मकर संक्रातीपासून ते रथ सप्तमी पर्यंतच्या कलाला ऋतुसंधी म्हणतात.त्यामुळे आपण शिशिर ऋतूची ऋतुचर्या हळू हळू कमी करत हळू हळू वसंत ऋतुचर्या सुरु करतो. त्यामुळे ह्या काळातील साजऱ्या होत असलेल्याप्रथा आणि परंपरांबद्दल आपण थोडंसं बोलूया.
गुलाबी थंडीचा हिवाळा संपतो आणि येते ती जानेवारी महिन्यातील मकरसंक्रांत ! ‘तिळगूळ घ्या आणि गोड बोला’ असं प्रेमाने म्हणत प्रत्येकाच्या घरातील चविष्ट गुळाची पोळी आणि त्यावर मस्त साजूक तूप यामुळे आनंदाची आणखीनच भर पडत आहे. ‘मकरसंक्रांत’ या सणानिमित्त दिसणारं हे नेहमीचंच चित्र.
‘संक्रमण’ म्हणजेच एका स्थानापासून दुसऱ्या स्थानाकडे जाणे. सूर्याचे ‘मकर’ राशीकडे होणारे स्थित्यंतर म्हणजे ‘मकर संक्रमण.’ नोव्हेंबर, डिसेंबर या काळात सूर्याचे दक्षिणायन असते. संक्रांतीच्या सुमारास त्याचे दक्षिणेकडून उत्तरेकडे स्थित्यंतर सुरू होते. अर्थात हा बदल हळूहळू घडत असतो. यापुढे हिवाळ्याचा शेवटचा काळ उरलेला असतो. थंडीची तीव्रता या काळातही बऱ्यापैकी असते. या थंडीचा प्रतिकार करणे व त्याबरोबरच या शिशिर ऋतूचा शरीराची ताकद वाढण्यासाठी पुरेपूर उपयोग करून घेणे, हा मकर संक्रांतीच्या ‘मेनूचा’ मुख्य उद्देश आहे.
गुळाची पोळी, तीळ-गूळ हे पदार्थ हे उद्देश निश्चित साध्य करणारे आहेत. गूळ हा गुणाने उष्ण असा पदार्थ. त्यामुळे गुळाची पोळी शरीरात उष्णता निर्माण करते. त्यामुळे थंडीपासून संरक्षण होते. गूळ हा अतिशय पौष्टिक पदार्थ आहे. त्यामुळे त्याचे सेवन हे शरीराची ताकद वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. थंडीच्या काळात भूक उत्तम असते. पचनशक्तीही चांगली असते. म्हणूनच पचायला तसा जड असणारा गूळ या काळात सहज पचतो. हे पचन सुलभ होण्यासाठी आपण गुळाच्या पोळीला साजूक तुपाची जोड देतो. कारण साजूक तूप हा पचनशक्ती वाढवणारा
उत्तम आहारीय पदार्थ आहे. गूळ उष्ण असल्याने शरीरातील उष्णता अधिक वाढण्याची शक्यता असते. ज्या व्यक्ती पित्त प्रकृतीच्या असतात. त्यांना पित्त वाढण्यासारखे त्राससुद्धा क्वचित दिसतात. असे त्रास होऊन नयेत हाही साजूक तूप घेण्याचा दुसरा उद्देश ! कारण साजूक तुपाने पित्त कमी होते. अतिरिक्त उष्णतेपासून होणारा त्रासही टळतो. शिवाय गुळाच्या पौष्टिकतेला साजूक तुपाने चांगला हातभार लागत असतो. म्हणूनच गुळाच्या पोळीबरोबर तुपाचा भरपूर वापर करायला हवा.
तिळगुळात आपण गुळाबरोबर तिळाचाही उपयोग करतो. गुळाप्रमाणेच तीळसुद्धा उष्ण आहेत. त्यामुळे भूक वाढणे, शरीरात उष्णता निर्माण करणे, यासाठी त्यांचा चांगला उपयोग होतो. तीळ, गूळ या दोन्ही पदार्थांमध्ये स्निग्धता असते. थंडीमुळे शरीरात कोरडेपणा वाढलेला असतो. त्वचासुद्धा रूक्ष बनते. अशा वेळी संपूर्ण शरीराला स्निग्धता पुरवण्याचे काम हे दोन पदार्थ अतिशय उत्तम करतात.
हिवाळ्यातील ऋतुचर्या बघता आपण या काळात मुख्यत: वात, कफांचे आजार होतात. गूळ व तीळ हे दोन्ही वात व कफ कमी करणारे उत्तम पदार्थ आहेत. साहजिकच सांधेदुखी, कंबरदुखी असे वाताचे आजार, तर सर्दी, खोकला, छातीत कफ साठणे असे कफाचे आजारही कमी व्हायला त्यांचा उपयोग होतो. हे दोन्ही पदार्थ शरीरातील उष्णता वाढवत असल्याने थंडीमुळे हातपाय गार पडणे, अंग बधिर होणे अशी लक्षणेही कमी होतात. यासाठी तिळाचे तेल बाहेरून अंगाला लावणेही फायदेशीर असते. थंडीने त्वचा सुरकुतणे, त्वचेला भेगा पडणे अशा त्रासातही त्याचा बाह्य उपयोग अवश्य करावा. या दृष्टिकोनातून संक्रांतीनिमित्त आपल्या परंपरेने केलेली तिळाची व गुळाची निवड किती ‘शास्त्रीय’ आहे, हे सिद्ध होते. साखर, तिळापासून केला जाणारा हलवा हासुद्धा शरीरात स्निग्धता निर्माण करणे, शरीराचे बल वाढवणे याकामी उपयुक्त असतो. शिवाय तिळगुळाचे अतिसेवनाने होणारे त्रासही कमी करण्यास त्याचा उपयोग होतो. संक्रांतीप्रमाणेच पौष महिन्यात ‘धुंधुरमास’ पाळण्याची प्रथा आहे. ‘धुंधुरमास’ म्हणजे पहाटे लवकर उठून बाजरीची भाकरी, गुळाची पोळी, वांग्याचे भरीत असा आहार घेणे. हे सगळेच पदार्थ उष्ण असल्याने थंडीपासून संरक्षण करतात. मात्र, बाजरीमुळे शरीरातील कोरडेपणा वाढण्याची शक्यता असल्याने त्यामध्ये ‘स्निग्ध’ असे तीळ मिसळले जातात. सकाळी उठून असा नेहमीचा आहार घेतल्याने शरीराची ताकद वाढते. ‘भडकलेल्या’ पचनशक्तीची अन्नाची गरजही चांगल्या प्रकारे भागते या काळात बोरं, आवळे अशी फळे तयार होत असतात. त्यांचा आपल्या घरात काही निमित्ताने प्रवेश व्हावा व त्यांचे सेवन होणे फायदेशीर असते. याला • उपयोगी पडते ते ‘बोरन्हाणा’सारखे निमित्त. अर्थात प्रत्येकाच्या घरात बोरन्हाण होतेच असे नाही. मात्र, या फळांचा प्रत्येकाने आस्वाद घ्यावा, हा त्यामागचा उद्देश ! अशा रीतीने पौष महिन्यातील सगळ्याच परंपरा आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. रोगाची ‘संक्रांत’ येण्यापूर्वीच आपण त्यांचे पालन करायला नको का ?
डॉ . मयुरेश आगटे