सदाबहार वसंत ऋतूमधील अपेक्षित आहाराचा विषय आपण पाहात होतो. या काळात पचायला हलका असा आहार हवा. आहारात कडू,तिखट, तुरट पदार्थांचे प्रमाण अधिक असणे आवश्यक असते. त्यामुळे या काळात होणारा कफप्रकोप कमी होतो.
या पदार्थांप्रमाणेच या ऋतूत दूध, ताक यांचा जरूर वापर करावा. दूध वापरताना प्रथम तापवून घ्यावे, मगच वापरावे. यामुळे त्याचा कफ करण्याचा गुणधर्म कमी होतो. ते पचायलाही हलके होते. या ऋतूत होणारा बलाचा ऱ्हास कमी करण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. ताक वापरताना त्यात हिंग, जिरे, चाट मसाला असे पदार्थ टाकण्यासही काहीच हरकत नाही. दही हे कफवर्धक असल्याने त्याचा वापर टाळायला हवा. तसेच साजूक तुपापेक्षा तेलाचा वापर करणे अधिक श्रेयस्कर ठरते.
आहारात मांसाहाराचे प्रमाण या काळात कमी असावे. शेळी, मेंढी, कोंबडी यांचे मांस तुलनेने पचायला हलके असल्याने त्यांचा वापर करावा. मांसाहारापेक्षा मटण किंवा चिकन यांचे सूप घेतल्यास पचनाच्या दृष्टीने अधिक चांगले ! सूपमध्ये हिंग, जिरे आदी मसाल्याचे पदार्थ जरूर घालावेत. मांसाहारासाठी मासे, खेकडा अशा प्राण्यांचा मात्र कधीच उपयोग करू नये. मांसाहाराप्रमाणेच पक्वान्ने, मिष्टान्ने यांचे प्रमाणही कमी असावे.
बाह्य वातावरणात उष्णता वाढायला लागल्याने गार पदार्थांची इच्छा व्हायला लागते. पण वसंत ऋतूच्या सुरुवातीच्या काळात एकदम फ्रीजमधले किंवा माठातले पाणी, बर्फाचा वापर, आइस्क्रीमसारखे थंडगार पदार्थ यांचा वापर टाळायला हवा. कारण असे गार पदार्थ अचानक सुरू केल्याने शरीरातला अगोदरच वाढलेला कफ आणखीनच वाढतो व त्यामुळे सर्दी, खोकला, ताप असे आजार होण्याची शक्यता बळावते.
फ्रीजमधील अन्नपदार्थसुद्धा तसेच्या तसे न खाता आधी बाहेर काढून ठेवावेत. रूमच्या तापमानानुसारच सेवन करावेत. अर्थात, फ्रीजमधील पदार्थ या ऋतूत टाळलेलेच अधिक चांगले !
गार पदार्थांप्रमाणेच पंख्याचा वारा किंवा एअरकंडिशनचा गारवा यांची इच्छा होणेही स्वाभाविक असते. शरीराला सात्म्य होण्याच्या दृष्टीने व कफप्रकोप टाळण्यासाठी पंख्याचा वारा अंगावर साक्षात लागणार नाही, अशी काळजी घ्यावी. एअरकंडिशनसुद्धा शक्य तितक्या कमी प्रमाणात वापरावे. लहान मुलांना चटकन सर्दी, खोकला होत असल्याने पंखे, ए.सी. यांचा वापर त्यांच्या बाबतीत जपूनच करायला हवा.
या ऋतूत दुपारी ऊन बऱ्यापैकी जाणवत असले, तरी सकाळच्या वेळी मात्र हवेत आल्हाददायक गारवा असतो. म्हणून सकाळी लवकर उठल्यास दिवसभरच्या कामांसाठी उत्साह मिळतो. सकाळी उठून व्यायाम करावा. मात्र, थंडीतल्या व्यायामापेक्षा त्याचे प्रमाण थोडे कमी असावे. अन्यथा अधिक व्यायामाने थकवा येण्याची शक्यता या काळात असते. व्यायामानंतर स्नानासाठी खूप गार किंवा खूप गरम पाणी न वापरता कोमट पाणी वापरावे. स्नानानंतर चंदन, केशर अशा द्रव्यांचा लेप लावावा. विविध प्रकारची अत्तरे, सेंटस्, डिओडोरन्ट्स यांचाही जरूर वापर करावा. या द्रव्यांच्या सुगंधामुळे मनाला दिवसभर तजेला मिळतो. उन्हामुळे येणारा ‘मानसिक’ थकवा त्यामुळे टाळता येतो. दुपारी उन्हामुळे कंटाळा येतो. काही काम करण्याचा फारसा उत्साह राहात नाही. पण म्हणून दुपारी झोपणे या ऋतूत निश्चयाने टाळायला हवे. कारण दुपारी झोपण्याने कफाचे आजार तत्काळ बळावतात. शिवाय पचनाच्या दृष्टीनेही ते हितकर ठरत नाही. हे सगळे पथ्यापथ्य स्वास्थ्याकरता आवश्यक आहे. अन्यथा विविध आजार होण्याची शक्यता असते
डॉ . मयुरेश आगटे