सावकाश खा

Benefits of eating slowly

डॉक्टर, खरं तर माझीच चूक झाली. गेले महिनाभर अनेक लग्नकार्यं होती. वरचेवर पाहुणे मंडळीही ये-जा करत होती. त्यामुळे जवळजवळ रोज सुग्रास जेवणच चालू होतं. या सगळ्या भानगडीत जिभेवर ताबाच राहायचा नाही हो ! अक्षरश: पोटाला तडस लागेपर्यंत जेवण व्हायचं. त्याचेच परिणाम भोगतोय. करपट ढेकर, वरचेवर घशाशी आंबट येणं असा त्रास वारंवार होतोय !’

आंबलेल्या चेहऱ्याने मकरंद माझ्याशी बोलत होता. मी म्हटलं, ‘अरे चालायचं ! केव्हा तरी असं खाणं होणारच.’ मकरंद म्हणाला, ‘ते मलाही कळतंय हो डॉक्टर ! पण यापुढे तरी, असा त्रास न होण्यासाठी काय करायला हवं ? केव्हातरी फंक्शनला भरपेट खाणं होतंच; पण एरवीच्या दिवशी तरी नक्की किती खाणं करावं, जेणेकरून असे त्रास होणार नाहीत.’ मकरंदने आहारासंदर्भात अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला होता. मकरंदच्या निमित्ताने मी तुम्हा सगळ्यांशीच याविषयी चर्चा करणार आहे. आहारासंदर्भात पचनशक्ती, जेवणाची वेळ यांचा विचार पाहिल्यानंतर ‘आहाराचे प्रमाण’ हा पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे.

याचा विचार करण्यापूर्वी थोडीशी पचनक्रियेची माहिती घेऊ. अन्न सेवन केल्यानंतर अन्न जठरात जाते. अन्नाचे पचन होण्यासाठी अन्नाचे कण वेगळे होणे आवश्यक असते. यासाठी जठरात अन्न घुसळून बारीक केले जाते. नंतर पुढे विविध पाचक स्राव अन्नात मिसळून या बारीक कणांचे पचन करतात. पचनामध्ये अन्नावर अशा रीतीने घुसळणे, बारीक करणे, स्राव मिसळणे अशा विविध प्रक्रिया होत असतात. या सगळ्या गोष्टी उत्तम रीतीने पार पडण्यासाठी पोटातील अवयवांमध्ये पुरेशी ‘जागा’ मिळणे आवश्यक असते. एक साधं उदाहरण बघा. स्वयंपाक करताना भांड्यात एखादा पदार्थ काठोकाठ भरला, तर आपल्याला ढवळणे, घुसळणे, परतणे अशा कोणत्याच प्रक्रिया नीटपणे त्या पदार्थावर करता येत नाहीत. शिवाय जेवढे पदार्थाचे प्रमाण अधिक तेवढा शिजवणाऱ्या अग्नीचा वापर अधिक करावा लागतो.

शिवाय पदार्थ शिजवण्यासाठी वेळही अधिक लागतो. म्हणूनच स्वयंपाक आपण नेहमीच कोणत्याही भांड्यातील काही भाग रिकामाच ठेवतो. • व्यवहारातील हीच गोष्ट आपल्या पोटालाही लागू पडते. जर पोट ‘तुडुंब’ भरले तर जठर आदी अवयवांमध्ये घडणाऱ्या घुसळणे, पचन करणे यांसारख्या क्रिया नीट होत नाहीत. अन्नपचन करणाऱ्या पचनशक्तीवरही ताण पडतो. यामुळे विलंब तर लागतोच; शिवाय या सगळ्या प्रकारात अन्नाचे पचन व्यवस्थित न होण्याची शक्यताही नाकारता येत नाही आणि म्हणूनच जेवणाचे प्रमाण ‘मर्यादित’ असणे आवश्यक आहे.

‘मर्यादित’म्हणजे नेमके किती ? कारण या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळे येईल. पूर्वी आपण पचनशक्तीचे प्रकार पाहिले होते. त्यानुसार प्रत्येकाचे आहाराचे प्रमाण बदलते, असाही उल्लेख आपण पाहिला होता. पण या प्रश्नाचेही सुंदर विश्लेषण ग्रंथकारांनी केले आहे.

त्यानुसार प्रत्येक व्यक्तीने पूर्ण पोटभर न जेवता आपल्या क्षमतेच्या तीन चतुर्थांशच आहार सेवन करावा. एक चतुर्थांश भाग रिकामा ठेवावा. या रिकाम्या जागेमुळे पचनाशी संबंधित सगळ्या क्रिया सुलभपणे पार पडून पचन व्यवस्थित होते. प्रत्येकाने आपल्या आहाराच्या क्षमतेप्रमाणे याचा विचार करणे आवश्यक आहे. ही गोष्ट व्यवहारात आणणेही सहज शक्य आहे. समजा एखाद्या मनुष्याचे चार पोळ्यांनी पोट गच्च भरत असेल, तर त्याने अडीच ते तीनच पोळ्या घ्याव्यात. असा प्रत्येकाने स्वत:च्या आहाराचा अभ्यास केला तर ‘तीन चतुर्थांश’ म्हणजे नक्की किती ? हे आपल्याला सहज ठरवता येईल. ‘मर्यादित आहार’ म्हणताना प्रत्येक व्यक्तीच्या पचनशक्तीनुसार स्वतंत्र पण अचूक उत्तर देता येईल. थोडक्यात, नेहमी दोन घास कमी घ्यावेत. जेवण झाल्यावर पानावरून उठताना अजूनही थोडीशी भूक आहे, असे जाणवायला हवे.

आपण जेवताना नेहमी ‘सावकाश जेवा’ असं म्हणतो. यात सावकाश याचा अर्थ संथ गतीने, हळूहळू जेवण करावे असा आहेच; पण त्याचबरोबर ‘स-अवकाश’ म्हणजे जेवताना पोटात थोडी मोकळी जागा ठेवून जेवण करा, असाही दुसरा महत्त्वाचा अर्थ लपलेला आहे.

डॉ . मयुरेश आगटे

सूचना :- कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर या लेखात नमूद केलेली सर्व पदार्थ आपले वय आणि आपल्या प्रकृतीनुसार वापरा

3