हिवाळ्यातील थंडीच्या कडाक्यात सर्वच सृष्टी गारठून गेलेली असते. सगळ्या वृक्षवेली निष्पर्ण झालेल्या असतात. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत ही अवस्था टिकते. त्यानंतर वातावरणातील उष्णता वाढायला सुरुवात होते. सर्व झाडांना नवीन पालवी फुटते. आंबा, फणस अशा वृक्षांना मोहोर येतो. बकुळीसारख्या फुलांचा सुगंध दरवळू लागतो. यातच भर पडते ती कोकिळेच्या मधुर कूजनाची ! मित्रांनो, सृष्टीला नवचैतन्य देणारा हा ‘ऋतुराज’ म्हणजे ‘वसंत ऋतू !’ आपल्या आरोग्य प्रवासात आपण आता ‘वसंत ऋतुचर्ये’चे वळण घेणार आहोत.
हा वसंत ऋतू बाह्यसृष्टीप्रमाणेच आपल्या शरीरातसुद्धा बदल घडवतो. हिवाळ्यातील कडक थंडीमुळे शरीरात कफाचा संचय झालेला असतो. वातावरणातील गारठ्याने हा साठलेला कफदोष गोठलेल्या स्वरूपात असतो. वसंत ऋतूमध्ये वाढलेल्या उष्णतेमुळे हा गोठलेला कफ पातळ होण्यास सुरुवात होते. त्यामुळेच कफप्रकोप होतो. गोठलेला बर्फ जसा उष्णतेने पातळ होतो, त्याप्रमाणेच शरीरात हे कार्य घडते. थंडी कमी झाल्याने त्या काळात वाढलेली पचनशक्ती आता हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते. वातावरणातील हळूहळू वाढणाऱ्या उष्णतेने शरीरातील बलाचा ऱ्हास होण्यास वसंतात सुरुवात होते. वाढणाऱ्या उष्म्यामुळे थकवा येणे, उत्साह कमी होणे अशी आपली अवस्था होते.
या सगळ्यांचा विचार करून या ऋतूमध्ये पचण्यास हलका असा आहार घ्यावयास हवा. गव्हाची पोळी, ज्वारीची, बाजरीची किंवा नाचणीची भाकरी घ्यावी. भात हा कफाचे प्रमाण वाढवणारा असल्याने त्याचे प्रमाण कमी असावे. गहू, तांदूळ, ज्वारी आदी धान्ये वापरताना ती जुनीच वापरावीत. नवीन धान्ये कफ वाढवणारी असल्याने त्यांचा वापर टाळावा. नवीन धान्य वापरणे अपरिहार्य असल्यास आधी भाजून घ्यावे आणि नंतर वापरावे. असे भाजून घेण्यामुळे त्यांच्यातील कफ वाढवण्याचा गुणधर्म कमी होतो. शिवाय नवीन धान्य पचायलाही हलके बनते.
या ऋतूमध्ये तिखट, कडू आणि तुरट चवींचे पदार्थ अधिक प्रमाणात खावेत. कारण असे पदार्थ कफ कमी करतात. कडू, तिखट पदार्थांचा उपयोग भूक वाढवण्यासाठीही होतो. म्हणूनच स्वयंपाकात आले, मिरची, पुदिना, लसूण, हिंग, मिरे, दालचिनी, तमालपत्र, मोहरी अशा पदार्थांचा मुक्तहस्ते वापर करावा. सर्वच मसाल्याचे पदार्थ यासाठी उपयुक्त आहेत. तांदुळजा, पडवळ, वांगी, शेवगा, मुळा अशा भाज्यांचा आहारात समावेश असावा. कारले, मेथी अशा कडू चवींच्या भाज्यांचा या ऋतूत नित्य वापर करणे हितावह आहे.
तूर, मूग, मसूर अशी कडधान्ये कफ कमी करणारी, पचावयास हलकी असल्याने त्यांचे सेवन करावे. मुगाची खिचडी, मुगाचे लाडू असे पदार्थ करून खाण्यासही हरकत नाही. कुळथाचे कढण, कुळथाचे वरण, कुळथाचे पिठले अशा विविध स्वरूपात कुळथाचा वापरही उपयुक्त आहे. जवस, कारळे असे पदार्थही आहारात असणे लाभदायी आहे.
फळांमध्येसुद्धा तुरट रसाची फळे हितकर असतात. निसर्ग ही गरज पूर्ण करतो ती ‘कवठाच्या’ फळातून ! आपण एरवी कधीही कवठाची फळे खात नाही. पण ती तुरट, पचायला हलकी, कफ कमी करणारी असल्याने या वसंत ऋतूत त्यांचा मुबलक प्रमाणात उपयोग करता येतो. या गुणधर्मांच्या दृष्टीने कवठाची कच्ची फळे अधिक उपयुक्त आहेत. या काळात येणाऱ्या ‘महाशिवरात्री’ व्रतामध्ये म्हणूनच कवठाची फळे समाविष्ट झाली. त्या निमित्ताने या फळांचे सेवन घडते. कवठाचा गर नुसता खाणे, कवठाच्या गराची चटणी किंवा काही ठिकाणी कवठाची बर्फी करूनही कवठाचा आहारात समावेश करतात.
महाशिवरात्रीला कवठाचीच फळे घेण्यास जसे ‘शास्त्रीय’ कारण आहे, तसेच त्या दिवशी उपास करण्यातही शास्त्रीयत्व लपले आहे. या काळात पचनशक्ती हळूहळू कमी होण्यास सुरुवात झालेली असते. म्हणूनच त्यावर अधिक ताण यापुढच्या काळात देता कामा नये, याचे द्योतक म्हणून या दिवशी ‘उपवास’ करण्यात येतो. थोडक्यात, संपूर्ण वसंत ऋतूत कवठाचा आस्वाद घेणे आणि आहारावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.
डॉ . मयुरेश आगटे