दिवाळीतील  अभ्यंगस्नान

Abhyangsnan

सुंदर, रमणीय पहाट ! दारात प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी, खिडक्यांमध्ये पणत्यांच्या रांगा, दिव्यांची रोषणाई, सोबत फटाक्यांची आतषबाजी ! सर्वत्र प्रसन्न वातावरण. घराघरातून पाहुण्यांचा स्नेहमेळा. प्रत्येकाच्या आनंदाला उधाण आलेलं; नवीन कपडेलत्ते, दागदागिने यांची या वातावरणात अधिकच भर. अत्तरे, उदबत्ती यांचा पसरलेला सुवास. सोबत निरनिराळ्या गोड, तिखट अशा पदार्थांची लयलूट! अशी आनंददायी, चित्तवृत्ती उल्हसित करणारी दिवाळी !

दिवाळीतला पहिला नरकचतुर्दशीचा दिवस. पहाटे लवकर उठून आपण सगळे ‘अभ्यंगस्नान’ करतो. म्हणूनच या नरकचतुर्दशीचे औचित्य साधून आपण आज गप्पा मारणार आहोत ते ‘अभ्यंग’ या दिवाळीतल्या खास वैशिष्ट्याविषयी ! ‘दिवाळी’ हा सण येतो तो साधारणतः ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात ! अर्थात, पंचांगातील तिथींप्रमाणे बदल केव्हातरी घडतो, पण सहसा जेव्हा दिवाळी येते, त्या वेळेला वातावरणातील ऑक्टोबर हिटचं प्रमाण कमी झालेलं असतं. सूर्याचं दक्षिणायन सुरू असल्यामुळे हळूहळू दिवस लहान व रात्र मोठी व्हायला लागते. या काळात सूर्याचे किरण तिरके पडल्याने वातावरणातील उष्णता कमी होऊन थंडी पडायला सुरुवात होते. अशा गुलाबी थंडीच्या वातावरणात आमच्या दारात दिवाळी येते.

दिवाळीच्या वेळी बाह्य वातावरणातील थंडीचा विचार करूनच अभ्यंगस्नानाचा समावेश या सणात करण्यात आला. थंडीचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो. यामुळे त्वचा कोरडी पडते. थंडीचे प्रमाण वाढल्यास त्वचेला भेगा पडणे असाही त्रास शकतो. थंडीच्या या परिणामांपासून संरक्षण होण्यासाठी उपयोग होतो तो ‘अभ्यंगा’चा ! अभ्यंग म्हणजे त्वचेला तेल लावून मसाज करणे. अभ्यंगासाठी वापरण्यात येणाऱ्या तेलामुळे त्वचेचा कोरडेपणा जातो. त्वचेला स्निग्धता प्राप्त होते. थंडीमुळे आकसलेली त्वचा मऊ होऊन तिला सुकुमारत्व मिळते. त्वचेला बळकटी येते. तजेला, तरतरीतपणा मिळतो. त्वचेचा वर्ण सुधारण्यासाठीही अभ्यंगाचा चांगला उपयोग होत असतो. स्पर्श जाणण्याचे त्वचेचे काम अभ्यंगामुळे उत्तम प्रकारे होते. जसे-जसे वय वाढते, तसे त्वचेवर सुरकुत्या पडणे, शिथिलता येणे अशी ‘वृद्धत्वा’ची लक्षणे शरीरावर दिसू लागतात. अभ्यंगाचा उपयोग केल्याने अशी लक्षणे लवकर निर्माण होत नाहीत.

अभ्यंगाचे इतरही अनेक उपयोग आहेत. अभ्यंगात शरीरात ‘मुरणारे ‘ तेल स्नायूंना बळकटी देते. शरीराची ताकद वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. कुस्तिगीर व्यायामानंतर मसाज करून घेतात ते यासाठीच ! बाहेरच्या गारव्यामुळे शरीरातील वातदोष वाढतो. त्यामुळे थंडीत सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी असे वातदोषामुळे होणारे आजार हमखास डोकं वर काढतात. अभ्यंगामुळे हा वाढलेला वातदोष कमी होतो. साहजिकच त्याच्यामुळे होणारे आजारही कमी होतात. अभ्यंगामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. त्यामुळे बाह्य वातावरणातील गारव्याचा प्रतिकार होतो. शरीराचे श्रम, थकवा दूर होण्यासाठी हा तेलाचा मसाज उपयुक्त आहे. शिवाय यामुळे शरीराची कष्टाची कामे करण्याची ताकद वाढते. शरीरावर बाह्य आघात झाल्यास तो सहन करण्याची ताकद वाढते. अभ्यंगातील तेलाच्या स्निग्धतेमुळे शरीर लवचिक बनते. थंडीच्या काळात निसर्गत:च शरीराला बल मिळत असते. अभ्यंगातील तेलाचा मसाज निसर्गाला या कामात मदत करत असतो. गाडीला नियमित ‘ऑइलिंग’ केल्यामुळे गाडीची कार्यशक्ती, गाडीचे आयुष्य वाढते. अगदी त्याचप्रमाणे अभ्यंगामुळे आपली शरीराच्या गाडीची ताकद वाढते. म्हणूनच अभ्यंगामुळे आपले तारुण्य अधिकाधिक काळ टिकते.

अभ्यंगाचे इतके उपयोग आहेत म्हणूनच ग्रंथकारांनी केवळ थंडीतच अभ्यंगाचा उपयोग न करता वर्षभर उपयोग करण्यास सांगितले आहे. याचसाठी अभ्यंगाचा रोजच्या दिनचर्येत समावेश करण्यात आला. रोजच्या उपयोगासाठी खोबरेल तेल, तिळाचे तेल यांचा वापर करता येतो. बला तेल, नारायण तेल अशी औषधीसिद्ध तेलेही वापरण्यास हरकत नाही. दिवाळीत आपण सुगंधी तेल वापरतो. त्यामुळे मनालाही प्रसन्नता येते. असे सुगंधी तेलही वर्षभर वापरता येईल.

रोजच्या सकाळच्या घाईत असा अभ्यंग न जमल्यास रात्री शांतपणा असताना अगदी टीव्ही बघतसुद्धा अभ्यंग करता येईल. रोज खरं तर सर्वांगालाच असा तेलाचा मसाज आवश्यक असतो. अगदीच मसाज न जमल्यास किमान तेलाचा ‘हात’ तरी फिरवावा. सर्वांग अभ्यंग शक्य नसल्यास किमान डोके, पाय व कान यांना मात्र आवर्जून तेल चोळावे.

दिवाळीच्या निमित्ताने सुरू झालेल्या अभ्यंगाविषयी आणखीनही बरेच काही सांगायचे आहे. त्याविषयी चर्चा थोड्याच वेळात…

डॉ . मयुरेश आगटे

सूचना :- कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर या लेखात नमूद केलेली सर्व औषधे वापरा.

1