श्रावणामधील व्रतवैकल्यांमागे असणारी शास्त्रीय भूमिका आपण पाहात होतो. श्रावणात येणारे असंख्य उपवास, मांसाहारवर्ण्यता हे विषय आपण पाहिले होते. श्रावण महिन्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इतर कोणत्याही महिन्यात न आढळणाऱ्या मंगळागौरी, सत्यनारायण, जीवती अशा विविध पूजा. १२ महिने उपलब्ध असताना एका श्रावणातच पूजांची गर्दी करण्याची गरज आपल्या परंपरेला का वाटत असेल ? या पूजांमागे पौराणिक कथा सांगितल्या जातात. त्यात तथ्य असेलही कदाचित ! पण आपण २१व्या शतकात वावरताना पौराणिक कथांपेक्षा त्यामागे काही शास्त्रीय, तर्कसंगत दृष्टिकोन असू शकेल का, असा विचार माझ्या मनात येतो. नीट विचार केल्यावर या प्रश्नाचे उत्तर सापडले ते आयुर्वेदोक्त वर्षाऋतुचर्येत !
मागील भेटीत मी ‘दुर्दिन’ असा शब्दप्रयोग केला होता. पावसाळ्यात अनेकदा बाहेर धुवाँधार पाऊस असतो. बाहेरचे वातावरण ढगाळ कुंद असते. अशा वातावरणात एक प्रकारचा निरुत्साह जाणवतो. घराबाहेर पडावेसेच वाटत नाही. अशा दिवसांना ‘दुर्दिन’ असे नाव ग्रंथकारांनी दिले. असा ‘दुर्दिन’ असताना कोणतेही काम करू नये. अगदी अभ्यासही टाळावा असा सल्लाही दिला आणि असा दुर्दिनांचा अतिशय सुरेख उपयोग आपल्या परंपरेने करून घेतला तो विविध पूजांच्या माध्यमातून ! एरवी प्रत्येक मनुष्य आपापल्या कामधंद्यात व्यस्त असतो. त्या व्यापात त्याला देवधर्माला-परमार्थाला वेळ देता येईलच असे नाही. पण श्रावणातील बाहेरच्या वातावरणामुळे त्याला घराबाहेर जावेसेच वाटत नाही. हा अनायसा मिळणारा रिकामा वेळ खऱ्या अर्थाने सत्कारणी लागावा, म्हणून इतक्या विविध पूजांची वर्णी श्रावणात लागली असावी.
वर्षाऋतुचर्या आणि श्रावणातील पूजा यांच्यात दिसून आलेला सहज संबंध तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न केला आहे. या पूजांचेसुद्धा एक वैशिष्ट्य आहे. इतर सणासुदींना आपण हार, फुले वापरत असतो. श्रावणातल्या पूजांमध्ये हार, फुले यांच्याइतकेच महत्त्व असते ते विविध वनस्पतींच्या पत्रींना. या पत्रींना म्हणजे पानांना खरं तर फुलांसारखा सुगंध किंवा सौंदर्य नसतानासुद्धा यांची वर्णी लागली, ती त्यांच्यातील अनेक औषधी गुणधर्मांमुळे ! पावसाळ्यात सर्दी, खोकला, थंडी-ताप, उलट्या, जुलाब, पचनशक्ती मंदावणे, जंत होणे, अम्लपित्त, दमा अशा अनेकविध रोगांची निर्मिती होत असते. दर पावसाळ्यात दिसणारे हे आजार थांबवता कसे येतील ? असा विचार सुरू झाला. यातूनच या पत्रींचा समावेश पूजांमध्ये करण्यात आला. कारण पूजेच्या निमित्ताने या पत्री आपल्या घरात आणल्या जातात आणि घरात कोणी आजारी पडले तर त्यांचा लगेच उपयोग व्हावा, हा या पत्रींमागचा खरा ‘शास्त्रीय’ उद्देश ! शिवाय नुकताच पाऊस पडल्यामुळे सर्व वनस्पती ताज्या असतात. त्यांच्यातील गुणधर्म अतिशय परिपूर्ण असतात. अर्थातच त्यामुळे त्यांचा परिणामही उत्तम दिसतो.
आपण यातील प्रमुख पत्रींविषयी माहिती घेऊ. सगळ्याच पूजांमध्ये लागणारे व श्री सत्यनारायणाला प्रिय असे तुळशीचे पान हे श्वसनसंस्थेवरील उत्तम औषध आहे. सर्दी, खोकला यात तुळशीचा रस मधाबरोबर चाटवावा. डोकेदुखीमध्ये तुळशीच्या रसाचे थेंब नाकात घालावेत. घसा खवखवत असेल तर तुळशीची पाने चघळावीत. थंडीतापात तुळशीचा रस किंवा तुळशीच्या पानांचा काढा उपयोगी ठरतो. भूक न लागणे, पोटदुखी, पोटात जंत होणे याकरताही तुळस उपयुक्त ठरते. दमेकऱ्यांची घुसमट कमी होण्यासाठी तुळशीचा रस वारंवार द्यावा. हीच सगळी कार्ये मंगळागौरीला वाहिला जाणारा आघाडाही करतो. पूजेमध्ये लागणारा पारिजातक हे थंडीतापावरचे उत्तम औषध आहे. अनेकदा पावसाळ्यात येणाऱ्या तापाचे कारण कळत नाही. असा येणारा ताप किंवा मलेरियातील ताप यात पारिजातकाच्या पानांचा काढा अतिशय उपयुक्त ठरतो.
डोरलीसारखी वनस्पती खोकला, सर्दी कमी करते. दमा कमी करण्यासाठीसुद्धा डोरलीचा उपयोग होतो. या आजारांवर उत्तम काम करणारे आणखी एक पान म्हणजे ‘धोतऱ्याचे पान. धोतऱ्याचे पाने जाळून त्यांचा धूर घेतल्यास वरील आजार कमी होतात. अपराजिता किंवा गोकर्ण ही आणखी एक उपयुक्त वनस्पती. अपराजिता वात, पित्त, कफ या तीनही दोषांचे शमन करते. कफ चांगला सुटण्यासाठी गोकर्णीच्या मुळांचा रस उपयोगी पडतो. वाढलेल्या टॉन्सिल्स कमी होण्यासाठी बिया उपयोगी पडतात. अर्धशिशीत मुळांच्या रसांचे थेंब नाकात टाकतात.
या ऋतूमध्ये पचनशक्ती मंदावलेली असते. पचनशक्ती सुधारण्यासाठी पत्रींमधला माका उपयोगी असतो. माक्याचा रस हे यकृतावरील उत्तम औषध आहे. त्यामुळे भूक न लागणे, अपचन यांसारखे विकार बरे होतात. पोटातील जंतांवर सुद्धा माका हे चांगले औषध आहे. यकृतावरील आणखी एक चांगले औषध म्हणजे बेल. बेलांच्या पानांचा काढा किंवा पानांचे चूर्ण वापरावे. बेलाचे कच्चे फळ जुलाबावरील उत्तम उपाय आहे. फळांचा मगज किंवा मुरंबा वापरावा. बेलाच्या मुळांचा काढा वर्षाऋतूत होणारा वातप्रकोप कमी करतो. दवण्यासारखी तीक्ष्णगंधी वनस्पती ताप, तापातील अंगदुखी कमी करते. सर्दी, खोकला यांवर उपयोगी पडते. त्याचप्रमाणे भूक वाढणे, जंत होणे, यकृताचे कार्य सुधारणे यांसाठीसुद्धा उपयोगी पडते.
दूर्वा, जाई, जुई यांसारख्या वनस्पती पावसाळ्यात होणारा पित्ताचा संचय कमी करण्यास उपयोगी ठरतात. शमीचे पानसुद्धा पित्तशामक असते. जुलाब थांबवण्यासाठीसुद्धा याचा उपयोग होतो. या सगळ्या वनस्पतींचे इतरही अनेक उपयोग आहेत. इथे आपण मुख्यतः पावसाळ्यातील आजारांशी निगडित उपयोग पाहिले आहेत.
प्रपंच असो वा परमार्थ ! दोन्ही साधण्यासाठी साधन असतं – आमचं निरोगी शरीर. पावसाळ्यातील विविध व्रतवैकल्यं पार पाडण्यासाठी या ऋतूमधे निर्माण होणाऱ्या आजारांपासून रक्षण होणे महत्त्वाचे असते. विविध पूजांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या वनस्पती म्हणूनच पूजेच्या निमित्ताने आमच्या घरात येतात आणि आम्हांला आरोग्यासाठी उपयोगी पडतात. मित्रांनो, वर्षाऋतुचर्या आपण पाहिली. श्रावणातील व्रतवैकल्ये व त्यांचा आयुर्वेदोक्त वर्षाऋतुचर्येशी असणारा जवळचा संबंधही आपण पाहिला. श्रावणाची ही ‘साठा उतरांची कहाणी’ इथंच संपवतो.
डॉ . मयुरेश आगटे
सूचना :- कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर या लेखात नमूद केलेली सर्व औषधे वापरा.