श्रावणातील व्रतवैकल्य आणि आयुर्वेद

Importance of Shravan

परवा सकाळीच फोन खणखणला. फोनवर माझ्या अगदी जवळच्या मित्राचा आवाज. खूप दिवसांत भेट नाही, म्हणून जेवणाच्या निमित्ताने भेटण्याचे आग्रहाचे आमंत्रण त्यानं मला दिलं. माझा हा मित्र मांसाहाराचा शौकिन. त्याचं त्यासाठीचं आवडतं हॉटेलही ठरलेलं. केवळ औपचारिकता म्हणूनच मी ‘त्या हॉटेलमध्ये भेटायचं ना’ असं विचारलं. मात्र, या वेळी मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्यानं चक्क शुद्ध शाकाहारी हॉटेलचा पत्ता देऊन तिथं भेटायला बोलावलं. आम्ही प्रत्यक्ष भेटेपर्यंत मी या आश्चर्याच्या धक्क्यातच वावरत होतो. म्हणूनच ठरलेल्या वेळी भेटल्यावर मी आधी या ‘शुद्ध शाकाहारी’ प्रकाराबद्दल विचारणा केली, ‘अरे का रे, तुझी तब्येत ठीक आहे ना ! चक्क तू आणि ‘व्हेज’ हॉटेलमध्ये !’ त्यावर कानावर हात ठेवत ‘विनयपूर्वक’ उत्तर त्यानं दिलं. ‘मित्रा, ‘श्रावण’ सुरू आहे. आपण श्रावण कडक पाळतो. मांसाहार खाणं सोड, पण श्रावणात त्याचं नाव पण घेत नाही.’

‘पण खाल्लं तर बिघडलं कुठं ? श्रावणात नॉन-व्हेज खाऊ नये, असा कुठे कायदा आहे ? इतर सगळ्या महिन्यात पोटभर ताव मारतोस, मग बिचाऱ्या श्रावणाने काय घोडं मारलं. श्रावणात नॉन-व्हेज खाल्ल्यामुळं पाप लागतं आणि एरवी खाल्ल्यामुळं पुण्य वाढतं का ?’ माझ्या या एकामागोमाग एक विचारलेल्या प्रश्नांमुळे माझा मित्र निरुत्तर झाला होताच. पण त्याच्या चेहऱ्यावर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं कुतूहल मात्र स्पष्ट दिसत होतं. सुदैवानं मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं माझ्याजवळ तयार होती. कारण यांची उत्तरं दडली होती आयुर्वेदोक्त वर्षाऋतुचर्येमध्ये !

गेल्या लेखात पावसाळ्यात असलेल्या शारीरिक स्थितीचा आपण आढावा घेतला. त्यात ‘पचनशक्ती कमी असणे’ हा महत्त्वाचा उल्लेख केला होता. याच पार्श्वभूमीवर श्रावणातलं मांसाहार संदर्भातील ‘पथ्य’ आपण ‘परंपरे’च्या अंगरख्याखाली पाळत असतो. मांसाहार पचायला अतिशय जड असतो. त्यामुळे त्याचे सेवन हे अजीर्ण आदी पचनसंस्थेच्या विकारांना आमंत्रण देणारे ठरते. म्हणून या महिन्यात आपण मांसाहार वर्ज्य करावा, हा यामागचा उद्देश ! केवळ मांसाहारच नव्हे, श्रीखंड, बासुंदी अशी पचण्यास जड अशी पक्वान्नंसुद्धा टाळणं गरजेचं आहे. मांसाहार घ्यायचाच झाल्यास मटण किंवा चिकन सूप या स्वरूपात, तोही कमी प्रमाणात घ्यावा. तसेच हे सूप करताना त्यात मिरपूड, हिंग, जिरे टाकण्यास विसरू नका. या पदार्थांमुळे हे सूप पचण्यास सहकार्य मिळते.

श्रावणात आपण असंख्य ‘उपवास’ करतो. श्रावणी सोमवार, शुक्रवार, शनिवार असे इतर कोणत्याही महिन्यात न दिसणारे उपवास या महिन्यात आवर्जून हजेरी लावतात. यामागेसुद्धा उपवासाच्या निमित्ताने पचनशक्तीवर ताण पडू नये हाच उद्देश असतो. अर्थात, यात खरोखरच पूर्ण लंघन किंवा राजगिरा, फळे असे पचनास हलके पदार्थच खाणे अपेक्षित आहे. सध्याच्या उपवासाचे विविध पदार्थ बघता हा उद्देश कितपत साध्य होतो हा विषय आपण पाहिला आहेच.

या ऋतूमध्ये पित्तही शरीरात साठत असते. म्हणून इडली, डोसा, ढोकळा, ब्रेड असे आंबवलेल्या पदार्थांचे अतिसेवन झाल्यास अम्लपित्तासारखे आजार डोकं वर काढतात. म्हणूनच या पदार्थांचे सेवन हे टाळलेलेच बरे ! ब्रेड खायचा झाल्यास भाजून टोस्ट करून त्याला लोणी लावून खाण्यास हरकत नाही. याच दृष्टीने वडे, भजी असे तळलेले पदार्थ जरा जपूनच खावेत. दहीसुद्धा या ऋतूत निषिद्धच ! फ्रीजमध्ये ठेवलेले सर्व ‘गार’ पदार्थ या ऋतूत कटाक्षाने टाळले पाहिजेत. कारण असे पदार्थ पचायला जड तर असतातच, शिवाय सर्दी, खोकला अशा अनेक आजारांना आमंत्रित करतात. या ऋतूत कोणताही पदार्थ खाताना गरम आणि ताजा असणे हितकर असते. ‘तव्यावरची पोळी’ म्हणतात तसं जेवण म्हणजे आदर्शच !

हा जो अपथ्यांचा ‘ना’चा पाढा मी वाचतोय, त्याविषयी एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते. या सगळ्या अपथ्यांपैकी काही गोष्टी सेवनात आल्या की लगेचच प्रत्येक वेळी आरोग्याची मोठी समस्या निर्माण होईल, असा याचा अर्थ नाही. हे सगळे पदार्थ रोगांना कारणीभूत ठरू शकतात, याची जाणीव आपल्याला असणं आवश्यक आहे. म्हणजे आपोआपच आहारात त्यांचा वापर कमी होईल.

विहाराचा विचार करताना पावसात बाहेर पडताना छत्री, रेनकोट यांचा वापर करावा. पावसाळी बुटांचा वापर अधिक चांगला. कपडे वापरताना ते दमट, नसावेत. यासाठी चांगले इस्त्री केलेले किंवा धुपवलेले कपडे वापरावेत. पावसात भिजल्यास खुप वेळ अंगावर ओले कपडे असू नयेत. शक्य तेवढ्या लवकर अंग कोरडे करणे महत्त्वाचे आहे. बाहेरच्या गारव्याचा प्रतिकार करण्यासाठी जाड सुती किंवा लोकरीचे कपडे वापरात ठेवावेत. घर उबदार राहण्यासाठी रूम हीटर्सचा उपयोग करायलाही हरकत नाही.

पावसाळ्यात काही वेळा सर्वत्र दिवसभर तुफान पाऊस कोसळत असतो. ढगाळ, कोंदट हवामानात घराबाहेर जावेसेच वाटत नाही. निरुत्साह जाणवत असतो. अशा दिवसाचे वर्णन ग्रंथकारांनी ‘दुर्दिन’ असे केले आहे. दुर्दिन असताना कोणतेही काम करू नये, अगदी अभ्यासही टाळावा. अर्थात दुपारी झोपणे मात्र टाळावे.. दिवसांचासुद्धा खूप सुरेख उपयोग आपल्या परंपरेने करून घेतला. कसा माहीत आहे ?

मी त्याविषयी काही बोलणार इतक्यात त्या हॉटेलचा वेटर म्हणाला, ‘साहेब, बराच वेळ झाला. आता तरी ऑर्डर द्या.’ या वाक्याने मी आणि माझा मित्र दोघेही भानावर आलो. माझ्या बोलण्याची त्यानं गांभीर्यानं दखल घेतली असावी. कारण त्याची आवडती पण ‘पचायला जड’ असणारी पंजाबी डिशची ऑर्डर टाळून चक्क त्यानं जिरा राईस मागवला. त्या दिवशीचं संपूर्ण बिल त्यानं दिलं आणि त्या मोबदल्यात माझ्याकडून आश्वासन घेतलं, श्रावणातील परंपरा आणि वर्षाऋतुचर्या याविषयी ‘पुढील भेटीत’ गप्पा मारण्याचं !

डॉ . मयुरेश आगटे

4