परवा माझ्या एका मित्रानं मला घरी तपासायला बोलावलं. गेल्यानंतर त्याच्या खोलीत लावलेल्या एअरकंडिशनच्या थंडगार हवेनं माझं स्वागत केलं. ‘चहा घेऊन मग बोलू’ – इति. माझा मित्र. ‘ठीक आहे’, ‘म्हणून मी घरातील स्वयंपाकघरात जायला निघालो. त्यावर तो म्हणाला, ‘अरे, कुठं इतकं ‘लांब’ जायचं. मी इथेच मागवतो.’ त्याच्या हाताशी असणारी बेल दाबताक्षणीच चहा आमच्या पुढ्यात आला. चहा घेताना ऑफिसमध्ये इतकं काम असतं की तास न् तास खुर्चीवरून मी उठतही नाही, असं अभिमानानं तो सांगत होता. या अभिमानात त्यानं नवीन घेतलेल्या ए. सी. कारचं कौतुकही भर घालत होतं. गप्पा मारता-मारता त्यानं फोनवरच ऑफिसची दोन-तीन कामं उरकली. इतक्यात घराच्या मागे असलेल्या स्टोअरमधून सर्व ‘जीवनावश्यक’ वस्तू घरपोच मिळाल्याची वर्दी त्याला मिळाली. हा सगळा प्रकार मी शांतपणे पाहात होतो. ‘बघितलंस, कसं सगळं मी एका जागेवरून ऑपरेट करतो’. माझ्या मित्राचे गौरवपूर्ण शब्द. हे ऐकल्यावर व एकूणच परिस्थिती पाहिल्यावर मला वेगळं काही तपासण्याची गरजच भासली नाही. मी त्याला म्हटलं, ‘तुला पचनाचा त्रास आहे. वारंवार गॅसेस होतात. तुझं वजनही बऱ्यापैकी वाढत चाललंय. त्यामुळे चार जिने चढल्यावरही तुला दम लागतो. रक्तातील साखर व कोलेस्टेरॉलसुद्धा वाढल्याची शक्यता आहे.’
माझं सगळं बोलणं ऐकून तो चाटच पडला. कारण याच तक्रारी सांगण्यासाठी त्यानं मला बोलावलं होतं. मित्रांनो, मला वाटतं, माझा हा मित्र आपल्या सगळ्यांचंच प्रतिनिधित्व करतो. असंख्य सुविधांमुळे आपल्या जीवनात शारीरिक कष्टच उरलेले नाहीत. यातूनच मधुमेह, स्थूलता, पचनविकृती, कोलेस्टेरॉल, सांधेदुखी असे अनेकविध, ‘सुखवस्तू’ आजार ‘बसल्या-बसल्या’ निर्माण होतात. यांना वेळीच प्रतिबंध करण्यासाठी दिनचर्येतील अत्यावश्यक अशा व्यायामाविषयी आता आपण चर्चा करणार आहोत.
‘व्यायाम’ शब्दाची व्याख्या करताना ग्रंथात ‘शारीरिक कष्ट होतील असे काम’ अशी केली आहे. या शारीरिक कष्टांमुळे असंख्य फायदे होत असतात. व्यायामामुळे शरीराला हलकेपणा येतो. शरीरात वाढणारी चरबी कमी होण्यासाठी व्यायामाइतके उत्तम औषध नाही. वाढलेल्या चरबीमुळेच वजन वाढणे, वाढलेल्या वजनामुळे गुडघेदुखी, थकवा, निरुत्साह अशा तक्रारी निर्माण होतात. त्याचप्रमाणे मधुमेह, कोलेस्टेरॉल वाढणे, ब्लड प्रेशर वाढणे यांची शक्यताही अनेकपटीने वाढते. व्यायामामुळे अतिरिक्त चरबी झडल्याने वजन आटोक्यात राहते. साहजिकच इतर व्याधी होण्याची शक्यताही टाळली जाते.
व्यायामामुळे शरीरातील स्नायू बळकट होतात. स्नायूंमध्ये निसर्गत:च असणारी लवचिकता टिकून राहण्यास उपयोग होतो. स्नायू पिळदार होतात. यामुळे आपली ताकद वाढण्यास उपयोग होतो. आपली कष्ट करण्याची सहनशीलता व्यायामामुळे वाढते. केवळ कष्टच नव्हे, तर ऊन, थंडी, वारा, पाऊस अशा बाह्य वातावरणातील घटकांशी सामना करण्याची क्षमताही व्यायामाने वाढते. व्यायामात होणाऱ्या शरीराच्या हालचालींमुळे रक्ताभिसरण सुधारण्यासाठी उपयोग होतो. प्रत्येक पेशीला, अवयवांना पुरेपूर रक्त मिळाल्यामुळे त्यांचे आरोग्य उत्तम राहते.
व्यायामाचा अनुकूल परिणाम होतो तो आपल्या पचनशक्तीवर. व्यायामात घडणाऱ्या शरीरश्रमांमुळे अन्नाची गरज वाढते. साहजिकच व्यायामामुळे भरपूर भूक लागते. भुकेमुळे अधिक अन्नसेवन व त्याचे पचनही व्यवस्थित घडते. त्यामुळे शरीराचे पोषण उत्तम प्रकारे होत असते. अपचन, अजीर्ण, गॅसेस यांसारख्या तक्रारी व्यायामामुळे निर्माण होत नाहीत.
शरीर व मन दोन्ही घटकांचे स्वास्थ्य एकमेकांवर अवलंबून असते. व्यायामामुळे येणारी शरीराची तंदुरुस्ती मनालाही बळ देते. शरीराला येणाऱ्या हलकेपणामुळे मनालाही उत्साह, स्फूर्ती मिळते. आजच्या धावपळीच्या युगात ‘सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट’ हे जगण्याचं सूत्र बनलं आहे. अशा परिस्थितीत व्यायामामुळे शरीर व मन हे दोन्ही ‘फिट’ राहण्यास मदत होत असते.
डॉ . मयुरेश आगटे
सूचना :- कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर या लेखात नमूद केलेली सर्व पदार्थ आपले वय आणि आपल्या प्रकृतीनुसार वापरा