डॉ’क्टर, खरंच सांगतो. घरातलचं खाणं करतो. बाहेरचं अजिबात खात नाही. घरातसुद्धा नेहमीचच खाणं करतो. सगळेच पदार्थ व्यवस्थित जेवतो. तरी पण बऱ्याच वेळा पोट गच्च होतं. गॅसेस होतात. अजीर्ण झाल्यासारखं वाटतं. हे कशामुळे होत असेल ?’ अशी तक्रार सांगणारे अनेक रुग्ण असतात. त्यांच्या आहाराच्या पदार्थात खरोखरच कोणतीच फारशी चूक नसते. तरीसुद्धा पचनाशी संबंधित काही ना काही त्रास त्यांना वरचेवर होत असतात. अशा वेळेला त्यांच्या आहारासंदर्भातील सवयींचा विचार करावा लागतो. त्याचप्रमाणे त्यांच्या शरीराची मूळ प्रकृती व आहाराची पद्धत यांचाही अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते. इतकेच नव्हे, तर बाह्य ऋतू, आपण राहतो तो प्रदेश, अन्न शिजवण्याची पद्धत, अन्नाचे रंगरूप अशा अनेक गोष्टींचा विचार महत्त्वाचा असतो. कारण या सगळ्यांचा परिणाम आहाराच्या पचनावर व त्यापासून मिळणाऱ्या पोषणावर कळत- नकळत घडत असतो. म्हणूनच आतापर्यंत आहारामागचे ‘शास्त्र’ पाहिल्यावर या आहारावर परिणाम करणाऱ्या इतर गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत.
अनेक लोकांना एकदा जेवण झाल्यावर काही काळ जाण्याच्या आतच पुन्हा काहीतरी खाण्याची सवय असते. पहिले घेतलेले अन्न तोपर्यंत पचलेलेही नसते. मग पचनशक्तीवर पडणाऱ्या या ‘नवीन’ ताणामुळे पहिले व आताचे दोन्ही अन्न पचत नाही. नेहमीचे ‘योग्य’ पदार्थ खाण्यात असले, तरी मग अजीर्णाचा त्रास होतो. म्हणूनच पहिले घेतलेले अन्न नीट पचल्याशिवाय नवीन अन्न घेऊ नये. पहिले अन्न पचल्याची खात्री करण्यासाठी काही लक्षणे आपल्या स्वत:लाच तपासता येता यामध्ये पोट हलके होणे, नवीन उत्साह येणे, मल-मूत्र यांची व्यवस्थित प्रवृत्ती हो जेवणानंतर काही काळाने येणारी ढेकर करपट किंवा कोणताही वास नसणारी असणे, अन्न पचल्यावर ‘खरी’ भूक व तहान लागणे यांसारखी लक्षणे निर्माण होतात. ही लक्षणे निर्माण होण्यासाठी साधारण तीन ते चार तासांचा किमान अवधी लागतो. म्हणून एकदा जेवल्यावर किमान इतका वेळ ‘काहीही’ न खाणे आवश्यक असते, या काळानंतर भुकेची संवेदना निर्माण झाल्यावरही ‘पोटभर’ खाणे अपेक्षित नाहीच !
एकदा नीट जेवल्यावर लगेचच पुन्हा भूक लागत असेल, तर ती अनेकदा ‘खोटी’ भूक असते. म्हणूनच प्रत्येकाने अन पचल्याचा अंदाज घेऊनच अन्न सेवन करावे.
जसे एकावर एक अन्न घेणे अयोग्य आहे, त्याचप्रमाणे अयोग्य वेळी कमी वा जास्त प्रमाणात अन्नसेवन चुकीचे आहे. भूक लागलेली नसताना केवळ जेवणाची वेळ झाली म्हणून जेवण करणे ही सवय अनेकांना असते. तसेच भूक कडकडून लागलेली असताना कामाचा ‘व्याप’ हे कारण सांगून जेवण करण्याचे टाळले जाते. या दोन्ही ‘वेळा’ आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक आहेत. वेळेच्या बाबतीत म्हणूनच ‘अभ्यासपूर्वक’ नियमितपणा आणायला हवा. भुकेची संवेदना होण्याची वेळ, कामाचा व्याप व उपलब्ध वेळ यांचा नीट मेळ आपणच घालायला हवा. ‘प्राइम ‘लंच टाइम’ या लेखात याविषयी सविस्तर चर्चा पाहिलीच आहे.
काही विशिष्ट पदार्थ एकत्र करून खाणे हे आरोग्यास हितकारक नसते. दूध आणि कोणतेही फळ एकत्र करून तयार होणारे फ्रूट सॅलेड, शिकरण यांसारखे पदार्थ, दूध व मासे, मध आणि गरम पाणी असे पदार्थ एकत्र केल्याने त्यात शरीराला अपायकारक असे गुणधर्म निर्माण होतात. म्हणूनच अशा पदार्थांचे ‘दीर्घकाळ’ सेवन केल्यास यातून ताप, त्वचारोग, अंगावर सूज येणे, मूळव्याध असे अनेकविध रोग निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणूनच असे पदार्थ एकत्र करून सेवन न करता वेगवेगळे व वेळेचे माफक अंतर ठेवून सेवन करावेत. गरम व गार पदार्थ एकत्र करून किंवा एकापाठोपाठ एक घेण्याची सवय अनेकांना असते. कॉफी व आइस्क्रीम असे एकत्र घेणे, चहानंतर कोल्डड्रिंक किंवा ताकासारखे पदार्थ सेवन करणे अशा सवयीसुद्धा आरोग्यास हानीकारक आहेत. अनेकदा आपण उगाचच चहापूर्वी पाणी पितो व त्यावर लगेच चहा पितो. त्यामुळे दोन परस्परविरोधी गुणांचे पदार्थ पोटात जाऊन शरीराला त्रासदायक असे मिश्रण तयार होते. यातूनच ‘हळूहळू’ रोगांची निर्मिती सुरू होते. मित्रांनो, यांतल्या अनेक
गोष्टी आपण नकळतपणे करत असतो. त्यांची योग्य जाणीव व्हावी, हाच या लेखाचा उद्देश !
डॉ . मयुरेश आगटे