परवा दारावरची बेल वाजली. दारात शेजारची स्नेहल चिंताक्रांत चेहऱ्याने उभी होती. तिनं पटकन मला घरी नेल. स्नेहलच्या वडिलांना जेवण झाल्यावर घशाशी येऊन उलटीसारखी संवेदना होत होती. ‘यांना जेवल्यावर वरचेवर असा त्रास होतो. आज खूपच त्रास होतोय, म्हणून तुम्हांला बोलावलं,’ स्नेहलच्या आईनं सांगितलं. औषधाने त्या वेळी त्यांचा हा त्रास थांबला; पण ही तक्रार कायमची बंद व्हावी, असं या वेळी मात्र त्यांना मनापासून वाटलं. म्हणूनच लगेच दुसऱ्याच दिवशी सगळं कुटुंबच माझ्यासमोर येऊन बसलं. तपासणी केल्यावर स्नेहलच्या वडिलांमध्ये मला कोणताच दोष आढळला नाही. मात्र, नीट चौकशी केली असता दोष आढळला तो त्यांच्या जेवणाच्या पद्धतीत ! भराभर जेवणे, गप्पा मारत जेवणे, जेवताना सारखी ऊठबस करणे अशा सवयी त्यांच्याप्रमाणेच आपल्यातल्या अनेकांना असतात. म्हणूनच ठसका लागणे, पोट एकदम गच्च होणे, उचकी लागणे, जेवल्यावर लगेच घशाशी येणे, क्वचित उलटी होणे अशा तक्रारी वारंवार निर्माण होताना दिसतात. या केसच्या निमित्ताने जेवणाच्या योग्य पद्धतीविषयी अधिक चर्चा आपण करणार आहोत.
वेगवान आयुष्य हा आमच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग बनला आहे, यात शंकाच नाही. याचाच एक परिणाम दिसतोय ‘वेगवान जेवणाच्या’ रूपात ! जेवण म्हणजे जणू इतर कामांसारखाच एक ‘उरकण्याचा’ विषय. यामुळे अन्न नीट न चावताच पोटात अक्षरशः ढकलले जाते. साहजिकच अन्नाचे बारीक कण होणे, त्यावर लाळेची क्रिया होणे या पुढील पचनास आवश्यक गोष्टी घडतच नाहीत. यामुळे चांगले पचन होत नाही. भराभर खाताना चुकून एखादा अन्नाचा कण श्वासनलिकेत जाऊन ठसका लागण्याची शक्यता असतेच. भराभर जेवल्यामुळे अन्न घशाशी येणे असेही त्रास होतात. म्हणूनच नेहमी सावकाश जेवणे अपेक्षित आहे. ‘एक घास बत्तीस वेळा चावावा’ ते यासाठीच! ही अतिशयोक्ती वाटली तरी त्यामागचे मर्म लक्षात घ्यावयास हवे. पटापट जेवणामागे कामाची धांदल, अपुरा लंचटाइम, उशीर होणे अशी कारणेही लोक अनेकदा सांगत असतात, जी टाळणे सहज शक्य आहे. किंबहुना आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे.
सावकाश जेवावे या वाक्याने अत्यंत संथ गतीने रेंगाळत जेवणेही अपेक्षित नाही. त्यामुळे अन्न गार होते. असे अन्न पचायला जड असते, असा उल्लेख आपण पूर्वी पाहिलाच आहे. शिवाय या पद्धतीने जेवण केल्यास अन्नपचन नीट घडत नाही. म्हणूनच खूप घाईने जेवणे किंवा अतिशय संथगतीने जेवण करणे दोन्ही गोष्टी टाळायला हव्यात. योग्य गतीने जेवण करण्यासाठी साधारण पंधरा ते वीस मिनिटे कालावधी जेवणास द्यायला हवा.
अनेकांना जेवताना गप्पा मारत जेवणाची सवय असते, तर खूप लोक स्वयंपाकघर ते टीव्ही अशा येरझारा घालतच जेवताना हल्ली दिसतात. खरं तर जेवताना यासारख्या सगळ्याच हालचाली टाळणे गरजेचे असते. असे सांगण्यामागे शास्त्रीय कारण आहे. जेव्हा शरीराची कोणतीही हालचाल सुरू असते, त्या वेळी रक्ताचा पुरवठा वाढवला जातो. पचनक्रियेतही पोटातील अवयवांची हालचाल चालू असते. म्हणूनच अन्नसेवन केल्यानंतर या अवयवांकडे रक्तपुरवठा सुरू होतो. अशा वेळी आपण जर बोलणे, चालणे, हसणे किंवा इतर कोणतीही हालचाल केली तर साहजिकच हे काम करणाऱ्या इतर अवयवांकडे त्याच वेळी रक्तपुरवठा द्यावा लागतो. म्हणूच जर जेवताना इतर कोणतीही हालचाल न करता जेवण केले, तर पोटातील अवयवांकडेच अधिकाधिक रक्तपुरवठा होतो.
साहजिकच या अवयवांचे काम चांगले होते व यामुळे पचनही उत्तम होते. याचसाठी ‘एका जागी बसून जेवावे’ व जेवताना गप्पागोष्टी आदी गोष्टी टाळणे हिताचे आहे. बुफेसारखे उभे राहून जेवणे अयोग्यच आहे. हे सगळे उद्देश साध्य व्हावेत, म्हणून आपल्याकडे काही पद्धती अस्तित्वात आल्या. जेवताना मांडी घालून बसणे ही यातीलच एक पद्धत ! यामुळे आपोआपच जेवताना शरीराला स्थिरता येते. योगासनांपैकी वीरासन, वज्रासन यांसारखी आसने पचनासाठी उत्तम असतात. ‘मांडी’ या स्थितीत या आसनांमुळे मिळणारे लाभ बऱ्याच अंशी प्राप्त होतात.
जेवणानंतर वामकुक्षी घेण्याचा प्रघात आहे. यामागेही शरीराची अन्य धावपळ न होता पचनास वेळ मिळावा हेच धोरण आहे. अर्थात, दुपारच्या कामाच्या वेळेत वामकुक्षी घेणे बऱ्याचदा शक्यही नसते; पण जेवल्यावर किमान अर्धा ते एक तास धावपळ करू नये हा त्यामागील उद्देश लक्षात घ्यावयास हवा. या सगळ्या ‘टिप्स’ नित्य माहितीच्या, साध्या-सोप्या वाटत असल्या तरी त्यात आरोग्याकडे नेणारा मोठा अर्थ लपलेला आहे.
डॉ . मयुरेश आगटे
सूचना :- कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर या लेखात नमूद केलेली सर्व पदार्थ आपले वय आणि आपल्या प्रकृतीनुसार वापरा