आला हिवाळा, आरोग्य सांभाळा

Hemant Rutu

सकाळी उशिरापर्यंत दिसणारे धुके, धुक्यातून वाट काढत येणारे सूर्याचे कोवळे किरण, उत्साह आणणारा वातावरणातला सुखद गारवा, गारव्यात हवीहवीशी वाटणारी रजईची ऊब ! आपल्या सगळ्यांनाच आवडणाऱ्या, प्रफुल्लित करणाऱ्या हिवाळ्याचे दिसणारे हे नेहमीच रूप. ऑक्टोबर हीटचा तडाखा नोव्हेंबरमध्ये कमी व्हायला लागतो आणि त्याची जागा हळूहळू गुलाबी थंडी घ्यायला लागते. या काळात सूर्याचे दक्षिणायन सुरू असल्याने त्यामुळे वातावरणातील उष्णता बरीचशी कमी होते. त्यामुळे हवेतील गारवा वाढतो. दिवसही लहान होत जातो व रात्र मोठी व्हायला लागते.

शरद ऋतुचर्या पाहताना ऑक्टोबर महिन्यात ‘पित्तप्रकोप’ असतो, असा उल्लेख आपण पाहिला होता. हिवाळ्यातील गारवा हा पित्तप्रकोप कमी करतो. या काळात वात व कफ हे दोषसुद्धा प्राकृत स्थितीत असतात. म्हणूनच या काळात रोग होण्याची शक्यताच कमी असते. शिवाय या काळात निसर्गत:च शरीराची ताकद वाढत असते. हिवाळ्याला ‘हेल्दी सीझन’ म्हणतात ते याचमुळे. आरोग्यासाठी म्हणूनच हा अतिशय उपयुक्त ऋतू आहे.

हिवाळ्यातील वातावरणाचा अनुकूल परिणाम होतो तो आपल्या ‘पचनशक्तीवर’. बाह्य गारव्याने शरीरावरील त्वचेचा संकोच होतो. त्यामुळे घाम येईनासा होतो. संकोचलेल्या त्वचेमुळे शरीरातील उष्णता कोंडली जाते. याचाच परिणाम म्हणून जठराग्नी किंवा पचनशक्ती अधिकाधिक वाढायला लागते. म्हणूनच या काळात भरपूर भूक लागते. ‘खाल ते पचवाल’ अशी स्थिती असते. म्हणूनच हिवाळ्यातील ऋतुचर्येतील महत्त्वाचा भाग म्हणजे भरपूर आहार घेणे. आहारात नेहमीच्या गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यांपासून तयार केलेल्या पोळी, भाकरी, भात यांचा समावेश असावाच. शिवाय मूग, मसूर, मटकी, वाटाणा, हरभरा, चवळी यांचे पदार्थही सेवन करावेत.

हिवाळ्यात शरीराचे बल वाढत असते. त्या दृष्टीने अतिशय उत्तम उपयोगी पडतात ते ‘उडीद.’ उडदाच्या डाळीपासून बनवले जाणारे वडे, लाडू आदी सगळेच पदार्थ या ऋतूत हितकारक आहेत. बटाटा, कांदा, फ्लॉवर, कोबी, गाजर, पडवळ अशा सर्व फळभाज्या, चाकवत, मेथी, पालक, शेपू आदी पालेभाज्या घेण्यास काहीच हरकत नाही. आहारात तेल, तूप यांचा मुक्तहस्ते वापर करावा. तेल, तूप यांचा वापर करून बनवलेले तळलेले चमचमीत पदार्थही यथेच्छ घ्यावेत. शेव, चिवडा, अनारसे, चकली, कडबोळी, करंज्या, लाडू, शंकरपाळी, चिरोटे, वडे या प्रकारचे विविध पदार्थ हिवाळ्यात स्वागतार्ह आहेत. आपण वर्षभर इतर सणांना असे विविध फराळाचे पदार्थ करत नाही. हिवाळ्यात येणाऱ्या दिवाळीला मात्र आवर्जून करतो. या परंपरेमागे आयुर्वेदात सांगितलेल्या हिवाळ्यातील ऋतुचर्येचे शास्त्रीय कारण आहे.

या ऋतूत गोड, खारट, आंबट, तिखट असे सगळ्याच चवींचे पदार्थ खावेत. पण शरीराची ताकद वाढण्यास अधिक चांगला उपयोग होतो तो गोड पदार्थांचा ! श्रीखंड, बासुंदी, गुलाबजाम, बर्फी, जिलेबी, शेवयाची खीर, गाजर हलवा, निरनिराळी मिठाई अशी सगळीच पक्वान्ने वरचेवर आहारात असावीत. तुलसी विवाहानंतर असणाऱ्या अनेक लग्नसमारंभातील पक्वान्नपूर्ण भोजनाचा पुरेपूर आस्वाद घ्यावा.

गोड पदार्थांप्रमाणेच शरीरबल वाढण्यासाठी उपयोगी ठरतो तो ‘मांसाहार !’ मटण, चिकन, त्यांचे सूप, मासे यांचा आहारात समावेश असावा. अंडी व त्यापासून बनणारे पदार्थही हितकर आहेत. ज्या व्यक्ती मांसाहार करत नाहीत, त्यांनी दूध, दुधाचे पनीर, खरवस, तूप, मलई असे पौष्टिक पदार्थ घ्यावेत.

आहारात आले, पुदिना, लसूण, कोथिंबीर, कढिपत्ता, लिंबू असे पदार्थ अवश्य हवेत. दालचिनी, वेलदोडा, तमालपत्र, जिरे, ओवा, मिरे, धने, केशर असे पदार्थही स्वयंपाकात मुक्तहस्ते वापरावेत. हे सगळे पदार्थ रुची वाढवतात. पचनशक्तीलाही मदत करतात. अन्नालाही चांगली चव व सुवास आल्यामुळे अन्नही या पदार्थांमुळे चविष्ट बनते.

या ऋतूमध्ये आनंद घेण्याचा आणखी एक आहारघटक म्हणजे ‘सुकामेवा !’ काजू, बदाम, मनुका, अक्रोड, बेदाणे, सुके अंजीर, खारीक असे सुकामेव्यातील पदार्थ शरीराची ताकद वाढवण्यास अत्यंत हितकर असतात. डिंकाचे लाडू, अहळीवाचे लाडू हे पदार्थही असेच पौष्टिक आहेत.. सफरचंद, केळी, पेरू, डाळिंब, पपई, संत्री, मोसंबी, चिकू, द्राक्षे, सीताफळ | अशा फळांचाही समाचार घेण्यास हरकत ना नाही. फळे ज्यूस, कोशिंबीर, रायते अशा कोणत्याही स्वरूपात घेता येतील.

आतापर्यंत सांगितलेले आहारघटक प्रत्येकाने स्वत:च्या सोईप्रमाणे सेवन करावेत. मात्र, भूक लागल्यावर दुर्लक्ष न करता तत्काळ काही खाणे महत्त्वाचे आहे. कारण अशा वेळी काही न खाल्ल्यास शरीराला अपाय होण्याची शक्यता असते.

डॉ . मयुरेश आगटे

सूचना :- कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर या लेखात नमूद केलेली सर्व पदार्थ आपले वय आणि आपल्या प्रकृतीनुसार वापरा

4