उन्हाळ्यातील आहार

Grishma Rutu diet

‘डॉक्टर, चक्क तुम्ही दही खायला सांगताय !’ माझ्यासमोर बसलेल्या समीरच्या या वाक्यात कुतूहल आणि आश्चर्य दाटले होते. कारण लोकांमध्ये आयुर्वेदिक डॉक्टर म्हणजे ‘दही’ या अनेकांना प्राणप्रिय असलेल्या पदार्थांचा विरोधी पक्ष असाच समज असतो. म्हणूनच मी त्याला ‘उन्हाळ्यात दही खा’ असं सांगितल्यावर त्याचा चेहरा आश्चर्यचकित झाला. ‘दही’ हा पदार्थ प्रत्येक वेळी निषिद्ध असतोच, असे नाही. किमान उन्हाळ्यातील ऋतुचर्येत तर तो नक्कीच आक्षेपार्ह नाही.

दह्यासारखे आंबट, स्निग्ध गुणाचे पदार्थ आपली चव आणि भूक वाढवतात. शरीरातली रूक्षताही कमी करतात. म्हणूनच दही किंवा दहीसाखर या काळात आवर्जून घ्यावे. दह्याप्रमाणेच आंबट चवीचा असा मोरांबासुद्धा घेण्यास हरकत नाही. आमसुलाचे सारसुद्धा उन्हाळ्यात उपयोगी आहे. टोमॅटोचे सूप हादेखील असाच एक उपयुक्त पदार्थ ! टोमॅटोचा सॉससुद्धा या काळात सेवन करावा. आंबटगोड चवीचे ताकही नियमित घ्यावे.

निसर्गसुद्धा या काळात करवंदे, कैरी, कोकम अशी आंबट चवीची फळे पुरवत असतो. कैरीचे लोणचे किंवा कायरस करून घ्यावा. नुसती कैरी मिठाबरोबर खाण्यानेही फायदा होत असतो. कोकम सरबत हा तर या काळातला सर्वमान्य पदार्थ !या काळात आंबट असलेली आणखी दोन उपयुक्त फळे म्हणजे लिंबू आणि आवळा ! लिंबाचे लोणचे, लिंबाचे सरबत घ्यावे. आवळासुद्धा मोरावळा स्वरूपात खूपच फायदेशीर आहे. आवळा अतिशय थंड असल्याने आवळ्याचे सरबतसुद्धा घरात असावे. कैरी, लिंबू किंवा अन्य पदार्थांच्या लोणच्यांच्या सेवनामुळे त्यांच्यातीलआंबटपणा व खारटपणा दोन्हीचा फायदा या काळात शरीराला मिळत असतो. गाजर, फ्लॉवर अशा भाज्यांचे ‘मिक्स व्हेज’ लोणचेदेखील घेता येईल.

या ऋतूत भाज्यांमध्ये चाकवत, पालक, चुका, माठ, तांदुळजा, राजगिरा अशा पालेभाज्या असाव्यात. बटाटा, सुरण, बीट, रताळी, गाजर यांसारखी कंदमुळेही आहारात घ्यावीत. भेंडी, पडवळ, दोडका, घोसाळी, तोंडली, कोबी, फ्लॉवर अशा फळभाज्यांचाही समावेश जेवणात असावा.

जेवणामध्ये डाळीचे पदार्थ शक्यतो टाळावेत. कारण बहुधा सर्वच प्रकारच्या डाळी रूक्षता वाढवतात. त्यातल्या त्यात वापरच करावयाचा झाल्यास मुगाची डाळ वापरावी. कारण तुलनेने ती कमी रूक्ष आहे. शिवाय थंड गुणाची असल्याने उन्हाळ्यात अधिकच फायदेशीर आहे.

शरीराला स्निग्धता पुरवण्याच्या दृष्टिकोनातून स्वयंपाकात तेलाचा वापर किंचित अधिक प्रमाणात करायला हवा. याच हेतूने साजूक तुपाचे असलेले महत्त्व आपण पूर्वी पाहिलेच आहे.ग्रीष्म ऋतूमध्ये पचनशक्ती कमी झालेली असते. म्हणूनच शक्यतो या काळात पचायला जड असणारा मांसाहार टाळलेलाच बरा ! मांसाहार करावयाचा झाल्यास मासे, कोंबडी, खेकडा यांचे मांस घ्यावे, तेही अल्प प्रमाणात ! मांसाहार करण्यापेक्षा नुसते मटन किंवा चिकन सूप घेणे या काळात अधिक चांगले ठरते.

ग्रीष्म ऋतू बाधू नये, यासाठी अतिशय उपयोगी पडणारा आहारीय पदार्थ म्हणजे ‘कांदा’ ! कांदा अतिशय थंड गुणाचा असल्याने त्याचा समावेश आहारात करायलाच हवा. कांदा नुसता खाणे किंवा भाजून खाणे हितावह आहे. अन्य पदार्थांबरोबर कांदा शिजवून खाण्यासही हरकत नाही. कांद्याची कोशिंबीर हा चविष्ट पदार्थही जेवणात वरचेवर असावा. या सगळ्या आहाराप्रमाणेच उन्हाळ्यात महत्त्वाचा असतो तो ‘द्रवाहार’! त्याविषयी आणि उन्हाळ्यातील वर्ज्य पदार्थांविषयी चर्चा आपण ‘उन्हाळ्यातील पेयपान‘ या लेखात केलेले आहे.

डॉ . मयुरेश आगटे