आयुष्याच्या कॅनव्हासवर आपण खरं तर रोज तेच तेच चित्र काढत असतो. आपलं रोजचं आयुष्य इतकं चाकोरीबद्ध असतं की, त्याचा अधून-मधून कंटाळा यायला लागतो. अशा नेहमीच्या चित्रात आनंदाचे वेगवेगळे रंग भरतात ते रंगपंचमीसारखे सण ! ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’ असं म्हणत साक्षात भगवान श्रीकृष्णापासून खेळली जाणारी ‘रंगपंचमी’ आणि आपलं मातीशी असणारं नातं अधिकच दृढ करणारं ‘धूलिवंदन’ असे दोन सण आपण वसंत ऋतुमध्ये साजरे करतो. या निमित्ताने या रंगीबेरंगी सणांविषयी आपण गप्पा मारणार आहोत.
खरं तर रोजच्या जीवनात आपण स्वच्छतेकडे लक्ष देत असतो. आपल्या घरात कोठेही धूळ साठणार नाही, याची दक्षता घेतो. बाहेरून घरात आल्यावर हात- पाय स्वच्छ धुतल्याशिवाय आपण इतर कोणतेही काम करत नाही. यामागेही हातपायाला लागलेली धूळ, माती, इतर अस्वच्छ गोष्टी निघून शरीर स्वच्छ व्हावे हाच हेतू असतो. लहान मुलांमध्ये तर याबाबत खूपच काळजी घेतो. मग प्रश्न असा निर्माण होतो की, एरवी स्वच्छतेची एवढी काळजी घेणारे आपण धूलिवंदनाला बरोबर उलटे आचरण का करतो ? या दिवशी तर पाण्यात चिखल किंवा माती कालवून ती एकमेकांच्या अंगाला लावतो. इतकंच नव्हे, तर दिवसभर ती मिरवतोसुद्धा !
असा सण याच काळात साजरा करण्यामागेही शास्त्रीय कारण लपलेले आहे. फेब्रुवारी महिन्यातील वसंत ऋतूमध्ये ऊन वाढायला सुरुवात होते. मार्च महिन्यात ही उन्हाची तीव्रता अधिकच जाणवायला लागते. वाढणाऱ्या उष्म्याचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो. त्यामुळे आपल्या अंगातील उष्णता वाढून अंगाची लाही होणे असे त्रास सुरू होतात. अशा वेळी अंगाला गारवा मिळावा, यासाठी उपयोगी पडते ती ‘माती ! माती मुळातच थंड गुणाची असते. त्यात पाणी मिसळल्यावर त्यात अधिकच गारवा निर्माण होतो. अशा रीतीने ‘थंड गुणाचा’ चिखल अंगावर लावल्यामुळे त्वचेवर गारवा निर्माण होतो. दाहापासून त्वचेचे संरक्षण होते. उष्णतेमुळे त्वचेवर पुरळ उठणे, फोड येणे असे त्रास उत्पन्न झाल्यासही त्याचा उपयोग होत असतो. अर्थात, यासाठी वापरावयाची माती दगड, मुरूम, रेती असे पदार्थ नसलेली असावयास हवी. माती घेताना मुलायम, फारशी चिकट नसलेली घेणे अपेक्षित आहे. माती खूप चिकट असल्यास त्यात थोडी रेती मिसळावी. त्यामुळे तिचा चिकटपणा कमी होऊन त्वचेवर लेप लावणे सोपे जाते. माती घेताना त्यात प्राण्यांचे मल, मूत्र, केरकचरा नसावेत.
या ऋतूत जसा या मातीच्या लेपाचा उपयोग होतो, तसाच अनेक व्याधींतही चिकित्सा म्हणून उपयोग केला जातो. निसर्गोपचार चिकित्सा पद्धतीमध्ये याचा विशेष उपयोग करतात. विशेषतः पित्ताच्या व्याधीमध्ये हे विशेष लाभदायी आहे. जेव्हा पित्तामुळे शिरःशूल असतो, त्या वेळी कपाळावर असा लेप करावा. त्वचेवर मुका मार लागून येणारी सूज व वेदना कमी करण्यासाठी मातीचा लेप लावतात. त्वचा भाजली असता होणारा दाह ओल्या मातीमुळे थांबतो. पोटदुखीमध्ये नाभिप्रदेशी असा लेप फायदेशीर आहे. संधिशूल, पक्षाघात अशा व्याधींमध्ये काही वेळा ओझोनमिश्रित ओल्या गरम मातीचा उपयोग केला जातो. मातीचा लेप साक्षात त्वचेवर लावतात किंवा कापडाच्या घडीमधील दोन पदरांत मातीचा थर ठेवतात व ती कापडाची पट्टी जरूर तेथे त्वचेवर ठेवतात. अर्थात, जेव्हा व्याधीसाठी ही चिकित्सा करायची असते तेव्हा वैद्यकीय सल्ल्यानेच करणे इष्ट आहे.
या ऋतूमध्ये उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी दुसरा आवश्यक पदार्थ म्हणजे ‘पाणी’ ! अंगावर पाणी शिंपडल्याने उन्हामुळे तडकणाऱ्या त्वचेचे रक्षण होते. अंगावर शीतलता निर्माण होते. उन्हामुळे सगळ्यांनाच थकवा येतो. अंग गळून जाते. कामाचा उत्साह राहात नाही. अशा वेळी पाण्याच्या स्पर्शामुळे तजेला येतो. त्वचेवर सतत येणारा घाम चिकटून न बसता निघून जातो आणि हे सगळे उद्देश साध्य व्हावेत, म्हणूनच आपण ‘रंगपंचमी’ साजरी करतो. शरीराला आवश्यक असणारी पाण्याची गरज भागवणे हा त्याचा प्रमुख हेतू आहे. त्यात रंगांची उधळण अधिकच आनंद निर्माण करते. म्हणूनच या काळात हा सण आपल्या परंपरेने समाविष्ट केला. या संदर्भात एक महत्त्वाची काळजी घेणे आजच्या काळात महत्त्वाचे आहे. ते म्हणजे हल्ली रंगांचा होणारा वापर. अनेकदा बाजारातील रंगांमध्ये हानिकारक केमिकल्स असतात. त्यांचा संपर्क आल्यामुळे त्वचेवर अॅलर्जी होणे, फोड येणे असे त्रास होतात. रंग डोळ्यांत गेल्यास या नाजूक अवयवालाही इजा होण्याची दाट शक्यता असते. असे रंग वापरणे टाळायलाच हवे. त्याऐवजी हळद, सोनकाव, मंजिष्ठा, केशर अशा सुरक्षित पदार्थांचा नक्कीच वापर करता येईल.
म्हणूनच पाण्याचा उपयोग पाणी शिंपडणे, ओले कापड अंगावर गुंडाळणे, टबबाथ यांसारखी साधने वापरूनही करता येईल. किंबहुना पाण्याची बचत ही काळाची गरज असल्याने पाण्याचा अनावश्यक खर्च या साधनांमुळे निश्चितपणे टाळता येईल. अशा रितीने ‘शास्त्रशुद्ध’ आधार असणारे हे सगळे सणवार आपल्या आयुष्यात आनंद निर्माण करतातच. पण त्यात आरोग्य टिकवणे हादेखील मुख्य उद्देश असतो.
डॉ . मयुरेश आगटे