दिवसभरच्या रणरणत्या उन्हात फिरावं लागल्यामुळे सुरेश पूर्णतः वैतागून गेला होता. सततच्या घामाच्या धारांनी थबथबला होता. उन्हाच्या काहिलीनं रोजचा दिवस सहनशक्तीचा अंत पाहणारा ठरत होता. ‘या जगात इतके शोध लागत आहेत, मग अजून हँडी फॅन किंवा ए.सी.चा शोध का लागत नाही ?’ रोजच्या त्रासातून निर्माण झालेले सुरेशचे हे उद्गार !
या ऋतूतील सूर्यसंतापाला तोंड देण्यासाठी आपण सगळेच सुरेशप्रमाणेच ‘गार’ वातावरणाला आसुसलेलो असतो. ग्रीष्म ऋतुचर्येतील विहारातही हाच महत्त्वाचा मुद्दा ग्रंथात मांडला आहे. त्या दृष्टीने पंखे, कूलर्स, एअर कंडिशन यांचा वापर आवश्यकच आहे. खोलीत गारवा राहण्यासाठी खिडक्यांना वाळ्याचे पडदे लावावेत. या पडद्यांवर पाणी शिंपडल्याने अधिकच गारवा निर्माण करतो. काही व्यक्तींना पंख्याच्या किंवा कूलर्सच्या वाऱ्याने सर्दी होणे, अंग जड होणे असे त्रास होत असतात. अशा लोकांनी या वाऱ्याचा झोत प्रत्यक्ष अंगावर येणार नाही, याची काळजी घ्यावी. या बाबतीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हातून आल्यावर लगेच गार वातावरणात जाणे किंवा ए.सी.च्या वातावरणातून लगेच उन्हात जाणे या गोष्टी शक्यतो टाळाव्यात. कारण यात होणारा तापमानातील अचानक बदल शरीराला त्रासदायक ठरू शकतो.
पिण्याप्रमाणेच आंघोळीसाठीही गार पाणी वापरावे. शॉवर, टबबाथ अशा साधनांचाही या वेळी उपयोग होतो. गारवा सतत मिळण्यासाठी ओला रुमाल, नॅपकिन अंगावर गुंडाळावे. या सततच्या गार स्पर्शामुळे उकाडा सुसह्य होत असतो.
घराबाहेर पडताना रेशमी, सूती कपडे घालावेत. कपडे तलम कापडाचे व सैलसर असावेत. त्याचप्रमाणे सगळे गडद रंग उष्णता वाढवतात. म्हणून असे कपडे न वापरता सौम्य रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे या ऋतूमध्ये अधिक हितावह ठरतात. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोपी, छत्री यांचा वापर अनिवार्यच ठरतो. उन्हाची तीव्रता डोळ्यांसाठी नेहमीच हानिकारक असते. याचसाठी न विसरता काळा गॉगल प्रत्येकाने वापरणे आवश्यक आहे. अर्थात, दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळणे अधिकच चांगले.
उन्हातून घरी आल्यावर एक महत्त्वाची काळजी घेणे आवश्यक आहे. आपण आल्या-आल्या लगेचच गार पाण्याने तोंड धुतो. असे करणे डोळ्यांच्या ताकदीच्या दृष्टीने अतिशय अपायकारक आहे. म्हणूनच उन्हातून आल्यावर काही काळ जाऊ द्यावा. शरीराचे तापमान कमी झाल्यावर मग गार पाण्याने चेहरा धुवावा.
ग्रीष्म ऋतूमध्ये शक्यतो व्यायाम टाळायला हवा. कारण व्यायामाने या काळात अधिकच थकवा येण्याची शक्यता असते. त्यातल्या त्यात पोहण्याचा व्यायाम घेणे उपयुक्त ठरते. त्यातही खूप न पोहता जमेल तेवढे पाण्यात डुंबत राहणे हितावह आहे. व्यायाम करावयाचा झाल्यास सकाळी, संध्याकाळी ऊन नसताना सावकाश चालण्याचा व्यायाम करावा. हेसुद्धा खूप वेळ करणे अपेक्षित नाही.
ग्रीष्म ऋतूमध्ये शरीरातील रूक्षता वाढत असते. वातदोषाचा संचय, बलहानी यासुद्धा घटना घडतात, हे आपण पाहिले. या सगळ्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरते, ती दुपारची झोप ! अन्य ऋतूमध्ये अनारोग्यकर दुपारची झोप या ऋतूमध्ये मात्र अवश्य घ्यावी. रात्री झोपतानासुद्धा मोकळ्या अंगणात, गच्चीवर चांदण्यात झोपावे. चांदण्याची शीतलता या काळात खूपच लाभदायी ठरत असते. चांदण्यात बसणे किंवा मोकळ्या हवेत फिरायला जाणे, असे उपक्रमसुद्धा नियमित करावेत.
उन्हाळ्यात चंदन, कापूर, नागरमोथा अशा थंड पदार्थांचा शरीरावर लेप लावावा. यामुळे उष्णता कमी होतेच. शिवाय ही सुगंधी द्रव्ये मनही प्रसन्न ठेवतात. यासाठी मोगरा, जाई, जुई अशा सुगंधी फुलांचाही वापर करावा. निरनिराळी अत्तरे, सेंटस्, डिओडोरन्ट्स यांचाही या ऋतूत ‘फ्रेश’ वाटण्यासाठी मुक्तहस्ते उपयोग करण्यास हरकत नाही.
डॉ . मयुरेश आगटे