आपण आयुर्वेदीय

Ayurveda and meals

आपल्या दिनक्रमात अनेक गोष्टी सवयीच्या झालेल्या असतात. इतक्या की ‘असंच का करायचं ?’ हा प्रश्न आपल्या बुद्धिवादी मनाला अनेकदा पडत नाही. आपले रोजचे जेवण, ही अशीच एक नित्य गोष्ट ! आपल्या जेवणाच्या पदार्थांमध्ये एक विशिष्ट शिस्त असते. पोळी, भाजी, भाकरी, चटणी, आमटी, कोशिंबीर, मीठ, तूप या सगळ्या पदार्थांचे प्रमाण ठरलेले असते. चटणीच्या प्रमाणात भाजी किंवा भाजीच्या प्रमाणात चटणी असा फेरफार झाल्याचे इतक्या शेकडो वर्षांत कधीच ऐकिवात नाही. हे विशिष्ट ‘अलिखित’ नियम नक्की आले कोठून ? स्वतःच्या आवडीप्रमाणे हवा तो पदार्थ हव्या त्या प्रमाणात खाल्ला तर बिघडलं कुठे ?

मित्रांनो, आम्ही रोज दोनदा जेवतो; पण आम्हांला असे प्रश्नच कधी पडत नाहीत. हे प्रश्न उपस्थित करण्याचं कारण म्हणजे आपल्या जेवणामागे आयुर्वेदाचे नियम आहेत, याची आपल्याला कल्पनाही नसते. आम्ही जेवणाच्या रूपात रोजच्या रोज आयुर्वेदाचे ‘एकनिष्ठेने’ आचरण करतो; पण नकळतपणे ! याचसाठी रोजच्या जेवणातला आयुर्वेद आपण बघणार आहोत. जेवणाच्या योग्य पद्धतीविषयी चर्चा केल्यानंतर आपण आता जेवणाच्या ‘मेनूकडे’ वळणार आहोत.

आहाराचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम आयुर्वेदाने ‘चवी’च्या स्वरूपात मांडला. गोड, आंबट, खारट, तिखट, तुरट, कडू अशा चवींचे पदार्थ आपल्या शरीरावर विशिष्ट परिणाम घडवतात. या परिणामांचा विचार, पदार्थांचे गुणधर्म व पोषण हे आहाराचे मुख्य ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपल्या जेवणात विविध पदार्थांना स्थान देण्यात आले आहे.

शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी गहू, तांदूळ यांचे पदार्थ अतिशय उपयुक्त असतात. म्हणून पोळी, भात यांचे प्रमाण अधिक असते. निरनिराळ्या भाज्यांमधूनही हा उद्देश साध्य होतो. म्हणूनच त्यांचेही प्रमाण अधिक असते. गोड पदार्थ शरीराचे उत्तम पोषण करतात, म्हणून ‘गोडाच्या जेवणाचे’ आपल्याकडे महत्त्व आहे.

अन्न नीट जाण्यासाठी भूक चांगली लागणे, तोंडाला उत्तम चव असणे या गोष्टी गरजेच्या असतात. यासाठी उपयोग होतो आंबट चवीच्या पदार्थांचा ! लिंबू, आमसूल, चिंच, लोणचे अशा आंबट पदार्थांचा स्वयंपाकात, आहारात याचसाठी उपयोग केला जातो.

स्वयंपाक कितीही उत्तम केला, तरी मिठाशिवाय त्याची चव कळत नाही. म्हणून आपण मीठ वापरतो. पण त्याच्या अतिरेकामुळे त्वचारोग, रक्तदाब वाढणे, अंगावर सूज येणे, तहान लागणे, बलक्षय आदी विविध आजार निर्माण होतात. म्हणूनच त्याचे अतिसेवन होऊ नये. याचसाठी आपल्या ताटात सगळ्यात कमी प्रमाणात मीठ आले.

लोणच्याप्रमाणेच पानाची डावी बाजू आपण चटणी, कोशिंबीर अशा ‘तोंडी लावणे’ पदार्थांनी सजवतो. यापैकी चटणी हा प्रकार तिखट चवीचा असतो. तिखट असल्यास जिभेचे चव कळण्याचे कार्य उत्तम होते.तसेच तिखट पदार्थ भूक वाढवण्यासाठी, पचनशक्ती चांगली राहण्यासाठी उपयुक्त असतात. जेवणानंतर वाढणारा कफदोष कमी करतात. या सगळ्या उपयोगांमुळेच चटणीसारखे पदार्थ जेवणात समाविष्ट झाले. मात्र, अतिप्रमाणात तिखट पदार्थ शरीराची झीज करतात, तसेच रूक्ष असल्याने शरीराचे शोषण करतात, म्हणून त्यांचे प्रमाण आहारात कमी ठेवले जाते. किंवा चटणीत तेल घालून कोरडेपणा कमी केला जातो.

दही आयुर्वेदाला सर्वथा वर्ज्य नाही. मात्र, जास्त दही खाल्ल्याने अनेकविध विकार होण्याची शक्यता असते. म्हणूनच बहुतांशी दही हा ‘बेस’ धरून करण्यात येणारी कोशिंबीरही आपण पानात कमी प्रमाणात वाढतो.

‘साजूक तूप’ हा आयुर्वेदाप्रमाणे अत्यंत उपयोगी असा पदार्थ आहे. दुधापासून तूप करेपर्यंत लागणाऱ्या विविध प्रक्रियांमुळे हा पदार्थ अत्यंत सारभूत असा बनतो. म्हणूनच अगदी ‘चमचाभर’ साजूक तूपसुद्धा शरीराच्या पोषणासाठी उपयुक्त ठरत असते.

यातील प्रत्येक पदार्थाच्या चवीचे शरीरावर अनुकूल परिणाम दिसत असतात. म्हणूनच सर्व प्रकारच्या आहाराची शरीराला आवश्यकता असते. भारतीय जेवणात इतक्या विविध पदार्थांची वर्णी लागली ती यासाठीच ! मात्र, केवळ स्वत:च्या आवडीपोटी एखादाच पदार्थ खाण्याची सवय अनेक लोकांना असते. मग अशा वेळी तो विशिष्ट पदार्थ अतिप्रमाणात खाण्याचे व इतर आवश्यक पदार्थ न मिळाल्याचे असे दुहेरी दुष्परिणाम शरीरावर दिसायला लागतात. म्हणून आपण रोज जे जेवण घेतो, त्यातील प्रत्येक पदार्थ हा ‘शास्त्रसंमत’ असल्याने तेवढ्याच प्रमाणात घेणे आरोग्यास हितकारक आहे.

डॉ . मयुरेश आगटे

पचनी पडलं तर पवित्र झालं

Healthy eating practices

परवा दारावरची बेल वाजली. दारात शेजारची स्नेहल चिंताक्रांत चेहऱ्याने उभी होती. तिनं पटकन मला घरी नेल. स्नेहलच्या वडिलांना जेवण झाल्यावर घशाशी येऊन उलटीसारखी संवेदना होत होती. ‘यांना जेवल्यावर वरचेवर असा त्रास होतो. आज खूपच त्रास होतोय, म्हणून तुम्हांला बोलावलं,’ स्नेहलच्या आईनं सांगितलं. औषधाने त्या वेळी त्यांचा हा त्रास थांबला; पण ही तक्रार कायमची बंद व्हावी, असं या वेळी मात्र त्यांना मनापासून वाटलं. म्हणूनच लगेच दुसऱ्याच दिवशी सगळं कुटुंबच माझ्यासमोर येऊन बसलं. तपासणी केल्यावर स्नेहलच्या वडिलांमध्ये मला कोणताच दोष आढळला नाही. मात्र, नीट चौकशी केली असता दोष आढळला तो त्यांच्या जेवणाच्या पद्धतीत ! भराभर जेवणे, गप्पा मारत जेवणे, जेवताना सारखी ऊठबस करणे अशा सवयी त्यांच्याप्रमाणेच आपल्यातल्या अनेकांना असतात. म्हणूनच ठसका लागणे, पोट एकदम गच्च होणे, उचकी लागणे, जेवल्यावर लगेच घशाशी येणे, क्वचित उलटी होणे अशा तक्रारी वारंवार निर्माण होताना दिसतात. या केसच्या निमित्ताने जेवणाच्या योग्य पद्धतीविषयी अधिक चर्चा आपण करणार आहोत.

वेगवान आयुष्य हा आमच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग बनला आहे, यात शंकाच नाही. याचाच एक परिणाम दिसतोय ‘वेगवान जेवणाच्या’ रूपात ! जेवण म्हणजे जणू इतर कामांसारखाच एक ‘उरकण्याचा’ विषय. यामुळे अन्न नीट न चावताच पोटात अक्षरशः ढकलले जाते. साहजिकच अन्नाचे बारीक कण होणे, त्यावर लाळेची क्रिया होणे या पुढील पचनास आवश्यक गोष्टी घडतच नाहीत. यामुळे चांगले पचन होत नाही. भराभर खाताना चुकून एखादा अन्नाचा कण श्वासनलिकेत जाऊन ठसका लागण्याची शक्यता असतेच. भराभर जेवल्यामुळे अन्न घशाशी येणे असेही त्रास होतात. म्हणूनच नेहमी सावकाश जेवणे अपेक्षित आहे. ‘एक घास बत्तीस वेळा चावावा’ ते यासाठीच! ही अतिशयोक्ती वाटली तरी त्यामागचे मर्म लक्षात घ्यावयास हवे. पटापट जेवणामागे कामाची धांदल, अपुरा लंचटाइम, उशीर होणे अशी कारणेही लोक अनेकदा सांगत असतात, जी टाळणे सहज शक्य आहे. किंबहुना आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे.

सावकाश जेवावे या वाक्याने अत्यंत संथ गतीने रेंगाळत जेवणेही अपेक्षित नाही. त्यामुळे अन्न गार होते. असे अन्न पचायला जड असते, असा उल्लेख आपण पूर्वी पाहिलाच आहे. शिवाय या पद्धतीने जेवण केल्यास अन्नपचन नीट घडत नाही. म्हणूनच खूप घाईने जेवणे किंवा अतिशय संथगतीने जेवण करणे दोन्ही गोष्टी टाळायला हव्यात. योग्य गतीने जेवण करण्यासाठी साधारण पंधरा ते वीस मिनिटे कालावधी जेवणास द्यायला हवा.

अनेकांना जेवताना गप्पा मारत जेवणाची सवय असते, तर खूप लोक स्वयंपाकघर ते टीव्ही अशा येरझारा घालतच जेवताना हल्ली दिसतात. खरं तर जेवताना यासारख्या सगळ्याच हालचाली टाळणे गरजेचे असते. असे सांगण्यामागे शास्त्रीय कारण आहे. जेव्हा शरीराची कोणतीही हालचाल सुरू असते, त्या वेळी रक्ताचा पुरवठा वाढवला जातो. पचनक्रियेतही पोटातील अवयवांची हालचाल चालू असते. म्हणूनच अन्नसेवन केल्यानंतर या अवयवांकडे रक्तपुरवठा सुरू होतो. अशा वेळी आपण जर बोलणे, चालणे, हसणे किंवा इतर कोणतीही हालचाल केली तर साहजिकच हे काम करणाऱ्या इतर अवयवांकडे त्याच वेळी रक्तपुरवठा द्यावा लागतो. म्हणूच जर जेवताना इतर कोणतीही हालचाल न करता जेवण केले, तर पोटातील अवयवांकडेच अधिकाधिक रक्तपुरवठा होतो.

साहजिकच या अवयवांचे काम चांगले होते व यामुळे पचनही उत्तम होते. याचसाठी ‘एका जागी बसून जेवावे’ व जेवताना गप्पागोष्टी आदी गोष्टी टाळणे हिताचे आहे. बुफेसारखे उभे राहून जेवणे अयोग्यच आहे. हे सगळे उद्देश साध्य व्हावेत, म्हणून आपल्याकडे काही पद्धती अस्तित्वात आल्या. जेवताना मांडी घालून बसणे ही यातीलच एक पद्धत ! यामुळे आपोआपच जेवताना शरीराला स्थिरता येते. योगासनांपैकी वीरासन, वज्रासन यांसारखी आसने पचनासाठी उत्तम असतात. ‘मांडी’ या स्थितीत या आसनांमुळे मिळणारे लाभ बऱ्याच अंशी प्राप्त होतात.

जेवणानंतर वामकुक्षी घेण्याचा प्रघात आहे. यामागेही शरीराची अन्य धावपळ न होता पचनास वेळ मिळावा हेच धोरण आहे. अर्थात, दुपारच्या कामाच्या वेळेत वामकुक्षी घेणे बऱ्याचदा शक्यही नसते; पण जेवल्यावर किमान अर्धा ते एक तास धावपळ करू नये हा त्यामागील उद्देश लक्षात घ्यावयास हवा. या सगळ्या ‘टिप्स’ नित्य माहितीच्या, साध्या-सोप्या वाटत असल्या तरी त्यात आरोग्याकडे नेणारा मोठा अर्थ लपलेला आहे.

डॉ . मयुरेश आगटे

सूचना :- कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर या लेखात नमूद केलेली सर्व पदार्थ आपले वय आणि आपल्या प्रकृतीनुसार वापरा

1

सावकाश खा

Benefits of eating slowly

डॉक्टर, खरं तर माझीच चूक झाली. गेले महिनाभर अनेक लग्नकार्यं होती. वरचेवर पाहुणे मंडळीही ये-जा करत होती. त्यामुळे जवळजवळ रोज सुग्रास जेवणच चालू होतं. या सगळ्या भानगडीत जिभेवर ताबाच राहायचा नाही हो ! अक्षरश: पोटाला तडस लागेपर्यंत जेवण व्हायचं. त्याचेच परिणाम भोगतोय. करपट ढेकर, वरचेवर घशाशी आंबट येणं असा त्रास वारंवार होतोय !’

आंबलेल्या चेहऱ्याने मकरंद माझ्याशी बोलत होता. मी म्हटलं, ‘अरे चालायचं ! केव्हा तरी असं खाणं होणारच.’ मकरंद म्हणाला, ‘ते मलाही कळतंय हो डॉक्टर ! पण यापुढे तरी, असा त्रास न होण्यासाठी काय करायला हवं ? केव्हातरी फंक्शनला भरपेट खाणं होतंच; पण एरवीच्या दिवशी तरी नक्की किती खाणं करावं, जेणेकरून असे त्रास होणार नाहीत.’ मकरंदने आहारासंदर्भात अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला होता. मकरंदच्या निमित्ताने मी तुम्हा सगळ्यांशीच याविषयी चर्चा करणार आहे. आहारासंदर्भात पचनशक्ती, जेवणाची वेळ यांचा विचार पाहिल्यानंतर ‘आहाराचे प्रमाण’ हा पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे.

याचा विचार करण्यापूर्वी थोडीशी पचनक्रियेची माहिती घेऊ. अन्न सेवन केल्यानंतर अन्न जठरात जाते. अन्नाचे पचन होण्यासाठी अन्नाचे कण वेगळे होणे आवश्यक असते. यासाठी जठरात अन्न घुसळून बारीक केले जाते. नंतर पुढे विविध पाचक स्राव अन्नात मिसळून या बारीक कणांचे पचन करतात. पचनामध्ये अन्नावर अशा रीतीने घुसळणे, बारीक करणे, स्राव मिसळणे अशा विविध प्रक्रिया होत असतात. या सगळ्या गोष्टी उत्तम रीतीने पार पडण्यासाठी पोटातील अवयवांमध्ये पुरेशी ‘जागा’ मिळणे आवश्यक असते. एक साधं उदाहरण बघा. स्वयंपाक करताना भांड्यात एखादा पदार्थ काठोकाठ भरला, तर आपल्याला ढवळणे, घुसळणे, परतणे अशा कोणत्याच प्रक्रिया नीटपणे त्या पदार्थावर करता येत नाहीत. शिवाय जेवढे पदार्थाचे प्रमाण अधिक तेवढा शिजवणाऱ्या अग्नीचा वापर अधिक करावा लागतो.

शिवाय पदार्थ शिजवण्यासाठी वेळही अधिक लागतो. म्हणूनच स्वयंपाक आपण नेहमीच कोणत्याही भांड्यातील काही भाग रिकामाच ठेवतो. • व्यवहारातील हीच गोष्ट आपल्या पोटालाही लागू पडते. जर पोट ‘तुडुंब’ भरले तर जठर आदी अवयवांमध्ये घडणाऱ्या घुसळणे, पचन करणे यांसारख्या क्रिया नीट होत नाहीत. अन्नपचन करणाऱ्या पचनशक्तीवरही ताण पडतो. यामुळे विलंब तर लागतोच; शिवाय या सगळ्या प्रकारात अन्नाचे पचन व्यवस्थित न होण्याची शक्यताही नाकारता येत नाही आणि म्हणूनच जेवणाचे प्रमाण ‘मर्यादित’ असणे आवश्यक आहे.

‘मर्यादित’म्हणजे नेमके किती ? कारण या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळे येईल. पूर्वी आपण पचनशक्तीचे प्रकार पाहिले होते. त्यानुसार प्रत्येकाचे आहाराचे प्रमाण बदलते, असाही उल्लेख आपण पाहिला होता. पण या प्रश्नाचेही सुंदर विश्लेषण ग्रंथकारांनी केले आहे.

त्यानुसार प्रत्येक व्यक्तीने पूर्ण पोटभर न जेवता आपल्या क्षमतेच्या तीन चतुर्थांशच आहार सेवन करावा. एक चतुर्थांश भाग रिकामा ठेवावा. या रिकाम्या जागेमुळे पचनाशी संबंधित सगळ्या क्रिया सुलभपणे पार पडून पचन व्यवस्थित होते. प्रत्येकाने आपल्या आहाराच्या क्षमतेप्रमाणे याचा विचार करणे आवश्यक आहे. ही गोष्ट व्यवहारात आणणेही सहज शक्य आहे. समजा एखाद्या मनुष्याचे चार पोळ्यांनी पोट गच्च भरत असेल, तर त्याने अडीच ते तीनच पोळ्या घ्याव्यात. असा प्रत्येकाने स्वत:च्या आहाराचा अभ्यास केला तर ‘तीन चतुर्थांश’ म्हणजे नक्की किती ? हे आपल्याला सहज ठरवता येईल. ‘मर्यादित आहार’ म्हणताना प्रत्येक व्यक्तीच्या पचनशक्तीनुसार स्वतंत्र पण अचूक उत्तर देता येईल. थोडक्यात, नेहमी दोन घास कमी घ्यावेत. जेवण झाल्यावर पानावरून उठताना अजूनही थोडीशी भूक आहे, असे जाणवायला हवे.

आपण जेवताना नेहमी ‘सावकाश जेवा’ असं म्हणतो. यात सावकाश याचा अर्थ संथ गतीने, हळूहळू जेवण करावे असा आहेच; पण त्याचबरोबर ‘स-अवकाश’ म्हणजे जेवताना पोटात थोडी मोकळी जागा ठेवून जेवण करा, असाही दुसरा महत्त्वाचा अर्थ लपलेला आहे.

डॉ . मयुरेश आगटे

सूचना :- कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर या लेखात नमूद केलेली सर्व पदार्थ आपले वय आणि आपल्या प्रकृतीनुसार वापरा

3

भूतधात्री निद्रा

Importance of Sleep

मित्रांनो, दिनचर्येनंतर आता आपण रात्रीशी संबंधित असे आचरण पाहणार आहोत. त्यातही रात्रीच्या आहारासंदर्भात पूर्वी आपण चर्चा केली आहेच. त्यामुळे रात्रीचर्येतील महत्त्वाचा भाग उरतो तो ‘निद्रेचा’ ! म्हणूनच यापुढे आपण निद्रेविषयी चर्चा करणार आहोत.

रोजच्या दैनंदिन जीवनात शरीराच्या विविध हालचाली घडत असतात. अनेकविध शरीर क्रियांमध्ये शरीरघटकांची ऊर्जा खर्ची पडत असते. ही ऊर्जा भरून येऊन पुन्हा ताजेतवाने होण्यासाठी शरीराला गरज असते ‘विश्रांतीची’ ! आणि ही गरज पूर्ण केली जाते ती ‘निद्रेमधून’ ! झोपेच्या काळात शरीराच्या सर्व हालचाली थांबल्यामुळे साहजिकच रोजच्या दैनंदिन जीवनातील खर्च झालेली ऊर्जा भरून काढण्यास वेळ मिळतो. शरीरातील सर्वच पेशी पुन्हा टवटवीत होतात. शरीराला पुन्हा दुसऱ्या दिवशी काम करण्यास यामुळे ताकद, उत्साह मिळतो.

निद्रेचा शरीराला मिळणाऱ्या फायद्यांबरोबर आणखी एक महत्त्वाचा फायदा होतो. तो म्हणजे मनाला मिळणारी विश्रांती ! आपले मन निसर्गत:च अतिशय चंचल आहे. त्यामुळे प्रत्येक क्षणाला मनाचे काम चालूच असते. दिवसभरात शरीराला एकवेळ विश्रांती देता येईल, परंतु मनाला आराम मिळणे महाकठीण! ‘झोप’ ही अशी एकमेव गोष्ट आहे, जी मनालाही विश्रांती देते. त्यामुळे मनालाही टवटवीतपणा येतो. झोपेमुळे अशा रीतीने शरीर आणि मन दोन्हींना तजेला येतो. पुन्हा काम करायला उभारी येते. म्हणूनच ग्रंथात झोपेला ‘भूतधात्री’ म्हणजे मनुष्याचे धारण करणारी, सांभाळणारी असे नाव दिले आहे. अर्थात, हे सगळे फायदे होण्यासाठी ‘पुरेशी’ म्हणजे साधारणत: सात ते आठ तास झोप घेणे हितावह आहे. यात वय आणि व्यवसाय यानुसार फरक पडू शकेल. लहान मुले निसर्गत:च अधिक झोपतात.

शरीराची वाढ होण्यासाठी ही अधिक झोप महत्त्वाची असते. वार्धक्यात होणारी शरीराची झीज कमी होण्यासाठी, तसेच त्या वयातील दौर्बल्य कमी व्हावे म्हणून आठ तासांहून थोडे अधिक झोपल्यास हरकत नाही. त्याचप्रमाणे वृद्धांनीही आजारपणामुळे थकवा आला असेल तर अशा व्यक्तीनेही जास्त वेळ झोपणे फायदेशीर ठरते.

ज्यांचे व्यवसाय शारीरिक कष्टाचे असतील, त्यांनीसुद्धा या ‘साधारण’ वेळेपेक्षा अधिक झोप घ्यावी. याउलट, बैठे काम करणाऱ्या व्यक्तींना फारसे श्रम होत नसल्याने थोडी कमी झोपही पुरेशी ठरू शकेल. ‘पुरेशी’ हे प्रमाण प्रत्येक व्यक्तीप्रमाणे वेगळे असू शकते. काहींना सहा तासांहून कमी झोपही पुरेशी ठरते. तर काहींना आठ तास ‘किमान’ झोप लागेल. म्हणूनच प्रत्येकाने थोडासा स्वत:चा अभ्यास करून हे प्रमाण ठरवायला हवे.

झोप जशी योग्य प्रमाणात हवी त्याचप्रमाणे ‘नीट’ झोप होणेही महत्त्वाचे ! नीट म्हणजे शांत, गाढ झोप लागणे. सकाळी उठल्यावर खऱ्या अर्थाने ‘फ्रेश’ वाटणे म्हणजे नीट झोप होणे. सारखी स्वप्ने पडणे, थोड्याशा आवाजानेही झोप ‘डिस्टर्ब’ होणे किंवा काही कारणाने जाग आल्यावर पुन्हा झोप न येणे अशा अनेक गोष्टींमुळे झोपेत अडथळे येतात. मग ‘खरी’ झोप मिळत नाही. यातूनच फ्रेश न वाटणे निरुत्साह, झापड येणे अशी लक्षणे निर्माण होतात. याचसाठी ‘पुरेशी’ आणि ‘नीट’ झोप मिळणे आवश्यक आहे.

रात्रीची वेळ ही झोपेची नैसर्गिक वेळ आहे. दिवसभर शिणल्यानंतर रात्री आपोआप झोप येते. अर्थात, रात्रीची वेळ म्हणताना रात्री ‘उशिरा’ झोपणे अपेक्षित नाही. जितके लवकर झोपता येईल तितके चांगले ! साधारण नऊ-दहाच्या आसपासची ही वेळ असावी. मात्र हल्ली टीव्हीमुळे अकरा-बारापर्यंत आपण जागे असतो. यामुळे शरीर आणि मन यांची अकारण ओढाताण होत असते. उशिरा झोपण्याची सवय झालेली असली तरी कळत-नकळत त्याचा परिणाम होत असतोच ! आणि मग नीट झोपच होत नाही अशी तक्रार ऐकू येते. आरोग्याच्या दृष्टीने ‘किती तास झोप झाली’ याच्याइतकेच ‘कोणत्या वेळी झोप झाली’ हेही महत्त्वाचे आहे. या दृष्टीने ‘उशिरा झोपून उशिरा उठणे’ हितकर नसून ‘लवकर झोपून लवकर उठणे’ श्रेयस्कर आहे. लवकर उठण्याचे फायदे आपण पूर्वी दिनचर्येच्या सुरूवातीच्या भागात पाहिलेच आहेत. मात्र काही वेळा अपरिहार्य कारणामुळे जागरण करावे लागतेच. याविषयी चर्चा पुढील लेखात…..

डॉ . मयुरेश आगटे

सूचना :- कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर या लेखात नमूद केलेली सर्व पदार्थ आपले वय आणि आपल्या प्रकृतीनुसार वापरा

3

दिनचर्येमधला आवश्यक भाग ‘व्यायाम’

Importance of Exercise

परवा माझ्या एका मित्रानं मला घरी तपासायला बोलावलं. गेल्यानंतर त्याच्या खोलीत लावलेल्या एअरकंडिशनच्या थंडगार हवेनं माझं स्वागत केलं. ‘चहा घेऊन मग बोलू’ – इति. माझा मित्र. ‘ठीक आहे’, ‘म्हणून मी घरातील स्वयंपाकघरात जायला निघालो. त्यावर तो म्हणाला, ‘अरे, कुठं इतकं ‘लांब’ जायचं. मी इथेच मागवतो.’ त्याच्या हाताशी असणारी बेल दाबताक्षणीच चहा आमच्या पुढ्यात आला. चहा घेताना ऑफिसमध्ये इतकं काम असतं की तास न् तास खुर्चीवरून मी उठतही नाही, असं अभिमानानं तो सांगत होता. या अभिमानात त्यानं नवीन घेतलेल्या ए. सी. कारचं कौतुकही भर घालत होतं. गप्पा मारता-मारता त्यानं फोनवरच ऑफिसची दोन-तीन कामं उरकली. इतक्यात घराच्या मागे असलेल्या स्टोअरमधून सर्व ‘जीवनावश्यक’ वस्तू घरपोच मिळाल्याची वर्दी त्याला मिळाली. हा सगळा प्रकार मी शांतपणे पाहात होतो. ‘बघितलंस, कसं सगळं मी एका जागेवरून ऑपरेट करतो’. माझ्या मित्राचे गौरवपूर्ण शब्द. हे ऐकल्यावर व एकूणच परिस्थिती पाहिल्यावर मला वेगळं काही तपासण्याची गरजच भासली नाही. मी त्याला म्हटलं, ‘तुला पचनाचा त्रास आहे. वारंवार गॅसेस होतात. तुझं वजनही बऱ्यापैकी वाढत चाललंय. त्यामुळे चार जिने चढल्यावरही तुला दम लागतो. रक्तातील साखर व कोलेस्टेरॉलसुद्धा वाढल्याची शक्यता आहे.’

माझं सगळं बोलणं ऐकून तो चाटच पडला. कारण याच तक्रारी सांगण्यासाठी त्यानं मला बोलावलं होतं. मित्रांनो, मला वाटतं, माझा हा मित्र आपल्या सगळ्यांचंच प्रतिनिधित्व करतो. असंख्य सुविधांमुळे आपल्या जीवनात शारीरिक कष्टच उरलेले नाहीत. यातूनच मधुमेह, स्थूलता, पचनविकृती, कोलेस्टेरॉल, सांधेदुखी असे अनेकविध, ‘सुखवस्तू’ आजार ‘बसल्या-बसल्या’ निर्माण होतात. यांना वेळीच प्रतिबंध करण्यासाठी दिनचर्येतील अत्यावश्यक अशा व्यायामाविषयी आता आपण चर्चा करणार आहोत.

‘व्यायाम’ शब्दाची व्याख्या करताना ग्रंथात ‘शारीरिक कष्ट होतील असे काम’ अशी केली आहे. या शारीरिक कष्टांमुळे असंख्य फायदे होत असतात. व्यायामामुळे शरीराला हलकेपणा येतो. शरीरात वाढणारी चरबी कमी होण्यासाठी व्यायामाइतके उत्तम औषध नाही. वाढलेल्या चरबीमुळेच वजन वाढणे, वाढलेल्या वजनामुळे गुडघेदुखी, थकवा, निरुत्साह अशा तक्रारी निर्माण होतात. त्याचप्रमाणे मधुमेह, कोलेस्टेरॉल वाढणे, ब्लड प्रेशर वाढणे यांची शक्यताही अनेकपटीने वाढते. व्यायामामुळे अतिरिक्त चरबी झडल्याने वजन आटोक्यात राहते. साहजिकच इतर व्याधी होण्याची शक्यताही टाळली जाते.

व्यायामामुळे शरीरातील स्नायू बळकट होतात. स्नायूंमध्ये निसर्गत:च असणारी लवचिकता टिकून राहण्यास उपयोग होतो. स्नायू पिळदार होतात. यामुळे आपली ताकद वाढण्यास उपयोग होतो. आपली कष्ट करण्याची सहनशीलता व्यायामामुळे वाढते. केवळ कष्टच नव्हे, तर ऊन, थंडी, वारा, पाऊस अशा बाह्य वातावरणातील घटकांशी सामना करण्याची क्षमताही व्यायामाने वाढते. व्यायामात होणाऱ्या शरीराच्या हालचालींमुळे रक्ताभिसरण सुधारण्यासाठी उपयोग होतो. प्रत्येक पेशीला, अवयवांना पुरेपूर रक्त मिळाल्यामुळे त्यांचे आरोग्य उत्तम राहते.

व्यायामाचा अनुकूल परिणाम होतो तो आपल्या पचनशक्तीवर. व्यायामात घडणाऱ्या शरीरश्रमांमुळे अन्नाची गरज वाढते. साहजिकच व्यायामामुळे भरपूर भूक लागते. भुकेमुळे अधिक अन्नसेवन व त्याचे पचनही व्यवस्थित घडते. त्यामुळे शरीराचे पोषण उत्तम प्रकारे होत असते. अपचन, अजीर्ण, गॅसेस यांसारख्या तक्रारी व्यायामामुळे निर्माण होत नाहीत.

शरीर व मन दोन्ही घटकांचे स्वास्थ्य एकमेकांवर अवलंबून असते. व्यायामामुळे येणारी शरीराची तंदुरुस्ती मनालाही बळ देते. शरीराला येणाऱ्या हलकेपणामुळे मनालाही उत्साह, स्फूर्ती मिळते. आजच्या धावपळीच्या युगात ‘सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट’ हे जगण्याचं सूत्र बनलं आहे. अशा परिस्थितीत व्यायामामुळे शरीर व मन हे दोन्ही ‘फिट’ राहण्यास मदत होत असते.

डॉ . मयुरेश आगटे

सूचना :- कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर या लेखात नमूद केलेली सर्व पदार्थ आपले वय आणि आपल्या प्रकृतीनुसार वापरा

1

हिवाळ्यातील विहार

Winter Routine

निसर्गत:च बाहेरचा गारवा शरीराला ताकद देत असतो. त्यातच वाढलेल्या पचनशक्तीमुळे भरपूर भूक लागते. अन्नाचे पचनही व्यवस्थित होऊन शरीर अधिकच सुदृढ होण्यास उपयोग होत असतो.

आहाराप्रमाणे पाणीसुद्धा हवे तेवढे घेण्यास हरकत नाही. अर्थात या ऋतूत मुळात तहानच कमी लागत असल्याने तसा फारसा प्रश्नच येत नाही. थंडीचा विचार करता गरम चहा, कॉफी, गरम दूध अशी पेये घ्यावीत. कोल्ड्रिक्स, फ्रीज किंवा माठातले गार पदार्थ या ऋतूत वर्ज्यच करावेत.

आहाराप्रमाणेच या ऋतूमधील विहार हासुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. यामध्ये महत्त्वाचा भाग असतो, तो व्यायामाचा ! सकाळी उठून शरीराला हितकर ठरेल, असा कोणताही व्यायाम करावा, तोही अगदी भरपूर प्रमाणात ! या व्यायामाने कमावलेली शरीरसंपदा पुढे वर्षभर आरोग्य उत्तम राहण्यास साह्यभूत ठरते.

या ऋतुमधील अभ्यंगाचे महत्त्व आपण पाहिलेच आहे. अभ्यंगानंतर स्नानापूर्वी नागरमोथा, अर्जुन, कचोरा, वाळा, चंदन अशा द्रव्यांनी केलेले उटणे अंगावर चोळावे. यामुळे त्वचेवर शिल्लक असणारा तेलाचा अंश निघून जातो. या कामासाठी आवळ्याची पावडरसुद्धा उपयुक्त ठरते. यानंतर गरम पाण्याने स्नान करणे इष्ट आहे.

जे १२ महिने गार पाणी स्नानास वापरतात, त्यांनी किमान कोमट पाणी वापरावे. पण खूप गार पाणी पूर्णतः अयोग्यच ! अभ्यंगातील तेलाप्रमाणेच व्हॅसलिन, विविध क्रीम्स, लोशन्स किंवा जेल यांचाही उपयोग त्वचेवर करण्यास हरकत नाही. एकूणच त्वचा स्निग्ध राहणे महत्त्वाचे !

हिवाळा या ‘बलदायी’ ऋतूमध्ये आरोग्य वाढण्यासाठी अनेकविध औषधेही हातभार लावतात. शतावरी, अश्वगंधा, यष्टिमधु, विदारीकंद, कवचबीज, भुईकोहळा, तालीमखाना, बला, वाराहकंद, मुसळी अशा औषधांचा शरीरपुष्टीसाठी वापर करावा. अश्वगंधारिष्ट, द्राक्षारिष्ट, द्राक्षासव, शतावरी कल्प, अगस्ती रसायन, अश्वगंधादि लेह, ब्राह्म रसायन अशा अनेकविध ‘टॉनिक’ स्वरूपात असणाऱ्या औषधांचाही चांगला उपयोग होतो. याच काळात आवळ्यांची आवक होत असते. आवळ्यांपासून तयार केलेले च्यवनप्राशही उत्तम रसायन औषध आहे. अर्थातच, यापैकी कोणतेही औषध स्वत:हून घेण्यापेक्षा योग्य वैद्यकीय सल्ल्यानेच घेतलेले अधिक फायद्याचे ठरते.

थंडीपासून संरक्षण करण्यासाठी रेशमी, लोकरीचे उबदार कपडे वापरले पाहिजेत. शरीराचा जास्तीतजास्त भाग आच्छादित असायला हवा. स्वेटर्स, जाकीट, मफलर, हातमोजे, शाल यांचा नियमित वापर हवा. गाडीवर जाताना यांच्या वापराबरोबरच हेल्मेटही जरूर वापरावे. त्यामुळे बोचऱ्या थंडीपासून डोक्याचे संरक्षण होते. घरात उबदार वातावरण राहण्यासाठी रूम हीटर्सचा उपयोग स्वागतार्हच ! शिवाय वेखंड, अगरू, गुग्गुळ अशी द्रव्ये जाळून त्यांचा धूप करावा. बाजारात मिळणारी धूपकांडीसुद्धा याकरता अवश्य वापरावी. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसणेसुद्धा अतिशय हितकर आहे. फक्त या ऋतूत दिवसा झोप घेणे शक्यतो टाळावे. अन्यथा कफाचे विकार होण्याची शक्यता असते. तसेच बाह्य वातावरण पाहता एअरकंडिशन, कूलर यांचा वापर टाळलेलाच बरा !

डॉ . मयुरेश आगटे

सूचना :- कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर या लेखात नमूद केलेली सर्व पदार्थ आपले वय आणि आपल्या प्रकृतीनुसार वापरा

1

आला हिवाळा, आरोग्य सांभाळा

Hemant Rutu

सकाळी उशिरापर्यंत दिसणारे धुके, धुक्यातून वाट काढत येणारे सूर्याचे कोवळे किरण, उत्साह आणणारा वातावरणातला सुखद गारवा, गारव्यात हवीहवीशी वाटणारी रजईची ऊब ! आपल्या सगळ्यांनाच आवडणाऱ्या, प्रफुल्लित करणाऱ्या हिवाळ्याचे दिसणारे हे नेहमीच रूप. ऑक्टोबर हीटचा तडाखा नोव्हेंबरमध्ये कमी व्हायला लागतो आणि त्याची जागा हळूहळू गुलाबी थंडी घ्यायला लागते. या काळात सूर्याचे दक्षिणायन सुरू असल्याने त्यामुळे वातावरणातील उष्णता बरीचशी कमी होते. त्यामुळे हवेतील गारवा वाढतो. दिवसही लहान होत जातो व रात्र मोठी व्हायला लागते.

शरद ऋतुचर्या पाहताना ऑक्टोबर महिन्यात ‘पित्तप्रकोप’ असतो, असा उल्लेख आपण पाहिला होता. हिवाळ्यातील गारवा हा पित्तप्रकोप कमी करतो. या काळात वात व कफ हे दोषसुद्धा प्राकृत स्थितीत असतात. म्हणूनच या काळात रोग होण्याची शक्यताच कमी असते. शिवाय या काळात निसर्गत:च शरीराची ताकद वाढत असते. हिवाळ्याला ‘हेल्दी सीझन’ म्हणतात ते याचमुळे. आरोग्यासाठी म्हणूनच हा अतिशय उपयुक्त ऋतू आहे.

हिवाळ्यातील वातावरणाचा अनुकूल परिणाम होतो तो आपल्या ‘पचनशक्तीवर’. बाह्य गारव्याने शरीरावरील त्वचेचा संकोच होतो. त्यामुळे घाम येईनासा होतो. संकोचलेल्या त्वचेमुळे शरीरातील उष्णता कोंडली जाते. याचाच परिणाम म्हणून जठराग्नी किंवा पचनशक्ती अधिकाधिक वाढायला लागते. म्हणूनच या काळात भरपूर भूक लागते. ‘खाल ते पचवाल’ अशी स्थिती असते. म्हणूनच हिवाळ्यातील ऋतुचर्येतील महत्त्वाचा भाग म्हणजे भरपूर आहार घेणे. आहारात नेहमीच्या गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यांपासून तयार केलेल्या पोळी, भाकरी, भात यांचा समावेश असावाच. शिवाय मूग, मसूर, मटकी, वाटाणा, हरभरा, चवळी यांचे पदार्थही सेवन करावेत.

हिवाळ्यात शरीराचे बल वाढत असते. त्या दृष्टीने अतिशय उत्तम उपयोगी पडतात ते ‘उडीद.’ उडदाच्या डाळीपासून बनवले जाणारे वडे, लाडू आदी सगळेच पदार्थ या ऋतूत हितकारक आहेत. बटाटा, कांदा, फ्लॉवर, कोबी, गाजर, पडवळ अशा सर्व फळभाज्या, चाकवत, मेथी, पालक, शेपू आदी पालेभाज्या घेण्यास काहीच हरकत नाही. आहारात तेल, तूप यांचा मुक्तहस्ते वापर करावा. तेल, तूप यांचा वापर करून बनवलेले तळलेले चमचमीत पदार्थही यथेच्छ घ्यावेत. शेव, चिवडा, अनारसे, चकली, कडबोळी, करंज्या, लाडू, शंकरपाळी, चिरोटे, वडे या प्रकारचे विविध पदार्थ हिवाळ्यात स्वागतार्ह आहेत. आपण वर्षभर इतर सणांना असे विविध फराळाचे पदार्थ करत नाही. हिवाळ्यात येणाऱ्या दिवाळीला मात्र आवर्जून करतो. या परंपरेमागे आयुर्वेदात सांगितलेल्या हिवाळ्यातील ऋतुचर्येचे शास्त्रीय कारण आहे.

या ऋतूत गोड, खारट, आंबट, तिखट असे सगळ्याच चवींचे पदार्थ खावेत. पण शरीराची ताकद वाढण्यास अधिक चांगला उपयोग होतो तो गोड पदार्थांचा ! श्रीखंड, बासुंदी, गुलाबजाम, बर्फी, जिलेबी, शेवयाची खीर, गाजर हलवा, निरनिराळी मिठाई अशी सगळीच पक्वान्ने वरचेवर आहारात असावीत. तुलसी विवाहानंतर असणाऱ्या अनेक लग्नसमारंभातील पक्वान्नपूर्ण भोजनाचा पुरेपूर आस्वाद घ्यावा.

गोड पदार्थांप्रमाणेच शरीरबल वाढण्यासाठी उपयोगी ठरतो तो ‘मांसाहार !’ मटण, चिकन, त्यांचे सूप, मासे यांचा आहारात समावेश असावा. अंडी व त्यापासून बनणारे पदार्थही हितकर आहेत. ज्या व्यक्ती मांसाहार करत नाहीत, त्यांनी दूध, दुधाचे पनीर, खरवस, तूप, मलई असे पौष्टिक पदार्थ घ्यावेत.

आहारात आले, पुदिना, लसूण, कोथिंबीर, कढिपत्ता, लिंबू असे पदार्थ अवश्य हवेत. दालचिनी, वेलदोडा, तमालपत्र, जिरे, ओवा, मिरे, धने, केशर असे पदार्थही स्वयंपाकात मुक्तहस्ते वापरावेत. हे सगळे पदार्थ रुची वाढवतात. पचनशक्तीलाही मदत करतात. अन्नालाही चांगली चव व सुवास आल्यामुळे अन्नही या पदार्थांमुळे चविष्ट बनते.

या ऋतूमध्ये आनंद घेण्याचा आणखी एक आहारघटक म्हणजे ‘सुकामेवा !’ काजू, बदाम, मनुका, अक्रोड, बेदाणे, सुके अंजीर, खारीक असे सुकामेव्यातील पदार्थ शरीराची ताकद वाढवण्यास अत्यंत हितकर असतात. डिंकाचे लाडू, अहळीवाचे लाडू हे पदार्थही असेच पौष्टिक आहेत.. सफरचंद, केळी, पेरू, डाळिंब, पपई, संत्री, मोसंबी, चिकू, द्राक्षे, सीताफळ | अशा फळांचाही समाचार घेण्यास हरकत ना नाही. फळे ज्यूस, कोशिंबीर, रायते अशा कोणत्याही स्वरूपात घेता येतील.

आतापर्यंत सांगितलेले आहारघटक प्रत्येकाने स्वत:च्या सोईप्रमाणे सेवन करावेत. मात्र, भूक लागल्यावर दुर्लक्ष न करता तत्काळ काही खाणे महत्त्वाचे आहे. कारण अशा वेळी काही न खाल्ल्यास शरीराला अपाय होण्याची शक्यता असते.

डॉ . मयुरेश आगटे

सूचना :- कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर या लेखात नमूद केलेली सर्व पदार्थ आपले वय आणि आपल्या प्रकृतीनुसार वापरा

4

दिवाळीतील  अभ्यंगस्नान

Abhyangsnan

सुंदर, रमणीय पहाट ! दारात प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी, खिडक्यांमध्ये पणत्यांच्या रांगा, दिव्यांची रोषणाई, सोबत फटाक्यांची आतषबाजी ! सर्वत्र प्रसन्न वातावरण. घराघरातून पाहुण्यांचा स्नेहमेळा. प्रत्येकाच्या आनंदाला उधाण आलेलं; नवीन कपडेलत्ते, दागदागिने यांची या वातावरणात अधिकच भर. अत्तरे, उदबत्ती यांचा पसरलेला सुवास. सोबत निरनिराळ्या गोड, तिखट अशा पदार्थांची लयलूट! अशी आनंददायी, चित्तवृत्ती उल्हसित करणारी दिवाळी !

दिवाळीतला पहिला नरकचतुर्दशीचा दिवस. पहाटे लवकर उठून आपण सगळे ‘अभ्यंगस्नान’ करतो. म्हणूनच या नरकचतुर्दशीचे औचित्य साधून आपण आज गप्पा मारणार आहोत ते ‘अभ्यंग’ या दिवाळीतल्या खास वैशिष्ट्याविषयी ! ‘दिवाळी’ हा सण येतो तो साधारणतः ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात ! अर्थात, पंचांगातील तिथींप्रमाणे बदल केव्हातरी घडतो, पण सहसा जेव्हा दिवाळी येते, त्या वेळेला वातावरणातील ऑक्टोबर हिटचं प्रमाण कमी झालेलं असतं. सूर्याचं दक्षिणायन सुरू असल्यामुळे हळूहळू दिवस लहान व रात्र मोठी व्हायला लागते. या काळात सूर्याचे किरण तिरके पडल्याने वातावरणातील उष्णता कमी होऊन थंडी पडायला सुरुवात होते. अशा गुलाबी थंडीच्या वातावरणात आमच्या दारात दिवाळी येते.

दिवाळीच्या वेळी बाह्य वातावरणातील थंडीचा विचार करूनच अभ्यंगस्नानाचा समावेश या सणात करण्यात आला. थंडीचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो. यामुळे त्वचा कोरडी पडते. थंडीचे प्रमाण वाढल्यास त्वचेला भेगा पडणे असाही त्रास शकतो. थंडीच्या या परिणामांपासून संरक्षण होण्यासाठी उपयोग होतो तो ‘अभ्यंगा’चा ! अभ्यंग म्हणजे त्वचेला तेल लावून मसाज करणे. अभ्यंगासाठी वापरण्यात येणाऱ्या तेलामुळे त्वचेचा कोरडेपणा जातो. त्वचेला स्निग्धता प्राप्त होते. थंडीमुळे आकसलेली त्वचा मऊ होऊन तिला सुकुमारत्व मिळते. त्वचेला बळकटी येते. तजेला, तरतरीतपणा मिळतो. त्वचेचा वर्ण सुधारण्यासाठीही अभ्यंगाचा चांगला उपयोग होत असतो. स्पर्श जाणण्याचे त्वचेचे काम अभ्यंगामुळे उत्तम प्रकारे होते. जसे-जसे वय वाढते, तसे त्वचेवर सुरकुत्या पडणे, शिथिलता येणे अशी ‘वृद्धत्वा’ची लक्षणे शरीरावर दिसू लागतात. अभ्यंगाचा उपयोग केल्याने अशी लक्षणे लवकर निर्माण होत नाहीत.

अभ्यंगाचे इतरही अनेक उपयोग आहेत. अभ्यंगात शरीरात ‘मुरणारे ‘ तेल स्नायूंना बळकटी देते. शरीराची ताकद वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. कुस्तिगीर व्यायामानंतर मसाज करून घेतात ते यासाठीच ! बाहेरच्या गारव्यामुळे शरीरातील वातदोष वाढतो. त्यामुळे थंडीत सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी असे वातदोषामुळे होणारे आजार हमखास डोकं वर काढतात. अभ्यंगामुळे हा वाढलेला वातदोष कमी होतो. साहजिकच त्याच्यामुळे होणारे आजारही कमी होतात. अभ्यंगामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. त्यामुळे बाह्य वातावरणातील गारव्याचा प्रतिकार होतो. शरीराचे श्रम, थकवा दूर होण्यासाठी हा तेलाचा मसाज उपयुक्त आहे. शिवाय यामुळे शरीराची कष्टाची कामे करण्याची ताकद वाढते. शरीरावर बाह्य आघात झाल्यास तो सहन करण्याची ताकद वाढते. अभ्यंगातील तेलाच्या स्निग्धतेमुळे शरीर लवचिक बनते. थंडीच्या काळात निसर्गत:च शरीराला बल मिळत असते. अभ्यंगातील तेलाचा मसाज निसर्गाला या कामात मदत करत असतो. गाडीला नियमित ‘ऑइलिंग’ केल्यामुळे गाडीची कार्यशक्ती, गाडीचे आयुष्य वाढते. अगदी त्याचप्रमाणे अभ्यंगामुळे आपली शरीराच्या गाडीची ताकद वाढते. म्हणूनच अभ्यंगामुळे आपले तारुण्य अधिकाधिक काळ टिकते.

अभ्यंगाचे इतके उपयोग आहेत म्हणूनच ग्रंथकारांनी केवळ थंडीतच अभ्यंगाचा उपयोग न करता वर्षभर उपयोग करण्यास सांगितले आहे. याचसाठी अभ्यंगाचा रोजच्या दिनचर्येत समावेश करण्यात आला. रोजच्या उपयोगासाठी खोबरेल तेल, तिळाचे तेल यांचा वापर करता येतो. बला तेल, नारायण तेल अशी औषधीसिद्ध तेलेही वापरण्यास हरकत नाही. दिवाळीत आपण सुगंधी तेल वापरतो. त्यामुळे मनालाही प्रसन्नता येते. असे सुगंधी तेलही वर्षभर वापरता येईल.

रोजच्या सकाळच्या घाईत असा अभ्यंग न जमल्यास रात्री शांतपणा असताना अगदी टीव्ही बघतसुद्धा अभ्यंग करता येईल. रोज खरं तर सर्वांगालाच असा तेलाचा मसाज आवश्यक असतो. अगदीच मसाज न जमल्यास किमान तेलाचा ‘हात’ तरी फिरवावा. सर्वांग अभ्यंग शक्य नसल्यास किमान डोके, पाय व कान यांना मात्र आवर्जून तेल चोळावे.

दिवाळीच्या निमित्ताने सुरू झालेल्या अभ्यंगाविषयी आणखीनही बरेच काही सांगायचे आहे. त्याविषयी चर्चा थोड्याच वेळात…

डॉ . मयुरेश आगटे

सूचना :- कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर या लेखात नमूद केलेली सर्व औषधे वापरा.

1

कोजागिरी पौर्णिमा आणि शरदाचे चांदणे

Kojagiri

दसरा, नवरात्र व त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या झेंडू, आपटा यांच्या पार्श्वभूमीवर आपण शरदऋतूविषयी गप्पा मारायला सुरुवात केली होती. आपल्या भारतीय परंपरांमागे असलेल्या शास्त्रीय दृष्टिकोनाची झलक या निमित्ताने आपण पाहिली. याच शरद ऋतुसंदर्भात आपण आज गप्पा मारणार आहोत, ते शरदाच्या चांदण्याच्या ‘प्रकाशात !’

दिवसभर कडक उन्हामुळे ऑक्टोबर महिन्यात सगळेच त्रस्त झालेले असतात. पावसाळ्यातील गारव्याच्या पार्श्वभूमीवर तर हा उकाडा अधिकच जाणवत असतो. या उकाड्याने होणाऱ्या त्रासाची भरपाई निसर्ग करतो ती रात्री सुंदर, मनोहर चांदण्याची बरसात करून ! ईतर कोणत्याही ऋतूमधील चांदण्यापेक्षा या ऋतूमधील ‘चांदणे’ खूपच नयनरम्य असते. ‘शरदाचे चांदणे’ असा वाक्यप्रचार रूढ झाला अशा चांदण्याच्या सुखद अस्तित्वामुळेच ! चांदणे हे नेहमीच ‘शीतल’ असते, पण तो शरदाच्या चांदण्यातील शीतलता काही औरच असते. या चांदण्याच्या शीतलतेचाही स्वास्थ्यरक्षणासाठी आयुर्वेदाने उपयोग करून घेतला, ‘कोजागिरी पौर्णिमेच्या रूपाने !

मागच्या लेखात या ऋतूमध्ये पित्तदोष वाढतो व त्यामुळे अंगाची आग होणे, रक्तस्त्राव होणे आदी आजार बळावतात, असा उल्लेख आपण पाहिला होता. बाह्य वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे आपल्या शरीरातील पित्त वाढते. अशा वाढलेल्या पित्ताला कमी करण्यासाठी उत्तम उपयोग होतो तो ‘दुधाचा’. दूध शीतल, उत्तम पित्तशामक असा आहारातला पदार्थ. म्हणूनच त्याचे सेवन या ऋतूमध्ये अत्यंत उपयुक्त असते. दुधाच्या पित्त कमी करण्याच्या कामाला आयुर्वेदाने जोड दिली, ती चांदण्याच्या शीतलतेची ! शरदाच्या चांदण्याच्या शीतलतेचा आपल्या शरीरावरही अनुकूल परिणाम घडतो. त्यामुळे दिवसा सूर्यसंतापामुळे वाढलेली उष्णता कमी व्हायला उपयोग होतो. या ऋतूत संपूर्ण आकाश चांदण्याने न्हाऊन निघालेले असते. अशा चांदण्यात दुधाचे सेवन म्हणजे आरोग्यरक्षणाकरता ‘दुग्ध-शर्करा’ योगच ठरतो. असे दूध घेताना त्यात भरपूर साखर घालावी. कारण साखर ही सुद्धा उत्तम पित्तशामक, शीतल अशी आहे. त्याचप्रमाणे बदाम, खारीक, पिस्ता असे पदार्थही दुधात घालावेत. या पदार्थांमुळे दिवसाच्या उष्णतेने आलेला थकवा दूर होण्यास मदत होते. शिवाय दुधाच्या ‘पौष्टिक’ कार्यालाही चांगलाच हातभार लागतो. वेलदोड्यासारखे पदार्थ पित्तशमनाबरोबरच दुधाला उत्तम सुगंध देण्याचेही काम करतात. दूध घेताना चांगले तापवून घ्यावे. कारण असे दूध पचण्यास हलके होते. चांगले तापवलेले दूध मग चांदण्यात निववण्यासाठी ठेवावे आणि नंतर त्याचा पिण्यासाठी उपयोग करावा. यामुळे चांदण्याच्या शीतलतेचा दुधावर अनुकूल परिणाम घडतो. म्हणूनच असे चांदण्यात घेतलेले दूध शरद ऋतूमधील पित्ताचे आजार कमी करायला उपयुक्त ठरते. त्याचप्रमाणे उकाड्यामुळे शरीराला येणारा थकवा दूर करून तजेला आणते.

हे सगळे उद्देश साध्य व्हावेत, यासाठी आयुर्वेदाने उपयोग करून घेतला, तो ‘कोजागिरी पौर्णिमा’ या दिवसाचा. या परंपरेच्या निमित्ताने आयुर्वेदातील शरद ऋतुचर्येचा अवलंब व्हावा व आपल्या सगळ्यांचे आपोआप आरोग्य राखले जावे, हा या कोजागिरी पौर्णिमेचा खरा ‘शास्त्रीय’ हेतू आहे. अर्थात, याचा अर्थ केवळ त्या दिवशीच चांदण्यात दूध प्यावे असा नाही. संपूर्ण शरद ऋतूमध्येच अशा प्रकारे दूध घेणे ‘ठरते. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने अशा ऋतुचर्येची आठवण उपयुक्त होणे अपेक्षित असते.

या ऋतूमधील चांदण्याप्रमाणेच नक्षत्रासंदर्भातही एक विशेष उल्लेख ग्रंथात आढळतो. पावसाळ्यात नदी, तलाव यांतील पाणी गढूळ झाल्यामुळे तसेच्या तसे पिण्यास अयोग्य असते. ऑक्टोबरपर्यंत मात्र, हे पाणी बरेचसे निवळते. चांदण्यांच्या प्रकाशात हे पाणीसुद्धा गार होते. चांदण्याप्रमाणेच आकाशातील नक्षत्रांचासुद्धा या पाण्यावर परिणाम घडत असतो. त्याचाच परिणाम म्हणजे पाणी ‘शुद्ध’, पिण्यास योग्य बनते. आकाशात याच सुमारास ‘अगस्ती’ ताऱ्याचा उदय होतो. या ताऱ्याच्या प्रकाशात तलाव, नदी यांतील पाणी अधिकच निर्मळ, शुद्ध बनते. अशा पाण्यालाच आयुर्वेदाने ‘हंसोदक’ असे नाव दिले आहे. हंसाप्रमाणे निर्मळ किंवा हंसपक्ष्यास उपयुक्त असे ‘शुद्ध’ पाणी म्हणजे ‘हंसोदक !’ याच हंसोदकाचा वापर स्नान, पान आदी सर्वांसाठी करावा, असा उल्लेख ग्रंथात सापडतो.

मित्रांनो, शरद ऋतुचर्येमधलं पाण्याचं हे वर्णन सांगताना मला एक वेगळा मुद्दा सांगायचा आहे. हल्ली आयुर्वेदावरील कोणत्याही व्याख्यानात, समारंभात, लेखनात जो तो ‘आयुर्वेदात संशोधन व्हायला हवं’ असं बिनधास्त सांगतो. आयुर्वेदाने मूलभूत सिद्धांत मुळातच इतके पक्के होतात की त्यात संशोधन होणे थोडे अशक्य वाटते. मग संशोधनाच्या जागा आहेत, त्या अशा शरद ऋतूमधल्या पाण्यासारख्या ! आज कोणत्याही गोष्टीचे पृथ:क्करण केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, केमिकल ॲनालिसिस आदी आधुनिक शास्त्रांद्वारे करता येते. मग त्यांचा उपयोग शरद ऋतूत नक्षत्रांमुळे ‘निर्विष’ होणाऱ्या पाण्याच्या पृथक्करणासाठी करता येईल. मूळचे दूषित पाणी व चांदण्यात ठेवलेले तेच पाणी या दोन्ही पाण्याच्या नमुन्यांचे परीक्षण करून नक्की निर्विषता, शुद्धत्व म्हणजे काय घडते, असा ‘संशोधनपर’ अभ्यास करणे सहज शक्य आहे. पूर्वाचार्यांनी केलेले हे निरीक्षण आधुनिक शास्त्रांच्या साह्याने ‘कागदावर’ दाखवता येईल. हे करताना आयुर्वेद किंवा अर्वाचीन शास्त्रे यांच्या तत्त्वांना धक्का न लागता, त्यांच्यात भेसळ न करता योग्य असा समन्वय त्यांच्यात साधता येईल. आयुर्वेदाला आधुनिकतेची जोड देता येईल, ती अशा प्रकारे.

डॉ . मयुरेश आगटे

सूचना :- कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर या लेखात नमूद केलेली सर्व औषधे वापरा.

2

दसरा सण मोठा, नसावा आरोग्या तोटा

Dasara and its significance

पावसाळ्यात संपूर्ण सृष्टीचे रूपच पालटते. सगळ्या सृष्टीला पुनर्जन्मच मिळतो. जणू सर्व भूतलावर हिरव्या रंगाचे गालिचे पसरावेत किंवा या सृष्टीने नववधूप्रमाणे हिरवा शालू परिधान केलेला असावा. जुलै, ऑगस्टमध्ये धुवाँधार पडणारा पाऊस सप्टेंबर महिन्यापर्यंत हळूहळू कमी व्हायला लागतो. पावसाळ्यात दुर्लभ असणारी सूर्यदेवता आता दररोज दर्शन द्यायला सुरुवात करते. सप्टेंबरच्या उत्तरार्धात पिवळे धमक ऊन, मधून मधून मेघाच्छादित आकाश असे दृश्य दिसते. मधूनच पावसाची एखादी सर येत राहते. या ऊन-पावसाचा पाठशिवणीचा खेळ काही दिवस तसाच सुरू राहतो. नंतर मात्र पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते आणि त्याचबरोबर उन्हाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढायला लागते. पुढेपुढे दिवसभर कडक ऊन जाणवायला लागते. तोपर्यंत ऑक्टोबर महिना उजाडलेला असतो. बाहेरच्या कडक उन्हामुळे हा महिनाच मुळी ओळखला जातो तो ‘ऑक्टोबर हीट’ या नावानेच ! अर्थात दिवसभर कडक ऊन जरी असले, तरी रात्री सुंदर, शीतल चांदण्याची बरसातही निसर्ग करतो. अशा हवामानाच्या या ऋतूलाच नाव आहे ‘शरद ऋतू’ !

शरद ऋतूमध्ये पावसाळ्यात असणारा गारवा कमी होतो आणि सूर्य प्रखरतेने तळपू लागतो. वातावरणातील उष्णता त्यामुळे वाढते. या वाढलेल्या उष्णतेचा शरीरावरही विशेष परिणाम होतो. पावसाळ्यात शरीरातील वातदोषाचा प्रकोप घडत असतो तर पित्तदोषाचा संचय होत असतो, असे आपण वर्षाऋतुचर्येच्या वर्णनात पाहिले आहेच. शरद ऋतूमधील ही वाढलेली उष्णता वातदोषाला ‘शांत’ करते. मात्र, या उष्णतेमुळे ‘पित्त’ मात्र खवळते. म्हणजेच त्याचा प्रकोप होतो. म्हणूनच या काळात पित्तामुळे होणारे आजार अधिक प्रमाणात होण्याची शक्यता असते

हातापायांची आग होणे, पोटात आग पडणे, अम्लपित्ताचा त्रास होणे, शरीरातील विविध भागांतून रक्तस्राव होणे, मूळव्याधीतून रक्त पडणे, कावीळ असे विविध पित्ताचे विकार या काळात निर्माण होतात. म्हणूनच हा पित्ताचा प्रकोप होऊ न देणे, हे शरद ऋतुचर्येचे प्रमुख धोरण असते.

या पार्श्वभूमीवरच आमच्या पूर्वजांनी देवीच्या नवरात्रासाठी निवड केली ती झेंडू, आपटा या वनस्पतींची ! १२ महिन्यांत अनेकविध सण, पूजा होत असतात. पण एरवी त्या सणांमध्ये या वनस्पतींचे फारसे महत्त्व असत नाही. नवरात्र मात्र यांच्याशिवाय साजरे होणेच शक्य नाही. शरद ऋतुचर्येतील शरीराची स्थिती व या वनस्पतींचे गुणधर्म यांचा सुरेख मिलाफ आमच्या संस्कृतीने नवरात्रीच्या निमित्ताने करून घेतला. या वनस्पती पित्तशामक असल्याने आरोग्यासाठी त्यांची या काळात महत्त्वाची भूमिका आहे. झेंडूच्या फुलांचा रस हा अंगाची लाही होणे, पोटात आग पडणे, अम्लपित्त यावरील उत्तम औषध आहे. त्याचप्रमाणे फुलांचा रस हा शरीरात कोठूनही होणारा रक्तस्राव त्वरित थांबवतो. फुलांचा रस यासाठीच मूळव्याधीतून रक्त पडणे, गुळणा फुटणे अशा कोणत्याही रक्तस्रावात प्यायला द्यावा. फुलांच्या रसाप्रमाणेच फुलांचे चूर्णही उपयोगी पडते.

साजूक तूप हे सुद्धा पित्तावरचे उत्तम औषध असल्याने झेंडूच्या फुलांचा रस किंवा चूर्ण तुपाबरोबर दिल्यास अधिक फायदा मिळतो. झेंडूची फुले याच काळात फुलतात. त्यामुळे ही फुले ताजी, गुणधर्माने परिपूर्ण असतात. झेंडूची फुले नवरात्रासाठी निवडण्यामागे हाही एक उद्देश आहे. झेंडूप्रमाणेच दसऱ्याला ‘सोने’ म्हणून देण्यात येणारी ‘आपटा’ ही वनस्पतीसुद्धा उत्तम पित्तनाशक, रक्तस्राव थांबवणारी आहे. त्यामुळे ‘ऑक्टोबर हीट’साठी या दोन्ही वनस्पतींचा उत्तम उपयोग होत असतो. नवरात्रानिमित्त या वनस्पती प्रत्येकाच्या घरात आणल्या जातात. शरद ऋतूमध्ये होणारे आजार घरातील कोणा व्यक्तीला झाल्यास या वनस्पतींचा उपयोग व्हावा व तत्काळ रोग आटोक्यात यावा, हा या परंपरेमागील ‘शास्त्रीय’ उद्देश आहे.

मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी या परंपरा निर्माण करताना, अंधश्रद्धा किंवा धार्मिकतेचे अवडंबर कधीही केले नाही. उलट असे आनंदोत्सव निर्विघ्नपणे पार पडावेत, म्हणून नेहमीच आयुर्वेदाचा ‘शास्त्रीय’ आधार घेतला. आपल्या परंपरा वर्षांनुवर्षे टिकून आहेत, कारण त्या पूर्णतः ‘शास्त्रशुद्ध’ आहेत म्हणून.

डॉ . मयुरेश आगटे

सूचना :- कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर या लेखात नमूद केलेली सर्व औषधे वापरा.

2