आपल्या दिनक्रमात अनेक गोष्टी सवयीच्या झालेल्या असतात. इतक्या की ‘असंच का करायचं ?’ हा प्रश्न आपल्या बुद्धिवादी मनाला अनेकदा पडत नाही. आपले रोजचे जेवण, ही अशीच एक नित्य गोष्ट ! आपल्या जेवणाच्या पदार्थांमध्ये एक विशिष्ट शिस्त असते. पोळी, भाजी, भाकरी, चटणी, आमटी, कोशिंबीर, मीठ, तूप या सगळ्या पदार्थांचे प्रमाण ठरलेले असते. चटणीच्या प्रमाणात भाजी किंवा भाजीच्या प्रमाणात चटणी असा फेरफार झाल्याचे इतक्या शेकडो वर्षांत कधीच ऐकिवात नाही. हे विशिष्ट ‘अलिखित’ नियम नक्की आले कोठून ? स्वतःच्या आवडीप्रमाणे हवा तो पदार्थ हव्या त्या प्रमाणात खाल्ला तर बिघडलं कुठे ?
मित्रांनो, आम्ही रोज दोनदा जेवतो; पण आम्हांला असे प्रश्नच कधी पडत नाहीत. हे प्रश्न उपस्थित करण्याचं कारण म्हणजे आपल्या जेवणामागे आयुर्वेदाचे नियम आहेत, याची आपल्याला कल्पनाही नसते. आम्ही जेवणाच्या रूपात रोजच्या रोज आयुर्वेदाचे ‘एकनिष्ठेने’ आचरण करतो; पण नकळतपणे ! याचसाठी रोजच्या जेवणातला आयुर्वेद आपण बघणार आहोत. जेवणाच्या योग्य पद्धतीविषयी चर्चा केल्यानंतर आपण आता जेवणाच्या ‘मेनूकडे’ वळणार आहोत.
आहाराचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम आयुर्वेदाने ‘चवी’च्या स्वरूपात मांडला. गोड, आंबट, खारट, तिखट, तुरट, कडू अशा चवींचे पदार्थ आपल्या शरीरावर विशिष्ट परिणाम घडवतात. या परिणामांचा विचार, पदार्थांचे गुणधर्म व पोषण हे आहाराचे मुख्य ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपल्या जेवणात विविध पदार्थांना स्थान देण्यात आले आहे.
शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी गहू, तांदूळ यांचे पदार्थ अतिशय उपयुक्त असतात. म्हणून पोळी, भात यांचे प्रमाण अधिक असते. निरनिराळ्या भाज्यांमधूनही हा उद्देश साध्य होतो. म्हणूनच त्यांचेही प्रमाण अधिक असते. गोड पदार्थ शरीराचे उत्तम पोषण करतात, म्हणून ‘गोडाच्या जेवणाचे’ आपल्याकडे महत्त्व आहे.
अन्न नीट जाण्यासाठी भूक चांगली लागणे, तोंडाला उत्तम चव असणे या गोष्टी गरजेच्या असतात. यासाठी उपयोग होतो आंबट चवीच्या पदार्थांचा ! लिंबू, आमसूल, चिंच, लोणचे अशा आंबट पदार्थांचा स्वयंपाकात, आहारात याचसाठी उपयोग केला जातो.
स्वयंपाक कितीही उत्तम केला, तरी मिठाशिवाय त्याची चव कळत नाही. म्हणून आपण मीठ वापरतो. पण त्याच्या अतिरेकामुळे त्वचारोग, रक्तदाब वाढणे, अंगावर सूज येणे, तहान लागणे, बलक्षय आदी विविध आजार निर्माण होतात. म्हणूनच त्याचे अतिसेवन होऊ नये. याचसाठी आपल्या ताटात सगळ्यात कमी प्रमाणात मीठ आले.
लोणच्याप्रमाणेच पानाची डावी बाजू आपण चटणी, कोशिंबीर अशा ‘तोंडी लावणे’ पदार्थांनी सजवतो. यापैकी चटणी हा प्रकार तिखट चवीचा असतो. तिखट असल्यास जिभेचे चव कळण्याचे कार्य उत्तम होते.तसेच तिखट पदार्थ भूक वाढवण्यासाठी, पचनशक्ती चांगली राहण्यासाठी उपयुक्त असतात. जेवणानंतर वाढणारा कफदोष कमी करतात. या सगळ्या उपयोगांमुळेच चटणीसारखे पदार्थ जेवणात समाविष्ट झाले. मात्र, अतिप्रमाणात तिखट पदार्थ शरीराची झीज करतात, तसेच रूक्ष असल्याने शरीराचे शोषण करतात, म्हणून त्यांचे प्रमाण आहारात कमी ठेवले जाते. किंवा चटणीत तेल घालून कोरडेपणा कमी केला जातो.
दही आयुर्वेदाला सर्वथा वर्ज्य नाही. मात्र, जास्त दही खाल्ल्याने अनेकविध विकार होण्याची शक्यता असते. म्हणूनच बहुतांशी दही हा ‘बेस’ धरून करण्यात येणारी कोशिंबीरही आपण पानात कमी प्रमाणात वाढतो.
‘साजूक तूप’ हा आयुर्वेदाप्रमाणे अत्यंत उपयोगी असा पदार्थ आहे. दुधापासून तूप करेपर्यंत लागणाऱ्या विविध प्रक्रियांमुळे हा पदार्थ अत्यंत सारभूत असा बनतो. म्हणूनच अगदी ‘चमचाभर’ साजूक तूपसुद्धा शरीराच्या पोषणासाठी उपयुक्त ठरत असते.
यातील प्रत्येक पदार्थाच्या चवीचे शरीरावर अनुकूल परिणाम दिसत असतात. म्हणूनच सर्व प्रकारच्या आहाराची शरीराला आवश्यकता असते. भारतीय जेवणात इतक्या विविध पदार्थांची वर्णी लागली ती यासाठीच ! मात्र, केवळ स्वत:च्या आवडीपोटी एखादाच पदार्थ खाण्याची सवय अनेक लोकांना असते. मग अशा वेळी तो विशिष्ट पदार्थ अतिप्रमाणात खाण्याचे व इतर आवश्यक पदार्थ न मिळाल्याचे असे दुहेरी दुष्परिणाम शरीरावर दिसायला लागतात. म्हणून आपण रोज जे जेवण घेतो, त्यातील प्रत्येक पदार्थ हा ‘शास्त्रसंमत’ असल्याने तेवढ्याच प्रमाणात घेणे आरोग्यास हितकारक आहे.
डॉ . मयुरेश आगटे