म नुष्य हा निसर्गातलाच एक घटक. साहजिकच निसर्गात होणाऱ्या परिवर्तनाचा आपल्यावर परिणाम घडत असतो. निसर्गातले हे परिवर्तन घडते ते उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूंच्या स्वरूपात ! या ऋतूंमधील बाह्य वातावरणाप्रमाणे आपल्या शरीरातही काही बदल होत असतात. त्यानुसार रोजच्या आचरणात योग्य ते बदल आवश्यक ठरतात. म्हणूनच आतापर्यंत रोजच्या चोवीस तासांतील ‘दिनचर्या’ पाहिल्यानंतर आता आपण ‘ऋतुचर्ये’ कडे वळणार आहोत.
‘ऋतुचर्या’ म्हणजे ऋतूंप्रमाणे करावयाचे आचरण ! याचा विचार करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे बाह्य वातावरणात त्या त्या ऋतूची लक्षणे असणे आवश्यक आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर केवळ जुलै महिना म्हणजे पावसाळा असे म्हणणे चुकीचे ठरेल. तर त्या वेळी पाऊस पडत असला पाहिजे. त्या वेळीसुद्धा ऊनच असेल तर ऋतुचर्येनुसार उन्हाळ्याप्रमाणेच वर्तन करणे इष्ट ठरेल. एकूण ऊन, पाऊस आणि थंडी असे त्या त्या ऋतूप्रमाणे वातावरण असायला हवे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऋतू बदलण्याचा काळ ! यालाच शास्त्रीय परिभाषेत ‘ऋतुसंधी’ असे म्हणतात. एक ऋतू संपून दुसरा ऋतू सुरू होतो, त्या वेळी अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्या काळात सर्दी होणे, ताप येणे, खोकला होणे अशा तक्रारी अनेकदा आढळतात. अशा परिस्थितीत आधीच्या ऋतूमधील आचरण हळू हळू कमी करत, आगामी ऋतूमधील अपेक्षित वर्तन हळूहळू आत्मसात करावे. ऋतुसंधीचा हा काळ ‘साधारणतः’ पहिल्या ऋतूमधले आठ दिवस आणि पुढच्या ऋतूमधले पहिले आठ दिवस असा पंधरवडा मानला जातो.
ऋतुचर्या बघताना आपण विविध सणवार, व्रतवैकल्ये, परंपरा याविषयीसुद्धा चर्चा करणार आहोत. कारण त्यामागे आयुर्वेदाचाच ‘शास्त्रीय’ आधार आहे. या परंपरा, सणवारांच्या ‘स्व’ रूपात हे शास्त्र आजही आमच्या आयुष्याशी किती समरस झालेलं आहे, हे यातून निश्चितपणे कळून येईल. चला तर मग, भारतीय नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच ‘गुढीपाडव्यापासूनच’ या नवीन प्रवासाला सुरुवात करूयात…
डॉ . मयुरेश आगटे