सोडा हा अतिपर्यटनाचा हव्यास, मोकळा करा निसर्गाचा श्वास, शोधाना आपल्या जवळच कास .
१९९० च्या दशकातील गोष्ट आहे. तेंव्हा पुणे-सातारा हमरस्ता हा दोन पदरी होता. ठोसेघर चाळकेवाडी परिसरात पवनचक्यांचा पत्ता नव्हता आणि साताऱ्याहून बामणोली ला दिवसातून १/२ च बस जायच्या .. बाकी एखाद दुसरी दुचाकी.. त्यातुन जाणाऱ्या वाटसरूंना खिडकीतून बऱ्याचदा रंगीबेरंगी फुले दिसायची . पण ती नित्याचीच असल्याने कोणी तिकडे मान वाकडी करून पाहायचे नाही !
जागतिकीकरणाच्या हवेबरोबर , चाळकेवाडीच्या पठारावर पवनचक्क्या फिरू लागल्या .. थोडेफार रस्ते झाले आणि मग पवनचक्क्याबरोबर ठोसेघर सर्वत्र प्रसिद्ध झाले. पुणे-सातारा रस्ता चार पदरी झाला आणि त्याचसुमारास बऱ्याच लोकांच्या दारी पण चार चाकी वाहन येऊ लागले.. आणि मग पावसाळ्यात ठोसेघर-सज्जनगड-कास-बामणोली अशा पर्यटकांच्या तीर्थयात्रा सुरु झाल्या. कास चा काच तलाव झाला. आणि ह्या सर्व स्थित्यंतरात , काय अवस्था झाली कास-ठोसेघर-बामणोली च्या निसर्गाची ? त्याचीच ही काहीशी संक्षिप्त कथा. मुख्यतः कास पठाराबद्दलची.
सुरवातीला काही दुचाकीवर येणारे लोक दिसू झाले. येणारे फुले जवळून पाहायचे. कुंपण, मार्गदर्शक असला प्रकार नव्हता . मोबाईल आणि त्याला जोडून कॅमेराही नव्हता. त्यामुळे आलेले लोक काही वेळात बघून निघूनही जायचे. काही जण फुले तोडून घ्यायचे. काही जण ती रोपे पण उपटून घरी घेऊन जायचे. बागेत लावायला !! काही जण फुलात लोळायचे , पळायचे. काही जण तो मातीचा हलकासा थर खरडून न्यायचे. सांगून काहीही उपयोग नव्हता ! येणारे लोक पण तुलनेने कमी होते त्यामुळे नुकसान पण कमी व्हायचे.
बऱ्याचदा पाठरावरच्या दूरच्या कोणत्या कोपऱ्यात काही संशोधक पण दिसायचे. ते सर्वाना कळवळून सांगायचे की हा वारसा आपल्याला शक्यतोवर जपायचा आहे. त्यामुळे जेव्हढी जमेल तेव्हढी काळजी घ्या आणि जेव्हढी कमी शक्य आहे तेव्हढीच प्रसिद्धी करा. त्यांना जणू काही पुढील भविष्य माहीत होते.
त्यातीलच कुणीतरी सांगितलेले आठवतेय. “सर्व सह्यद्रीच अशा विविधतेने आणि फुलांनी नटलेला आहे. तो फक्त अशा काही थोडक्या दिवसात भरभर बघायचा नाही, तर वर्षभर शांतपणे अनुभवायचा आहे. काही दशकापूर्वी पाचगणी च्या पठारावर पण अशीच फुले दिसायची पण अतिपर्यटनाने ती नाहीशी झाली . “
गंमत म्हणजे करोना बंदीच्या काळानंतर मला पाचगणीच्या पठारावर काससारखी काही रानफुले दिसली होती. निसर्गाला तुम्ही थोडी जागा आणि बहरायला वेळ द्या, तो (गाजावाजा न करता )परत येईलच 🙂
सातारा ते कास हा रस्ता मस्त घाटांचा , दोन्ही बाजूला हिरवळीचा, फुलांचा होता. बामणोली पर्यत एकही हॉटेल नव्हते. होत्या फक्त एक दोन चहाच्या टपऱ्या. एक पेट्रीला आणि दुसरी यवतेश्वर जवळ. बाकी सगळी निसर्सगाची मुक्त उधळण. प्राणी-पक्षी याना मुक्त संचार. वाहनांचा आणि लोकांचा संचार अतिशय मर्यादित.
काळ असाच पुढे २० वर्षे पुढे सरकला. आता सर्वांच्या हातात कॅमेरा , जवळ भरपूर पैसा आणि गाड्या. आणि हे सर्व सौंदर्य अनुभवायला नाही तर ते
विविध करामती करत समाजमाध्यमांवर टाकायला असणारा उत्साह.. सगळेच भरपूर.
पूर्वी पुणे-सातारा अंतर कापयला तीन तास लागायचे. आणि सातारा कास ला २० मिनिटे.
आता पण सुट्टी च्या दिवशी सातारा पोहोचायला लागतात अडीच/तीन तास आणि कास ला पोहोचायला कधी अर्धा तास तर कधी २ तास पण. पूर्वी निवांत असणारा सातारा कास रस्ता आता अखंड वाहता असतो. रस्त्याच्या दुतर्फा दिसतात असंख्य रिसॉर्ट्स आणि लोकांना ह्या निसर्गात राहायला/बांधायला बोलावणारी सिमेंटची आमंत्रणे ..
का करायचा हा अट्टाहास ? कासच का ? महाराष्ट्राच्या वाट्याला जवळपास ५०० किलोमीटर लांबीचा सह्याद्री मिळालेला असताना, का करायची गर्दी ह्या साधारण ५/१० किमी लांबीच्या पट्ट्यात ? सह्यकड्यावर अशी पठारे सर्वत्र आहेत. लाव्हारस थंड होऊन झालेली पठारे आणि त्या दगडाच्या वरच्या थराची झीज होऊन झालेला हा मातीचा थर आणि त्यावर वेगवेगळ्या ऋतूत उमलणारी रानफुले. हे दृश्य सर्वत्रच आहे. त्यासाठी एव्हढ्या दूरवर , एव्हढा प्रवास करून , वेळ इंधनाचा अपव्यय करून, तेथील आधीच नाजूक परिस्थितीत असलेल्या निसर्गाचा ऱ्हास का करायचा ? कदाचित इतर पठारावर एव्हढी विविधता नसेल, एव्हढ्या संख्येने फुले येत नसतील. पण मग अशी गर्दी करून आपण कास ची अवस्था पण मागे म्हणाल्या प्रमाणे पाचगणी च्या पठारा सारखी होऊ द्यायची का?
कासच नाही, तर पावसाळ्याच्या सुरुवातीला मुळशी, हिवाळ्यात भिगवण , दिवाळीत कोकणकिनारे.. आपण सर्वदूरपणे वेळोवेळी गर्दी करून तेथील निसर्गावर असाच कधीही न पुसता येणारा ठसा सोडून जात आहोत ..
पुण्याजवळ किती तरी टेकड्या आहेत. सुदैवाने बऱ्याच टेकड्यावर अजूनही विविधता टिकून आहे. बर्याच संस्था ह्या टेकड्यावर विविधता आणायचा प्रयत्न करत आहेत. वर्षातून एकदा कास/मुळशी/भिगवण -वारी करून निसर्गाचा बूस्टर डोस घेण्यापेक्षा, घेऊ शकतो ना आपण त्याचा मंद आस्वाद. अशा संस्था बरोबर काम करून आपण बोलवू शकतो कासलाच आपल्या नजीक. आणि अगदी पूर्ण वर्षभरासाठी …
आपल्या जवळच्या टेकडीवर सकाळच्या वेळी एक निवांत फेरी मारली. कोणत्या झाडाला नवी पालवी आली आहे, कोणत्या झाडाला नवीन कळ्या फुलताहेत, काही झाडांची ऋतूनुसार पाने सुकताहेत. काही झाडात पक्षी घरट्याची लगबग करताहेत. अशी कितीतरी दृश्ये आपल्याला निवांत पाने आपल्या डोळ्यात साठवता येतील. सकाळचा मंद वारा आणि त्याबरोबर दरीतून येणारा पानं-फुलाचा मंद सुवास आणि पक्षांचा किलबिलाट, आपल्याला कासच्या गर्दीत कधी मिळणार आहे ?
आपल्या आवडत्या झाडाजवळ बसून त्याची पाने /फुले हळुवार पणे हाताळताना, त्याची वैशिष्ट्ये निरखून बघताना , त्या झाडाची काळजी घेताना, वेळ कसा निघून जातो कळणार पण नाही. इथे कुणी तुम्हाला हटकणार पण नाही किंवा तुमच्या मागे रांग लावून थांबणार नाही किंवा आमचा एक फोटो काढा असे म्हणणार पण नाही. जमलेच तर एखादी छोटी नोंदवही पण आपण घेऊन जावू शकतो आणि सभोवतालचे बदल टिपून घेऊ शकतो. ते बदल त्या झाडाजवळच्या माती बद्दल असतील, किंवा झाडाच्या पानाफुलांबद्दल असतील, झाडाजवळ दिसणाऱ्या पक्षांबद्दल असतील किंवा मग त्या झाडाजवळ पाठ टेकवून पडल्यावर दिसणाऱ्या आकाशाबद्दल असतील .. पण ते सर्व तुमचे स्वतःचे, काही खास आणि युनिक अनुभव असतील..
सर्वात महत्त्वाचे, हे सर्व निसर्गसंस्कार आपण आपल्या पुढील पिढीवर जाणीवपूर्वक करायला हवेत. पाऊस म्हणजे फक्त धबधब्यात दाटीवाटीने उभे राहून फोटो काढणे किंवा कांदाभजी खाणे , किंवा रिसॉर्टवर जाऊन रेनडान्स करणे नव्हे, तर पाऊस म्हणजे, पहाटे उठून पावशाची आर्त हाक ऐकणे, आपल्या जवळचे निर्झर, ओढे जवळून पाहणे, त्या भोवती वाढणारी नवीन रोपटी, सूक्ष्म जीव ओळखणे हे पण आहे. हे नवीन पिढीला अशा जवळपासच्या ठिकाणी नेवून निसर्गातील असे बदल दाखविणे महत्त्वाचे आहे. श्रावणातील सणाबरोबर, त्यांना त्या सणाशी निगडीत पाने-फुले ओळखता आली पाहिजेत. एखाद्या शांत जागी जाऊन ओढ्याची खळखळ , त्यातील एका डबक्यात चक्रे उमटवणारी निवळी, किंवा टपकन उडी मारणारा बेडूक कधीतरी अनुभवाला पाहिजे.
निसर्ग म्हणजे घाईघाईत जाऊन काही लुबाडणे नव्हे तर शांत पण वारंवार जाऊन हळुवार पणे अनुभवणे आहे . ती एक कधीतरी घडणारी घटना नाही तर दिनक्रमाचा भाग आहे, हे आपण नवीन पिढीला पटवू शकलो. तर कास चा मूल्यवान वारसा आणि निसर्गस्नेही जगण्याचा आपली भारतीय परंपरा चिरंतर टिकून राहील. मागच्या हजारो पिढ्यानी हा निसर्ग आणि वारसा सांभाळला आहे. आपण तो आपल्या प्रगल्भ, सक्रिय आणि निसर्गानुकूल वागण्याने टिकवला/वाढविला पाहिजे. मग नक्कीच, कास भ-‘कास ‘ होणार नाही तर त्याचा आणि आपला खऱ्या अर्थाने वि -‘कास’ होईल.