेदना होण्याची वेळ, कामाचा व्याप व उपलब्ध वेळ यांचा नीट मेळ आपणच घालायला हवा. ‘प्राइम ‘लंच टाइम’ या लेखात याविषयी सविस्तर चर्चा पाहिलीच आहे.

काही विशिष्ट पदार्थ एकत्र करून खाणे हे आरोग्यास हितकारक नसते. दूध आणि कोणतेही फळ एकत्र करून तयार होणारे फ्रूट सॅलेड, शिकरण यांसारखे पदार्थ, दूध व मासे, मध आणि गरम पाणी असे पदार्थ एकत्र केल्याने त्यात शरीराला अपायकारक असे गुणधर्म निर्माण होतात. म्हणूनच अशा पदार्थांचे ‘दीर्घकाळ’ सेवन केल्यास यातून ताप, त्वचारोग, अंगावर सूज येणे, मूळव्याध असे अनेकविध रोग निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणूनच असे पदार्थ एकत्र करून सेवन न करता वेगवेगळे व वेळेचे माफक अंतर ठेवून सेवन करावेत. गरम व गार पदार्थ एकत्र करून किंवा एकापाठोपाठ एक घेण्याची सवय अनेकांना असते. कॉफी व आइस्क्रीम असे एकत्र घेणे, चहानंतर कोल्डड्रिंक किंवा ताकासारखे पदार्थ सेवन करणे अशा सवयीसुद्धा आरोग्यास हानीकारक आहेत. अनेकदा आपण उगाचच चहापूर्वी पाणी पितो व त्यावर लगेच चहा पितो. त्यामुळे दोन परस्परविरोधी गुणांचे पदार्थ पोटात जाऊन शरीराला त्रासदायक असे मिश्रण तयार होते. यातूनच ‘हळूहळू’ रोगांची निर्मिती सुरू होते. मित्रांनो, यांतल्या अनेक

गोष्टी आपण नकळतपणे करत असतो. त्यांची योग्य जाणीव व्हावी, हाच या लेखाचा उद्देश !

डॉ . मयुरेश आगटे

उपवास म्हणजे नक्की काय ?

Importance of fasting

संगीताच्या चेहऱ्यावरूनच ती खूप थकल्यासारखी वाटत होती. माझ्यासमोर बसल्यावर तर तिनं तक्रारींचा पाढाच सुरू केला. अजीर्ण,करपट ढेकरा, पोटात आग पडणे, पित्त होणे, उलट्या अशा सगळ्या तक्रारींनी ती हैराण झाली होती. दोन दिवसांपासून तिला त्रास सुरू होता. दोन दिवसांपासून हे ऐकल्यावर मी तिला एकच प्रश्न विचारला, ‘संगीता, आषाढी एकादशीचा उपवास जोरदार केलास वाटतं.’ माझ्या वाक्यावर तिनं होकारार्थी मान हलवली. ‘पण’ डॉक्टर, त्या दिवशी उपवास असल्यानं उपवासाचेच पदार्थ थोडे जास्त खाल्ले. पण उपवासाचेच पदार्थ घेऊनही त्रास का व्हावा. या प्रश्नाचे उत्तर देताना मला ‘उपवासा’त अपेक्षित शास्त्रीय दृष्टिकोन समजावून सांगावा लागला. आहाराचा विचार करताना आपण आता ‘उपवास म्हणजे नक्की काय ?’ हे बघणार आहोत.

आहार ही आपली मूलभूत गरज आहे. पण गरजेपुरते अन्न घेण्याऐवजी आपण त्याचे रूपांतर करतो ते ‘जिभेचे चोचले पुरवण्यात !’ अति आहाराची हीच सवय मग अनेकविध रोगांची निर्मिती करण्यास कारणीभूत ठरते. अजीर्णापासून स्थौल्य, मधुमेह आदी विकार टाळण्यासाठी प्रमाणात व हितकर आहार घेणे महत्त्वाचे असते आणि त्यासाठी आवश्यक असतो, तो जिभेवर संयम !

नेमका हाच उद्देश साध्य करण्यासाठी ‘उपवास’ ही संकल्पना निर्माण झाली. आपण एरवी हवे तसे खाणे करतोच. पण किमान चतुर्थी, एकादशी या निमित्ताने जिभेवर ताबा ठेवला जावा. या दिवशी उपासाच्या निमित्ताने ‘लंघन’ होणे हे अपेक्षित आहे. अशा लंघनाचे आयुर्वेदात अतिशय महत्त्व आहे. कारण त्याचे अनेक फायदे असतात. यामुळे पचनशक्तीवर एरवी पडणारा ताण टाळला जातो. पचनशक्तीला विश्रांती मिळते. नवीन अन्न न घेतल्यामुळे पूर्वीचे न पचलेले अन्नपदार्थ पचण्यास शरीराला अवकाश मिळतो. शरीराला हलकेपणा येतो. यामुळे उत्साह, स्फूर्ती मिळते. अति आहारामुळे निर्माण होणारे विविध आजार टाळण्यासाठी उपवासाच्या लंघनाचा नेहमीच उपयोग होत असतो. हे सगळे फायदे मिळावेत म्हणूनच ‘उपवास’ही शास्त्रीय परंपरा निर्माण झाली. भारतीयांची धार्मिकता लक्षात घेऊन ‘धार्मिक प्रथा’ या नावाखाली हे शास्त्र आमच्यापर्यंत पोचवण्यात आले एवढेच !

उपवासाचे हे सगळे फायदे मिळण्यासाठी त्या दिवशी कमी प्रमाणात आहार घेणे अपेक्षित आहे. तसेच जो आहार घ्यावयाचा तो पचायलाही हलका असा हवा. ज्यांना ‘कडक’ उपास सहन होतो, अशा लोकांनीच असे उपवास करावेत. अन्यथा थोडा हलका आहार दिवसभरात अधून-मधून घ्यावा.

उपवासाला नेमके कोणते पदार्थ खायला हवेत, हाच खरा प्रश्न आहे. कारण आपण उपवासाचे म्हणून जे पदार्थ घेतो ते साबुदाणा, बटाटा, रताळे, दाणे असे बहुतेक सगळेच पदार्थ पचायला जड आहेत. वरई, वेफर्स, साबुदाणावडा व वर उल्लेखलेले बरेचसे पदार्थ पित्तही वाढवतात. त्यात ‘एकादशी अन् दुप्पट खाशी’ या आपल्या सवयीची भर पडते. यातूनच उपवास केल्यानंतर संगीतासारखे त्रास अनेकांना होतात. या सगळ्या प्रकारात उपवासाचा मुख्य उद्देश बाजूला पडतो. मुळात उपवासाला हेच पदार्थ खावेत, हा नियम कसा आला हे सांगणे अवघड आहे. कदाचित नेहमीच्या पदार्थांमध्ये बदल म्हणून यांची वर्णी उपवासाच्या ‘मेनू’ मध्ये लागली असावी. उपवासामुळे अपेक्षित असणारे आरोग्याचे फायदे मात्र या पदार्थांनी मिळत नाहीत. राजगिऱ्यासारखे पदार्थच काय तो अपवाद ! म्हणूनच प्रचलित उपवासाच्या पद्धतीत आपण बदल करायला हवा. त्यानुसार पचायला हलके असे राजगिरा, नाचणी, साळीच्या लाह्या, मुगाचे पदार्थ, फुलके अशा पदार्थांचा समावेश आहारात करायला हवा. स्वास्थ्य टिकवण्यासाठी हे अतिशय आवश्यक आहे.

पोटाला विश्रांती मिळणे हा उपवासाचा मुख्य उद्देश असल्यामुळे जेव्हा जेव्हा खाण्याचा अतिरेक होईल, त्यानंतर दुसऱ्या दिवशी ‘खरा’ उपवास करायला हरकत नाही. त्यासाठी चतुर्थी, एकादशी यांची वाट बघण्याची गरज नाही. तसेच उपवास आरोग्यास हितकारक असला, तरी उगाचच वारंवार उपवास करणेही योग्य नाही. यामुळे कृशता, थकवा, दौर्बल्य आदी त्रास होतात. नवरात्र, श्रावण अशा व्रतांमध्ये सलग उपास केल्याने प्रकृतीस अपाय घडल्याची उदाहरणे अनेकदा बघण्यास मिळतात. म्हणून स्वत:ची क्षमता ओळखून योग्य ते आचरण करावे. जसा दैनंदिन आरोग्य टिकविण्यासाठी उपवासाचा उपयोग होतो, तसाच अनेक व्याधीत अत्यंत उपयुक्त चिकित्सा म्हणून होतो. आयुर्वेदात यालाच ‘लंघन चिकित्सा’ असे म्हणतात. ताप, अपचन, उलटी, आमवात, स्थौल्य अशा असंख्य रोगांत ही चिकित्सा लाभदायी आहे. अर्थात, व्याधी संदर्भात वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. एकूण रोगी व निरोगी दोन्ही अवस्थांमध्ये उपयुक्त अशी ही शास्त्रीय प्रथा आहे.

उपवासामागील आध्यात्मिक भूमिका मांडण्याची ही जागा नाही. मात्र, ‘आध्यात्मिक साधने’साठी आवश्यक असणारं शरीर हे ‘साधन’ उत्तम ठेवण्याचं सामर्थ्य ‘खऱ्या’ उपवासात नक्की आहे !

डॉ . मयुरेश आगटे

वटपौर्णिमा

उन्हाळा संपवून पावसाळ्याकडे वळण्याअगोदर आपण थोडसं वेगळं वळण घेणार आहोत, ते ‘वटपौर्णिमेचं’ ! आपल्या पतिराजांना उदंड आयुष्य मिळावं आणि हाच पती जन्मोजन्मी मिळावा म्हणून दिवसभर उपास करायचा. वडाला दोरे गुंडाळून पूजा करायची असे सर्व सोपस्कार ‘सौभाग्यवती’ या दिवशी पार पाडतात. वर्षानुवर्षे चाललेल्या ‘सौभाग्यवती स्पेशल’ अशा या परंपरेविषयी आपण आता चर्चा करणार आहोत.

मी मुद्दामच ‘सौभाग्यवती स्पेशल’ असा उल्लेख केला. कारण कोणी पतीने हे ‘व्रत’ आचरण केले असं ऐकलं नाही किंवा पाहिलेलंही नाही. वटपौर्णिमा फक्त स्त्रीवर्गानेच करावी असा कुठे कायदा आहे का ? हल्लीचा काळ स्त्री-पुरुष समानतेचा असं आम्ही रोज कुठे ना कुठे वाचतो, ऐकतो. घर उभं करण्यात पतीएवढाच पत्नीचाही सगळ्या अर्थाने हातभार असतो. संसार दोघांचा; संसारातील सुख-दुःखं दोघांची ! प्रेमाची ओढ ही दोघांमध्ये सारखीच. मग जसं पत्नी नवऱ्याच्या दीर्घायुष्याकरता प्रार्थना करते, पुढील जन्मीही हाच नवरा मिळावा अशी इच्छा व्यक्त करते; तसं नवऱ्याने आपल्या सहचारिणीकरता का करू नये ?

एखादे ‘पतिमहाराज’ व्यसनी किंवा कुटुंबाच्या कर्तव्याबाबत जाणीवशून्य असतील, तर हे व्रत करताना पत्नीला प्रेम वाटत असेल की यातना ? मुळात वडाचा आणि पतीचं आयुष्य याचा संबंध काय ? की ‘पतिव्रता’ या नावाखाली सगळी जबाबदारी स्त्रीवर टाकून आपली परंपरा मोकळी झाली ? आजची २१व्या शतकातली पत्नी पतीएवढीच सबला असताना तिनं ‘एकटीनचं’ हे व्रत आचरणे हा केवळ बौद्धिक नव्हे, तर ‘भावनिक’ विरोधाभास देखील आहे, असं नाही तुम्हांला वाटत ?

मित्रांनो, वटपौर्णिमेच्या निमित्ताने असे सगळे मनात आलेले विचार तुमच्याशी बोलावेसे वाटले. मी मांडलेले हे प्रश्न तुम्हांलाही पडले असतील कदाचित ! तुमचा • समज झाला असेल की, हा विषय ‘आयुर्वेद’ नसून, ‘स्त्री-पुरुष समानता’ इत्यादी तत्सम स्वरूपाचा आहे की काय ? पण, तसं काही नसून मी आयुर्वेदाविषयीच लिहितो आहे. कारण हे व्रत केवळ स्त्रियांनी करण्यामागे आयुर्वेदाचे शास्त्र उभे आहे, याची किती लोकांना कल्पना आहे ? शेकडो वर्षांपूर्वीचा सत्यवान-सावित्रीचा काळ असो किंवा सध्याचा संगणकयुगाचा काळ असो, आजही घराचे घरपण प्रामुख्याने स्त्रीवरच अवलंबून आहे, यात कोणाचंच दुमत नसावं. घरातल्या लहान-थोर सगळ्या घटकांना धरून ठेवणारी, सर्व परिस्थितीमध्ये जिव्हाळ्याने सांभाळणारी ‘स्त्री’ ! तिच्या हसऱ्या आणि समाधानी चेहऱ्यावर संपूर्ण घराचं समाधान अवलंबून असतं. म्हणूनच ती सुखी, समाधानी असणं अतिशय महत्त्वाचं ! तिची प्रकृती उत्तम असणं हा यातलाच एक महत्त्वाचा पैलू ! निसर्गानं स्त्रीला सृजनशीलतेची अलौकिक देणगी बहाल केली आहे. ही सृजनक्षमता आणि या क्षमतेशी निगडित असणारे गर्भाशयासारखे अवयव स्त्रीदेहाचे ‘विशेष अवयव’ आहेत. त्यांची प्राकृत स्थिती ‘स्त्री’च्या दृष्टीने महत्त्वाची !

या पार्श्वभूमीवर आता आपण ‘वड’ या हिरव्यागार वृक्षाचा विचार करू. आयुर्वेदाने वडाचे अनेक गुणधर्म वर्णन केले आहेत. त्यात जुलाब, उलट्या, त्वचारोग इत्यादी रोगांचा समावेश होतो. या रोगांप्रमाणेच वडाचा उत्तम उपयोग होतो, गर्भाशयासारख्या स्त्रीविशिष्ट अवयवांवर ! गर्भाशयातून अनियमित रक्तस्राव होणे, अंगावर पांढरे जाणे अशा आजारात वडाच्या सालीचा काढा उपयोगी ठरतो. गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठीदेखील सालीचा काढा उपयुक्त आहे. महिलांमध्ये वारंवार गर्भपात होत असेल तर तो थांबवण्यासाठी साल उपयुक्त ठरते. गर्भाशयात गर्भ टिकून राहण्यासाठी वडाच्या कोंबाचा उपयोग होतो.

 ‘सौंदर्य’ ही निसर्गाने स्त्रीला बहाल केलेली आणखी एक देणगी ! वडाच्या पारंब्या यासाठी उपयोगी पडतात. पारंब्यांनी सिद्ध केलेले तेल केशवर्धनासाठी गुणकारी आहे. अशा रीतीने गर्भाशयाचे आरोग्य, गर्भधारणा, गर्भाची वाढ, सौंदर्यवर्धन या सगळ्या दृष्टिकोनातून वटवृक्ष स्त्रीवर्गाला महत्त्वाचा आणि आरोग्यदृष्टीने जवळचा आहे.

असे अनेक गुणधर्म असणाऱ्या अनेक वनस्पती आहेत. मग वडाचीच निवड यामागेसुद्धा अतिशय येथे का केली असेल ? हा मनात डोकावणारा पुढचा प्रश्न. यामागेसुद्धा परिपूर्ण विचार आहे. वटवृक्ष हा अनेक वर्षे अस्तित्वात राहणारा वृक्ष ! त्यामुळे • बाराही महिने तो उपयोगी पडतो. शिवाय संपूर्ण भारतवर्षात वटवृक्ष मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही प्रांतातील स्त्रीला त्याचा सहज फायदा मिळणे शक्य आहे, हा त्यामागचा दुसरा अतिशय व्यवहारपूर्ण विचार !म्हणूनच वडाचे गुणधर्म आणि आपल्या गावातील त्याचे स्थान स्त्रीला माहीत व्हावे आणि या वृक्षाचा वेळी-अवेळी आरोग्यरक्षणासाठी उपयोग करता यावा हा उद्देश आयुर्वेदाने वटपौर्णिमेच्या परंपरेतून साध्य करून घेतला. कारण स्त्रीच्या आरोग्यरक्षणाने केवळ पतीच्या नव्हे, तर घरातल्या इतर लोकांच्याही आयुष्यवृद्धीस हातभार लागत असतो. म्हणूनच वटपौर्णिमा व्रत स्त्रियांनी आचरणात आणण्याचे महत्त्व ! वरवर पाहता, एकांगी वाटणारं हे व्रत अर्धांगीनेच का करायचं यामागचं हे शास्त्र आहे.

डॉक्टर किंवा वैद्य जेव्हा एखादे पथ्य, सल्ला देतो, त्या वेळी त्याचे परिपूर्ण आचरण करणारे खूपच थोडे लोक असतात. पण तीच गोष्ट धर्म, संस्कृती, परंपरा अशा ‘लेबल्समधून’ जेव्हा येते, त्या वेळेला मात्र आपण सगळेच तंतोतंत आचरण करतो. भारतीयांची ही मानसिकता आयुर्वेदाने केव्हाच ओळखली आणि लोकांच्या कल्याणार्थ धर्म, परंपरा, संस्कृती असे वेगवेगळे पेहराव घेऊन हा ‘वेद’ आमच्या आयुष्यात एकरूप होत गेला, या वटपौर्णिमेसारखाच !

डॉ . मयुरेश आगटे

वर्षा ऋतुचर्या

Varsha Rutu

वैशाखाच्या वणव्यात धरणी तापून निघत असते. रखरखीत उन्हामुळे वनस्पती निष्पर्ण होतात. ग्रीष्माच्या तडाख्यात सगळे प्राणिमात्र कासावीस झालेले असतात. सगळ्या सृष्टीला एक उदास अवकळा आलेली असते. अंगाची होणारी लाही, सततची तृष्णा, तीव्र सूर्यसंतापामुळे आलेला थकवा सहन करत आपणही जीवन रेटत असतो. अवघ्या सृष्टीलाच नवसंजीवनीची प्रतीक्षा असते. म्हणूनच मे महिना सरल्यावर सगळ्यांचे डोळे आकाशाकडे लागतात. खऱ्या अर्थाने चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहतात. आणि अखेर प्रतीक्षेचा क्षण संपतो. अन् कालिदासाच्या यक्षाचा आपल्या प्रेयसीला निरोप पोहोचवणारा ‘मेघदूत’ आम्हांला मात्र देवदूतासारखा वाटतो. सगळ्याच सृष्टीला पावसाच्या आगमनाने टवटवी येते. उन्हाळ्यातील भकास वातावरण एकदम बदलते आणि कात टाकल्याप्रमाणे नवीन हिरवेगार स्वरूप धरणीला प्राप्त होते. रिमझिम बरसणारा हा सावन सगळ्या सृष्टीत आमूलाग्र बदल घडवतो. मग याला मानवी शरीर तरी अपवाद कसे असेल ?

उन्हाळ्यातील तीव्र सूर्यसंतापामुळे आपल्या  बल कमी झालेले असते. शरीरातील रूक्षता वाढते. थकवा, अनुत्साह अशी स्थिती निर्माण होते. यामुळे शरीरस्थ वातदोषाचा संचय होण्यास सुरुवात झालेली असते. पावसाळ्यात सर्वत्र गार वारे वाहू लागतात. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढायला सुरुवात होते. बाह्य वातावरणातील या गारव्यामुळे उन्हाळ्यात संचित झालेला वातदोष आणखीनच वाढतो. यालाच ‘वातप्रकोप’ असं म्हणतात. यामुळे उन्हाळ्यात आलेली दुर्बलता आणखीनच वाढते. ही दुर्बलता वाढवण्यास आणखी हातभार लागतो, तो मंदावलेल्या पचनशक्तीचा ! बाहेरच्या आर्द्रतेमुळे आणि गारव्यामुळे शरीराच्या पचनशक्तीवर परिणाम घडतो. पचनशक्ती मंदावते. खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन होत नाही. त्याचाच परिणाम शरीराच्या पोषणावरही घडतो. आणि देहदुर्बलता • अधिकच जाणवू लागते. वर्षाऋतूमध्ये वात प्रकोपाबरोबरच पित्तदोषाचाही संचय शरीरात व्हायला सुरुवात होते. म्हणूनच वातप्रकोप, पित्ताचा संचय, मंदावलेली पचनशक्ती, शरीराला आलेली दुर्बलता या शारीरिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर वर्षाऋतुचर्येतील आचरण दिग्दर्शित केले आहे.

या दृष्टीने आपण प्रथम आहाराचा विचार बघू. यात शरीराला आलेली दुर्बलता कमी होण्यासाठी खरं तर बलदायी पदार्थांचे सेवन करावयास हवे. पण वर्षाऋतूत मुळातच पचनशक्ती मंदावलेली असल्याने हे सहज शक्य होत नाही. कारण असे पदार्थ बहुतांशी पचावयास जड असतात. किंबहुना अशा आहाराचे सेवन केल्यामुळे पचनशक्तीवर ताण पडण्याची शक्यता अधिक ! म्हणूनच आहारात ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू यांचे पदार्थ असावेत. भूक वाढणे आणि पचनशक्ती यासाठी लसूण, सुंठ, आले, पुदिना, हिंग, मिरे, जिरे, कोथिंबीर, कढीलिंब या पदार्थांचा स्वयंपाकघरात मुक्तहस्ते वापर करावा. विशेषत: लसणाचा उपयोग अधिक चांगला होतो. लसणाची चटणी, तळलेला लसूण किंवा भाजी, आमटीत लसूण वापरता येतो. हिंग, मिरे आदी वर्णन केलेले फोडणीचे पदार्थही अधिक प्रमाणात वापरावेत. दालचिनी, तमालपत्र हे मसाल्याचे पदार्थही उत्तम भूक वाढवतात. तसेच पचनशक्तीलाही ताकद देतात. या ऋतूमध्ये शक्यतो जुने धान्य वापरावे. कारण नवीन धान्य पचायला जड असते. ‘जुने’ याचा अर्थ एक वर्षापेक्षा जुने असावे. गहू, तांदूळ आदी साठवणुकीची घरात पद्धत असेल तर हे सहज शक्य आहे. नवीन धान्य वापरायचे झाल्यास ते भाजून वापरावे. त्यामुळे ते पचायला हलके होते. दुधी भोपळा, दोडका, पडवळ, भेंडी, घोसावळे अशा फळभाज्यांचा उपयोग अधिक असावा. कडधान्ये मोड आणून वापरण्याऐवजी भाजून वापरावीत. पालेभाज्यांमध्ये कोवळा मुळा, चाकवत असाव्यात. शेवग्याच्या पानांची भाजी तर खूपच उपयुक्त ठरते. दूध, साजूक तूप, गोड आणि ताजे ताक यांचा आवर्जून उपयोग करावयास हवा.

आहाराप्रमाणेच पिण्याच्या पाण्याचाही विचार महत्त्वाचा. सर्व ओढे, नदी, नाले दुथडी भरून वाहत असतात. त्यात वाहून आलेली माती, पालापाचोळा, मृतजीव यामुळे पाणी गढूळ बनते. याचसाठी नद्यानाल्यांचे पाणी शक्यतो वापरू नये. अर्थात पुण्या-मुंबईसारख्या शहरात हा प्रश्न फारसा येत नाही. तरी कोणतेही पाणी पिताना निवळून, गाळून आणि उकळून घेतलेलेच बरे. फिल्टरसारख्या आधुनिक साधनांचा वापर करूनही पाणी शुद्ध करता येते. ‘दिव्यांबू’ म्हणजे आकाशातून पावसाच्या रूपाने पाणी गोळा करून प्यावे. असे पाणी शुद्ध असते, असा उल्लेख ग्रंथात सापडतो. पण आजच्या काळात प्रदूषणातून निर्माण होणाऱ्या अनेक घातक रासायनिक वायूंचा या पाण्याशी संपर्क येऊन असे ‘दिव्यांबु’सुद्धा दूषित बनते. म्हणूनच असे पाणीसुद्धा शुद्ध करणे आवश्यक आहे. सद्यःपरिस्थितीत ऋतुचर्येत बदल करावा लागतो, तो अशा प्रकारचाच !

अरेच्या ! बघता बघता या वर्षासहलीतलं बरंचसं अंतर आपण पार केलं. तेव्हा या वळणावर थोडीशी विश्रांती घेऊ म्हणजे पुढच्या प्रवासासाठी ताजंतवानं होता येईल. आणि हो, पुढल्या प्रवासात या वर्षाऋतुचर्येच्या पार्श्वभूमीवर आपण भेट देणार आहोत ‘श्रावणातील व्रतवैकल्यां’ना’ ! तोपर्यंत या मस्त पावसाच्या आनंदात न्हाऊन निघत पुन्हा पुन्हा म्हणूयात, ‘ये रे घना, ये रे घना…’

डॉ . मयुरेश आगटे

उन्हाळ्यातील आजार..

Summer diseases

दरवर्षीप्रमाणेच या वर्षीच्या उन्हाळ्यातही उमेश माझ्यासमोर नाक रक्ताने थबथबलेल्या रुमालात धरून बसला होता. उन्हात फिरल्यावर घुळणा फुटणे म्हणजेच नाकातून रक्तस्राव होणे अशी त्याची नेहमीचीच तक्रार होती. उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे हा त्रास त्याला वारंवार होत होता. त्यातच उन्हात फिरताना टोपी न घालणे, रात्री जागरण अशी अपथ्ये या त्रासाला हातभार लावत होती. उन्हाळ्यात असा त्रास अनेकांना होत असतो. उमेश हा त्यांचाच एक ‘रुग्ण’ प्रतिनिधी ! उन्हाळ्यात करावयाच्या आहार-विहाराचा विचार केल्यानंतर आपण या काळातील आजाराविषयी चर्चा करणार आहोत.

उमेशसारख्या ज्या व्यक्तींना घुळणा फुटणे असा त्रास होतो, त्यांना उत्तम औषध म्हणजे ‘दूर्वा’. दूर्वांचा रस अतिशय थंड असल्याने त्याचे थेंब नाकात सोडावेत. आडवे झोपून कपाळावर, नाकावर बर्फ ठेवावा. नाकातला रक्तस्राव थांबवण्यासाठी साखर पाण्यात विरघळवून त्याचे थेंबही नाकात सोडावेत. पद्मकादी तैल, चंद्रकला रस अशी औषधे यासाठी उपयुक्त आहेत. मात्र, त्यांचा उपयोग वैद्यकीय सल्ल्याने करावा. दूर्वांचा रस, साखरेचे पाणी यांचा उपयोग त्रास झाल्यावर करण्यापेक्षा ज्यांना असे त्रास वारंवार होतात, अशा व्यक्तींनी उन्हाळा सुरू झाल्याबरोबर करण्यास हरकत नाही. यात कोणताही अपाय तर नाहीच, उलट अशा आजारांना प्रतिबंध होऊ शकेल.

उन्हाळी लागणे म्हणजेच मूत्र प्रवृत्तीच्या वेळी आग होणे ही अशीच या ऋतूमधील महत्त्वाची तक्रार ! अशा वेळी शहाळ्याचे पाणी, लिंबू सरबत,आवळा सरबत यांचे अधिक प्रमाणात सेवन करावे. आवळा, धमासा, गोक्षुर, नागरमोथा अशी औषधे यासाठी उपयुक्त आहेत. उशीरासव, चंदनासव यांचासुद्धा उपयोग होतो. धने आणि जिरे उकळून तयार केलेले पाणी पिण्यासाठी वापरल्याने मूत्र प्रवृत्तीचे वेळी होणारी आग कमी होते.

हातापायांची आग होणे, संपूर्ण शरीराचा दाह होणे हे लक्षणसुद्धा अनेक लोकांमध्ये आढळते. या लोकांनी दूध, तूप, लोणी यांचा आहारात अधिक वापर. ठेवावा. औषधांमध्ये प्रवाळपिष्टी, गैरिक, ज्येष्ठमध, पद्मकाष्ठ, शतावरी, डाळिंब, फालसा यांचा चांगला उपयोग होत असतो. चंदन, मुलतानी माती, सारिवा या औषधांचा एकत्रित लेप अंगावर लावल्यानेही दाह कमी होतो. अंगाचा दाह कमी होण्यासाठी गुलकंद, मोरावळा असे पदार्थ नियमित घेणेही अत्यंत लाभदायी ठरते.

उष्णतेमुळे होणाऱ्या विकारांपैकी एक म्हणजे त्वचेवर फोड येणे. यालाच बोली भाषेत ‘घामोळ्या’ येणे असे म्हणतात. घामोळ्यांमध्ये आग होणे किंवा खाज सुटणे अशी लक्षणेही काही वेळा आढळतात. अशा वेळी नागरमोथा, वाळा, जीतसाया यांची चूर्णे पाण्यातून त्वचेवर लावावीत. आग खूप होत असल्यास साजूक तूप किंवा शतधौत घृत, लोणी यांचाही लेप उपयुक्त ठरतो. त्वचेवर टाल्कम पावडर सतत लावण्यानेही फायदा दिसून येतो. घामोळ्या आलेल्या व्यक्तींनी अशा औषधांबरोबरच एक महत्त्वाचे पथ्य पाळायला हवे. ते म्हणजे सिंथेटिक कपडे न वापरता सुती कपडे वापरावेत. कारण सिंथेटिक कपडे त्वचेवर घासल्यामुळे अधिकच अपाय होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे केमिकल्स असणाऱ्या साबणाचा वापरही टाळावा.

काही वेळा उन्हात फिरण्याशिवाय पर्याय नसतो. मग सतत उन्हात फिरल्यामुळे ‘त्वचा काळवंडणे’ अशी तक्रार दिसते. अशा वेळी निरनिराळी सनस्क्रीन लोशन्स, जेल यांचा उपयोग करावा. घरातून निघतानाच जर आपण अशी औषधे अंगावर लावून निघालो, तर त्वचेचे उन्हापासून संरक्षण होण्यास निश्चितच मदत होईल. उन्हामुळे त्वचा खरखरीत, कोरडी पडणे किंवा तडकणे यासाठीही या क्रीम्स, लोशन्स इत्यादींचा चांगला उपयोग होऊ शकेल. या तक्रारींसाठी आणखी एक उपयोगी औषध म्हणजे ‘कोरफड’. कोरफडीच्या पानातील गर त्वचेवर लावल्यामुळे तेथील पेशींना स्निग्धता मिळते. त्वचा टवटवीत होते. उन्हाळ्यात अनेकांना अंगावर पित्त उठते. यात त्वचेवर लाल रंगाचे गोलाकार चट्टे उठून खाज सुटते. अशा लोकांनी तत्काळ आमसुलाचे पाणी त्वचेवर लावावे. हे पाणी पिण्यासही वापरावे. खायचा सोडा पाण्यातून त्वचेवर लावावा.

डॉ . मयुरेश आगटे

सूचना :- कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर या लेखात नमूद केलेली सर्व औषधे वापरा.

उन्हाळ्यातील विहार…

दिवसभरच्या रणरणत्या उन्हात फिरावं लागल्यामुळे सुरेश पूर्णतः वैतागून गेला होता. सततच्या घामाच्या धारांनी थबथबला होता. उन्हाच्या काहिलीनं रोजचा दिवस सहनशक्तीचा अंत पाहणारा ठरत होता. ‘या जगात इतके शोध लागत आहेत, मग अजून हँडी फॅन किंवा ए.सी.चा शोध का लागत नाही ?’ रोजच्या त्रासातून निर्माण झालेले सुरेशचे हे उद्गार !

या ऋतूतील सूर्यसंतापाला तोंड देण्यासाठी आपण सगळेच सुरेशप्रमाणेच ‘गार’ वातावरणाला आसुसलेलो असतो. ग्रीष्म ऋतुचर्येतील विहारातही हाच महत्त्वाचा मुद्दा ग्रंथात मांडला आहे. त्या दृष्टीने पंखे, कूलर्स, एअर कंडिशन यांचा वापर आवश्यकच आहे. खोलीत गारवा राहण्यासाठी खिडक्यांना वाळ्याचे पडदे लावावेत. या पडद्यांवर पाणी शिंपडल्याने अधिकच गारवा निर्माण करतो. काही व्यक्तींना पंख्याच्या किंवा कूलर्सच्या वाऱ्याने सर्दी होणे, अंग जड होणे असे त्रास होत असतात. अशा लोकांनी या वाऱ्याचा झोत प्रत्यक्ष अंगावर येणार नाही, याची काळजी घ्यावी. या बाबतीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हातून आल्यावर लगेच गार वातावरणात जाणे किंवा ए.सी.च्या वातावरणातून लगेच उन्हात जाणे या गोष्टी शक्यतो टाळाव्यात. कारण यात होणारा तापमानातील अचानक बदल शरीराला त्रासदायक ठरू शकतो.

पिण्याप्रमाणेच आंघोळीसाठीही गार पाणी वापरावे. शॉवर, टबबाथ अशा साधनांचाही या वेळी उपयोग होतो. गारवा सतत मिळण्यासाठी ओला रुमाल, नॅपकिन अंगावर गुंडाळावे. या सततच्या गार स्पर्शामुळे उकाडा सुसह्य होत असतो.

घराबाहेर पडताना रेशमी, सूती कपडे घालावेत. कपडे तलम कापडाचे व सैलसर असावेत. त्याचप्रमाणे सगळे गडद रंग उष्णता वाढवतात. म्हणून असे कपडे न वापरता सौम्य रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे या ऋतूमध्ये अधिक हितावह ठरतात. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोपी, छत्री यांचा वापर अनिवार्यच ठरतो. उन्हाची तीव्रता डोळ्यांसाठी नेहमीच हानिकारक असते. याचसाठी न विसरता काळा गॉगल प्रत्येकाने वापरणे आवश्यक आहे. अर्थात, दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळणे अधिकच चांगले.

उन्हातून घरी आल्यावर एक महत्त्वाची काळजी घेणे आवश्यक आहे. आपण आल्या-आल्या लगेचच गार पाण्याने तोंड धुतो. असे करणे डोळ्यांच्या ताकदीच्या दृष्टीने अतिशय अपायकारक आहे. म्हणूनच उन्हातून आल्यावर काही काळ जाऊ द्यावा. शरीराचे तापमान कमी झाल्यावर मग गार पाण्याने चेहरा धुवावा.

ग्रीष्म ऋतूमध्ये शक्यतो व्यायाम टाळायला हवा. कारण व्यायामाने या काळात अधिकच थकवा येण्याची शक्यता असते. त्यातल्या त्यात पोहण्याचा व्यायाम घेणे उपयुक्त ठरते. त्यातही खूप न पोहता जमेल तेवढे पाण्यात डुंबत राहणे हितावह आहे. व्यायाम करावयाचा झाल्यास सकाळी, संध्याकाळी ऊन नसताना सावकाश चालण्याचा व्यायाम करावा. हेसुद्धा खूप वेळ करणे अपेक्षित नाही.

ग्रीष्म ऋतूमध्ये शरीरातील रूक्षता वाढत असते. वातदोषाचा संचय, बलहानी यासुद्धा घटना घडतात, हे आपण पाहिले. या सगळ्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरते, ती दुपारची झोप ! अन्य ऋतूमध्ये अनारोग्यकर दुपारची झोप या ऋतूमध्ये मात्र अवश्य घ्यावी. रात्री झोपतानासुद्धा मोकळ्या अंगणात, गच्चीवर चांदण्यात झोपावे. चांदण्याची शीतलता या काळात खूपच लाभदायी ठरत असते. चांदण्यात बसणे किंवा मोकळ्या हवेत फिरायला जाणे, असे उपक्रमसुद्धा नियमित करावेत.

उन्हाळ्यात चंदन, कापूर, नागरमोथा अशा थंड पदार्थांचा शरीरावर लेप लावावा. यामुळे उष्णता कमी होतेच. शिवाय ही सुगंधी द्रव्ये मनही प्रसन्न ठेवतात. यासाठी मोगरा, जाई, जुई अशा सुगंधी फुलांचाही वापर करावा. निरनिराळी अत्तरे, सेंटस्, डिओडोरन्ट्स यांचाही या ऋतूत ‘फ्रेश’ वाटण्यासाठी मुक्तहस्ते उपयोग करण्यास हरकत नाही.

डॉ . मयुरेश आगटे