भूतधात्री निद्रा

Importance of Sleep

मित्रांनो, दिनचर्येनंतर आता आपण रात्रीशी संबंधित असे आचरण पाहणार आहोत. त्यातही रात्रीच्या आहारासंदर्भात पूर्वी आपण चर्चा केली आहेच. त्यामुळे रात्रीचर्येतील महत्त्वाचा भाग उरतो तो ‘निद्रेचा’ ! म्हणूनच यापुढे आपण निद्रेविषयी चर्चा करणार आहोत.

रोजच्या दैनंदिन जीवनात शरीराच्या विविध हालचाली घडत असतात. अनेकविध शरीर क्रियांमध्ये शरीरघटकांची ऊर्जा खर्ची पडत असते. ही ऊर्जा भरून येऊन पुन्हा ताजेतवाने होण्यासाठी शरीराला गरज असते ‘विश्रांतीची’ ! आणि ही गरज पूर्ण केली जाते ती ‘निद्रेमधून’ ! झोपेच्या काळात शरीराच्या सर्व हालचाली थांबल्यामुळे साहजिकच रोजच्या दैनंदिन जीवनातील खर्च झालेली ऊर्जा भरून काढण्यास वेळ मिळतो. शरीरातील सर्वच पेशी पुन्हा टवटवीत होतात. शरीराला पुन्हा दुसऱ्या दिवशी काम करण्यास यामुळे ताकद, उत्साह मिळतो.

निद्रेचा शरीराला मिळणाऱ्या फायद्यांबरोबर आणखी एक महत्त्वाचा फायदा होतो. तो म्हणजे मनाला मिळणारी विश्रांती ! आपले मन निसर्गत:च अतिशय चंचल आहे. त्यामुळे प्रत्येक क्षणाला मनाचे काम चालूच असते. दिवसभरात शरीराला एकवेळ विश्रांती देता येईल, परंतु मनाला आराम मिळणे महाकठीण! ‘झोप’ ही अशी एकमेव गोष्ट आहे, जी मनालाही विश्रांती देते. त्यामुळे मनालाही टवटवीतपणा येतो. झोपेमुळे अशा रीतीने शरीर आणि मन दोन्हींना तजेला येतो. पुन्हा काम करायला उभारी येते. म्हणूनच ग्रंथात झोपेला ‘भूतधात्री’ म्हणजे मनुष्याचे धारण करणारी, सांभाळणारी असे नाव दिले आहे. अर्थात, हे सगळे फायदे होण्यासाठी ‘पुरेशी’ म्हणजे साधारणत: सात ते आठ तास झोप घेणे हितावह आहे. यात वय आणि व्यवसाय यानुसार फरक पडू शकेल. लहान मुले निसर्गत:च अधिक झोपतात.

शरीराची वाढ होण्यासाठी ही अधिक झोप महत्त्वाची असते. वार्धक्यात होणारी शरीराची झीज कमी होण्यासाठी, तसेच त्या वयातील दौर्बल्य कमी व्हावे म्हणून आठ तासांहून थोडे अधिक झोपल्यास हरकत नाही. त्याचप्रमाणे वृद्धांनीही आजारपणामुळे थकवा आला असेल तर अशा व्यक्तीनेही जास्त वेळ झोपणे फायदेशीर ठरते.

ज्यांचे व्यवसाय शारीरिक कष्टाचे असतील, त्यांनीसुद्धा या ‘साधारण’ वेळेपेक्षा अधिक झोप घ्यावी. याउलट, बैठे काम करणाऱ्या व्यक्तींना फारसे श्रम होत नसल्याने थोडी कमी झोपही पुरेशी ठरू शकेल. ‘पुरेशी’ हे प्रमाण प्रत्येक व्यक्तीप्रमाणे वेगळे असू शकते. काहींना सहा तासांहून कमी झोपही पुरेशी ठरते. तर काहींना आठ तास ‘किमान’ झोप लागेल. म्हणूनच प्रत्येकाने थोडासा स्वत:चा अभ्यास करून हे प्रमाण ठरवायला हवे.

झोप जशी योग्य प्रमाणात हवी त्याचप्रमाणे ‘नीट’ झोप होणेही महत्त्वाचे ! नीट म्हणजे शांत, गाढ झोप लागणे. सकाळी उठल्यावर खऱ्या अर्थाने ‘फ्रेश’ वाटणे म्हणजे नीट झोप होणे. सारखी स्वप्ने पडणे, थोड्याशा आवाजानेही झोप ‘डिस्टर्ब’ होणे किंवा काही कारणाने जाग आल्यावर पुन्हा झोप न येणे अशा अनेक गोष्टींमुळे झोपेत अडथळे येतात. मग ‘खरी’ झोप मिळत नाही. यातूनच फ्रेश न वाटणे निरुत्साह, झापड येणे अशी लक्षणे निर्माण होतात. याचसाठी ‘पुरेशी’ आणि ‘नीट’ झोप मिळणे आवश्यक आहे.

रात्रीची वेळ ही झोपेची नैसर्गिक वेळ आहे. दिवसभर शिणल्यानंतर रात्री आपोआप झोप येते. अर्थात, रात्रीची वेळ म्हणताना रात्री ‘उशिरा’ झोपणे अपेक्षित नाही. जितके लवकर झोपता येईल तितके चांगले ! साधारण नऊ-दहाच्या आसपासची ही वेळ असावी. मात्र हल्ली टीव्हीमुळे अकरा-बारापर्यंत आपण जागे असतो. यामुळे शरीर आणि मन यांची अकारण ओढाताण होत असते. उशिरा झोपण्याची सवय झालेली असली तरी कळत-नकळत त्याचा परिणाम होत असतोच ! आणि मग नीट झोपच होत नाही अशी तक्रार ऐकू येते. आरोग्याच्या दृष्टीने ‘किती तास झोप झाली’ याच्याइतकेच ‘कोणत्या वेळी झोप झाली’ हेही महत्त्वाचे आहे. या दृष्टीने ‘उशिरा झोपून उशिरा उठणे’ हितकर नसून ‘लवकर झोपून लवकर उठणे’ श्रेयस्कर आहे. लवकर उठण्याचे फायदे आपण पूर्वी दिनचर्येच्या सुरूवातीच्या भागात पाहिलेच आहेत. मात्र काही वेळा अपरिहार्य कारणामुळे जागरण करावे लागतेच. याविषयी चर्चा पुढील लेखात…..

डॉ . मयुरेश आगटे

सूचना :- कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर या लेखात नमूद केलेली सर्व पदार्थ आपले वय आणि आपल्या प्रकृतीनुसार वापरा

3