गुढी पाडव्याला नववर्षाचं स्वागत अतिशय उत्साहाने केल्यानंतर चैत्र महिना सुरू होतो. यापुढचे दोन-अडीच महिने संपूर्ण भारतासाठी अतिशय कठीण कालावधी असतो. कारण या काळात असणारा उन्हाळा ! भारत हा उष्ण कटिबंधात असणारा देश. साहजिकच उन्हाळ्याची तीव्रता आपल्या देशात जास्त असतेच. त्यातच गेल्या काही वर्षांत वृक्षतोड, प्रदूषण अशा विविध कारणांमुळे उन्हाळ्याची तीव्रता सरासरीपेक्षा जास्त असल्याचे आढळते. म्हणूनच यापुढचा काळ हा आग ओकणाऱ्या, भाजून काढणाऱ्या सूर्याशी सामना करण्याचा असतो. या संपूर्ण काळालाच ‘ग्रीष्म ऋतू’ असे म्हणतात. खरं तर ग्रीष्माची सुरुवात वैशाखापासून अपेक्षित असते. मात्र, सद्य:काळात हा वैशाखाचा वणवा चैत्रापासूनच भडकायला सुरुवात होते.
ग्रीष्मातील प्रखर, तीव्र सूर्यसंतापामुळे सृष्टी भाजून निघत असते. उष्णतेमुळे तलाव, निर्झर, ओढे आटतात. नद्या कोरड्या पडतात. सर्वत्र रूक्षता वाढायला सुरुवात होते. नेमके हेच चित्र सृष्टीतील घटक असणाऱ्या आपल्या शरीरातही दिसायला लागते. शरीरातील पाण्याचा अंश कमी होऊन रूक्षता वाढायला सुरुवात होते. बाह्य वातावरणाप्रमाणेच शरीरातील उष्णताही वाढते. असह्य उकाड्यामुळे सतत घाम येतो. या घामामुळेही शरीरातील पाण्याचा साठा सतत कमी होत असतो.
थंडीमध्ये घाम न आल्यामुळे शरीरातील उष्णता कोंडली जाते व त्यामुळे पचनशक्ती वाढते. उन्हाळ्यात बरोबर विरुद्ध घटना घडते. सततच्या घामाद्वारे शरीरातील उष्णता बाहेर पडून त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या पचनशक्तीवर घडतो. त्यामुळे साहजिकच पचनशक्ती या ऋतूत कमी होते. बाह्य उष्णतेमळे शरीरातील बल कमी होते. त्यामुळे कोणतेही श्रम न करता थकवा, दौर्बल्य जाणवते. शरीरातील रूक्षता वाढत असल्याने वातदोषाचा संचयही या काळात घडत असतो. वाढणारी उष्णता, कमी झालेली पंचनशक्ती, निसर्गत:च होणारी बलहानी, साठणारा वातदोष या सगळ्यांचाच विचार करून या ऋतूतील आहारविहार ठरवायला लागतो.
या दृष्टीने जो काही आहार घ्यायचा तो पचायला हलका हवा. आहारात पोळी, भात, भाकरी यांचा समावेश असावा. भातासाठी लाल तांदूळ, साठेसाळीचा तांदूळ वापरण्यास हरकत नाही. भाकरीसाठी ज्वारी, नाचणी यांचा उपयोग करावा. बाजरी ही त्यामानाने अधिक उष्ण व रूक्ष असल्याने भाकरीकरता बाजरीचा उपयोग टाळलेला बरा ! पोळीसाठी आपण गहू वापरतो. पोळीप्रमाणेच गव्हाचे फुलकेदेखील या ऋतूत जरूर घ्यावेत.
उन्हाळ्यात तिखट, कडवट, तुरट चवीच्या पदार्थांचा वापर कमी करावा. कारण असे पदार्थ शरीरातील रूक्षता अधिकच वाढवतात. शिवाय वातदोषाचा संचयही अशा पदार्थांमुळे वाढतो. त्याऐवजी आहारात गोड, आंबट, खारट पदार्थ अधिक असावेत. कारण हे पदार्थ वातदोष कमी करतात. गोड पदार्थांमुळे या ऋतूत होणारा बलक्षयही टाळला जातो. शरीरातील वाढलेली उष्णताही गोड पदार्थ कमी करतात. या दृष्टीने नुसत्या पोळीपेक्षा साखरेची पोळी किंवा शिऱ्याची पोळी आहारात असावी. भातामध्येसुद्धा साखर-भात, काश्मिरी पुलाव असे प्रकार घेण्यास हरकत नाही. आहारात दूध व दुधापासून तयार होणारे बर्फी, खव्याचे पदार्थ, श्रीखंड, बासुंदी असे गोड पदार्थही जरूर घ्यावेत. मात्र, या ऋतूत पचनशक्ती कमी असल्याने त्यांचे प्रमाण भरपेट असे न घेता थोड्या कमी प्रमाणात घ्यावेत. त्यामुळे पचनशक्तीवर अधिक ताण पडत नाही. गव्हाची किंवा रव्याची खीर, शेवयांची खीर, शिरकुर्म्यासारखे पदार्थ यांचा आहारात वापर उपयुक्त आहे. नुसते मसाला दूध किंवा दूध-साखरसुद्धा जरूर घ्यावे. शरीरातील वाढणारी रूक्षता कमी करण्यासाठी दुधाप्रमाणेच उपयोग होतो तो ‘साजूक तुपाचा’ ! म्हणूनच या ऋतूमध्ये जेवणात नुसते तूप किंवा तूप- गूळ यांचा उपयोग करावा. तुपामुळे पचनशक्ती वाढते. सर्व शरीराला ताकद मिळते. अंगात वाढणारी उष्णता कमी होते. शरीरातला वातदोषही कमी होतो. दोन्ही जेवणांत किमान दोन ते चार चमचे साजूक तपाप्रमाणेच लोणी, साय-साखर असे पदार्थही आहारात असावेत.
डॉ . मयुरेश आगटे
सूचना : हा आहार आयुर्वेदाचा विचार करून तयार केला आहे. कोणत्याही प्रकारचा आजार असलेल्या व्यक्तींनी ह्या आहाराचा अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा.