निसर्गत:च बाहेरचा गारवा शरीराला ताकद देत असतो. त्यातच वाढलेल्या पचनशक्तीमुळे भरपूर भूक लागते. अन्नाचे पचनही व्यवस्थित होऊन शरीर अधिकच सुदृढ होण्यास उपयोग होत असतो.
आहाराप्रमाणे पाणीसुद्धा हवे तेवढे घेण्यास हरकत नाही. अर्थात या ऋतूत मुळात तहानच कमी लागत असल्याने तसा फारसा प्रश्नच येत नाही. थंडीचा विचार करता गरम चहा, कॉफी, गरम दूध अशी पेये घ्यावीत. कोल्ड्रिक्स, फ्रीज किंवा माठातले गार पदार्थ या ऋतूत वर्ज्यच करावेत.
आहाराप्रमाणेच या ऋतूमधील विहार हासुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. यामध्ये महत्त्वाचा भाग असतो, तो व्यायामाचा ! सकाळी उठून शरीराला हितकर ठरेल, असा कोणताही व्यायाम करावा, तोही अगदी भरपूर प्रमाणात ! या व्यायामाने कमावलेली शरीरसंपदा पुढे वर्षभर आरोग्य उत्तम राहण्यास साह्यभूत ठरते.
या ऋतुमधील अभ्यंगाचे महत्त्व आपण पाहिलेच आहे. अभ्यंगानंतर स्नानापूर्वी नागरमोथा, अर्जुन, कचोरा, वाळा, चंदन अशा द्रव्यांनी केलेले उटणे अंगावर चोळावे. यामुळे त्वचेवर शिल्लक असणारा तेलाचा अंश निघून जातो. या कामासाठी आवळ्याची पावडरसुद्धा उपयुक्त ठरते. यानंतर गरम पाण्याने स्नान करणे इष्ट आहे.
जे १२ महिने गार पाणी स्नानास वापरतात, त्यांनी किमान कोमट पाणी वापरावे. पण खूप गार पाणी पूर्णतः अयोग्यच ! अभ्यंगातील तेलाप्रमाणेच व्हॅसलिन, विविध क्रीम्स, लोशन्स किंवा जेल यांचाही उपयोग त्वचेवर करण्यास हरकत नाही. एकूणच त्वचा स्निग्ध राहणे महत्त्वाचे !
हिवाळा या ‘बलदायी’ ऋतूमध्ये आरोग्य वाढण्यासाठी अनेकविध औषधेही हातभार लावतात. शतावरी, अश्वगंधा, यष्टिमधु, विदारीकंद, कवचबीज, भुईकोहळा, तालीमखाना, बला, वाराहकंद, मुसळी अशा औषधांचा शरीरपुष्टीसाठी वापर करावा. अश्वगंधारिष्ट, द्राक्षारिष्ट, द्राक्षासव, शतावरी कल्प, अगस्ती रसायन, अश्वगंधादि लेह, ब्राह्म रसायन अशा अनेकविध ‘टॉनिक’ स्वरूपात असणाऱ्या औषधांचाही चांगला उपयोग होतो. याच काळात आवळ्यांची आवक होत असते. आवळ्यांपासून तयार केलेले च्यवनप्राशही उत्तम रसायन औषध आहे. अर्थातच, यापैकी कोणतेही औषध स्वत:हून घेण्यापेक्षा योग्य वैद्यकीय सल्ल्यानेच घेतलेले अधिक फायद्याचे ठरते.
थंडीपासून संरक्षण करण्यासाठी रेशमी, लोकरीचे उबदार कपडे वापरले पाहिजेत. शरीराचा जास्तीतजास्त भाग आच्छादित असायला हवा. स्वेटर्स, जाकीट, मफलर, हातमोजे, शाल यांचा नियमित वापर हवा. गाडीवर जाताना यांच्या वापराबरोबरच हेल्मेटही जरूर वापरावे. त्यामुळे बोचऱ्या थंडीपासून डोक्याचे संरक्षण होते. घरात उबदार वातावरण राहण्यासाठी रूम हीटर्सचा उपयोग स्वागतार्हच ! शिवाय वेखंड, अगरू, गुग्गुळ अशी द्रव्ये जाळून त्यांचा धूप करावा. बाजारात मिळणारी धूपकांडीसुद्धा याकरता अवश्य वापरावी. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसणेसुद्धा अतिशय हितकर आहे. फक्त या ऋतूत दिवसा झोप घेणे शक्यतो टाळावे. अन्यथा कफाचे विकार होण्याची शक्यता असते. तसेच बाह्य वातावरण पाहता एअरकंडिशन, कूलर यांचा वापर टाळलेलाच बरा !
डॉ . मयुरेश आगटे
सूचना :- कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर या लेखात नमूद केलेली सर्व पदार्थ आपले वय आणि आपल्या प्रकृतीनुसार वापरा