पावसाळ्यात संपूर्ण सृष्टीचे रूपच पालटते. सगळ्या सृष्टीला पुनर्जन्मच मिळतो. जणू सर्व भूतलावर हिरव्या रंगाचे गालिचे पसरावेत किंवा या सृष्टीने नववधूप्रमाणे हिरवा शालू परिधान केलेला असावा. जुलै, ऑगस्टमध्ये धुवाँधार पडणारा पाऊस सप्टेंबर महिन्यापर्यंत हळूहळू कमी व्हायला लागतो. पावसाळ्यात दुर्लभ असणारी सूर्यदेवता आता दररोज दर्शन द्यायला सुरुवात करते. सप्टेंबरच्या उत्तरार्धात पिवळे धमक ऊन, मधून मधून मेघाच्छादित आकाश असे दृश्य दिसते. मधूनच पावसाची एखादी सर येत राहते. या ऊन-पावसाचा पाठशिवणीचा खेळ काही दिवस तसाच सुरू राहतो. नंतर मात्र पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते आणि त्याचबरोबर उन्हाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढायला लागते. पुढेपुढे दिवसभर कडक ऊन जाणवायला लागते. तोपर्यंत ऑक्टोबर महिना उजाडलेला असतो. बाहेरच्या कडक उन्हामुळे हा महिनाच मुळी ओळखला जातो तो ‘ऑक्टोबर हीट’ या नावानेच ! अर्थात दिवसभर कडक ऊन जरी असले, तरी रात्री सुंदर, शीतल चांदण्याची बरसातही निसर्ग करतो. अशा हवामानाच्या या ऋतूलाच नाव आहे ‘शरद ऋतू’ !
शरद ऋतूमध्ये पावसाळ्यात असणारा गारवा कमी होतो आणि सूर्य प्रखरतेने तळपू लागतो. वातावरणातील उष्णता त्यामुळे वाढते. या वाढलेल्या उष्णतेचा शरीरावरही विशेष परिणाम होतो. पावसाळ्यात शरीरातील वातदोषाचा प्रकोप घडत असतो तर पित्तदोषाचा संचय होत असतो, असे आपण वर्षाऋतुचर्येच्या वर्णनात पाहिले आहेच. शरद ऋतूमधील ही वाढलेली उष्णता वातदोषाला ‘शांत’ करते. मात्र, या उष्णतेमुळे ‘पित्त’ मात्र खवळते. म्हणजेच त्याचा प्रकोप होतो. म्हणूनच या काळात पित्तामुळे होणारे आजार अधिक प्रमाणात होण्याची शक्यता असते
हातापायांची आग होणे, पोटात आग पडणे, अम्लपित्ताचा त्रास होणे, शरीरातील विविध भागांतून रक्तस्राव होणे, मूळव्याधीतून रक्त पडणे, कावीळ असे विविध पित्ताचे विकार या काळात निर्माण होतात. म्हणूनच हा पित्ताचा प्रकोप होऊ न देणे, हे शरद ऋतुचर्येचे प्रमुख धोरण असते.
या पार्श्वभूमीवरच आमच्या पूर्वजांनी देवीच्या नवरात्रासाठी निवड केली ती झेंडू, आपटा या वनस्पतींची ! १२ महिन्यांत अनेकविध सण, पूजा होत असतात. पण एरवी त्या सणांमध्ये या वनस्पतींचे फारसे महत्त्व असत नाही. नवरात्र मात्र यांच्याशिवाय साजरे होणेच शक्य नाही. शरद ऋतुचर्येतील शरीराची स्थिती व या वनस्पतींचे गुणधर्म यांचा सुरेख मिलाफ आमच्या संस्कृतीने नवरात्रीच्या निमित्ताने करून घेतला. या वनस्पती पित्तशामक असल्याने आरोग्यासाठी त्यांची या काळात महत्त्वाची भूमिका आहे. झेंडूच्या फुलांचा रस हा अंगाची लाही होणे, पोटात आग पडणे, अम्लपित्त यावरील उत्तम औषध आहे. त्याचप्रमाणे फुलांचा रस हा शरीरात कोठूनही होणारा रक्तस्राव त्वरित थांबवतो. फुलांचा रस यासाठीच मूळव्याधीतून रक्त पडणे, गुळणा फुटणे अशा कोणत्याही रक्तस्रावात प्यायला द्यावा. फुलांच्या रसाप्रमाणेच फुलांचे चूर्णही उपयोगी पडते.
साजूक तूप हे सुद्धा पित्तावरचे उत्तम औषध असल्याने झेंडूच्या फुलांचा रस किंवा चूर्ण तुपाबरोबर दिल्यास अधिक फायदा मिळतो. झेंडूची फुले याच काळात फुलतात. त्यामुळे ही फुले ताजी, गुणधर्माने परिपूर्ण असतात. झेंडूची फुले नवरात्रासाठी निवडण्यामागे हाही एक उद्देश आहे. झेंडूप्रमाणेच दसऱ्याला ‘सोने’ म्हणून देण्यात येणारी ‘आपटा’ ही वनस्पतीसुद्धा उत्तम पित्तनाशक, रक्तस्राव थांबवणारी आहे. त्यामुळे ‘ऑक्टोबर हीट’साठी या दोन्ही वनस्पतींचा उत्तम उपयोग होत असतो. नवरात्रानिमित्त या वनस्पती प्रत्येकाच्या घरात आणल्या जातात. शरद ऋतूमध्ये होणारे आजार घरातील कोणा व्यक्तीला झाल्यास या वनस्पतींचा उपयोग व्हावा व तत्काळ रोग आटोक्यात यावा, हा या परंपरेमागील ‘शास्त्रीय’ उद्देश आहे.
मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी या परंपरा निर्माण करताना, अंधश्रद्धा किंवा धार्मिकतेचे अवडंबर कधीही केले नाही. उलट असे आनंदोत्सव निर्विघ्नपणे पार पडावेत, म्हणून नेहमीच आयुर्वेदाचा ‘शास्त्रीय’ आधार घेतला. आपल्या परंपरा वर्षांनुवर्षे टिकून आहेत, कारण त्या पूर्णतः ‘शास्त्रशुद्ध’ आहेत म्हणून.
डॉ . मयुरेश आगटे
सूचना :- कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर या लेखात नमूद केलेली सर्व औषधे वापरा.