रंगपंचमीच्या विविध रंगांत न्हाऊन निघाल्यानंतर आपल्या सगळ्यांना वेध लागतात ते नववर्षाच्या स्वागताचे ! भारतीय परंपरेप्रमाणे नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच ‘गुढीपाडवा’ ! या दिवशी गुढीच्या रूपात नववर्षाच्या पहिल्या सूर्याचे स्वागत केले जाते. सकाळी लवकर उठून कडूनिंबाची पाने व साखरेची गाठी बांधलेली गुढी उभारून आपण नववर्षाचा पहिला दिवस साजरा करतो आणि या आनंदात भर घालतो, पाडव्याच्या दिवशीचा घरातला एखादा गोड पदार्थ !
गुढीपाडव्याची ही परंपरा आपण शतकानुशतके पाळत आहोत. या परंपरेचा विचार करताना सहज लक्षात आलं की नववर्षाचं स्वागत करण्याची आपली परंपरा आणि इतर जगाची परंपरा यात प्रचंड फरक आहे. ३१ डिसेंबरला ‘ज्या’ पद्धतीनं नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं, तसं करणं आमच्या संस्कृतीलाही शक्य नव्हतं का ? एरवी आपण कोणाचंही स्वागत कडू पदार्थाने केल्याचं आठवत नाही. मग ज्याच्यावर संपूर्ण सृष्टीचक्र अवलंबून आहे, अशा सूर्याच्या स्वागताला साखरेच्या गाठींबरोबर कडू चवीचा कडूनिंब का वापरतात ? असा पदार्थ आपण इतर कोणत्याच सणावाराला वापरत नाही. मग नेमक्या गुढीपाडव्याला-वर्षाच्या पहिल्या दिवसाला असं आपण शेकडो वर्षं का करत आहोत ? जेव्हा अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सुरू केला, त्या वेळी त्याचे उत्तर सापडले ‘आयुर्वेदात !’
कारण गुढीपाडव्याची अशी परंपरा निर्माण करतानासुद्धा आरोग्याचा विचार प्रामुख्याने केला आहे. शरीर निरोगी असेल, तरच नववर्षाचे स्वागत आणि नववर्षाची सुरुवात आनंदाने करता येईल. ही सुरुवात निरोगी, आरोग्यदायी करण्याच्या दृष्टीनेच कडूनिंब, साखर या पदार्थांची गुढीमध्ये वर्णी लागली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने
या परंपरेमागचे शास्त्रीयत्व आपण पाहणार आहोत:
चैत्रातल्या या प्रतिपदेपर्यंत सूर्याचे उत्तरायण सुरू होऊन बराच काळ लोटलेला असतो. साहजिकच आता उन्हाची तीव्रता जाणवत असते. आगामी दोन-अडीच महिने ही तीव्रता अधिकच वाढणार असते. या वाढणाऱ्या उष्णतेचा सृष्टीतीलच एक घटक असणाऱ्या आपल्या शरीरावरही परिणाम घडतो. त्यामुळे वातावरणातील उष्णतेबरोबरच अंगातील उष्णताही वाढते. यातूनच अंगाची लाही होणे, उष्णतेमुळे घामोळ्या येणे किंवा अंगावर पुरळ उठणे अशा अनेकविध तक्रारी निर्माण होतात. शरीरात वाढणारी उष्णता रक्तालाही बिघडवण्याची शक्यता असते. यातूनच पिंपल्स, गळू होणे, उन्हामुळे नाकातून किंवा अन्य मार्गातून रक्तस्राव होणे असे त्रास होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात भूकही मंदावलेली असते. या सगळ्या आरोग्यास बाधा आणणाऱ्या प्रश्नांवर उत्तम उत्तर असते, ते म्हणजे ‘कडूनिंब’ !
कडू चवीचा कडूनिंब थंड गुणाचा असल्याने उष्णतेच्या सर्वच विकारांवर उत्तम औषध आहे. म्हणूनच चैत्र, वैशाख या उन्हाळ्याच्या काळात त्याचा वापर करावा. कडूनिंबाचे चूर्ण अंगाची आग कमी करते. रक्त शुद्ध करणारे उत्तम औषध असल्याने त्यामुळे त्वचेवर उठणारे फोड कमी होतात. घामोळ्यांमुळे होणारी आग कडूनिंब कमी करतो. त्याचप्रमाणे त्वचेला खाज सुटत असल्यासही त्याचा चांगला उपयोग होतो. उष्णतेमुळे शरीरातून रक्तस्राव होत असल्यास तो त्वरित थांबवण्याची ताकद कडूनिंबात आहे. कडूनिंबाचा यकृतावरसुद्धा चांगला परिणाम होतो. त्यामुळे यकृताचे कार्य सुधारून या काळात निसर्गत:च कमी होणारी भूक वाढण्यास उपयोग होतो. पोटात आग पडणे, अम्लपित्त या आजारातही त्याचा उपयोग होतो. उन्हाळ्यात अनेकदा अन्न बाधते. विशेषतः बाहेरचे पदार्थ खाल्ल्यावर असा त्रास अधिक होतो. असा त्रास कमी करण्याकरताही कडूनिंब उपयुक्त आहे. म्हणूनच या काळात त्याचे महत्त्व आहे.
गाठींमध्ये असणारी गोड चवीची साखरसुद्धा कडूनिंबाच्या कामाला उपयुक्त ठरत असते. या साखरेच्या गोडव्यामुळे शरीराचा थकवा दूर केला जातो. साखरेची गाठी चघळल्याने तोंडाला कोरड पडणे, वारंवार तहान लागणे अशी लक्षणेही कमी होतात. साखरेचा गोडवा शरीरातील सर्व पेशींना टवटवीतपणा आणतो. कडूनिंबामुळे शरीरात वातदोष वाढण्याची शक्यता असते. साखरेमुळे त्याचा प्रतिबंध होतो. खरं तर गोड पदार्थ पचायला जड असतात, पण साखर गोड असूनही त्याला अपवाद आहे. म्हणूनच या ऋतूमध्ये तिचे सेवन त्रासदायक ठरत नाही. या सगळ्या आरोग्यदायी घटकांचा विचार ‘गुढी’च्या परंपरेत आहे. आपल्या अशा सगळ्याच परंपरा शतकानुशतके टिकून आहेत. कारण त्याला शास्त्रीय आधार आहे म्हणून !
डॉ . मयुरेश आगटे