संगीताच्या चेहऱ्यावरूनच ती खूप थकल्यासारखी वाटत होती. माझ्यासमोर बसल्यावर तर तिनं तक्रारींचा पाढाच सुरू केला. अजीर्ण,करपट ढेकरा, पोटात आग पडणे, पित्त होणे, उलट्या अशा सगळ्या तक्रारींनी ती हैराण झाली होती. दोन दिवसांपासून तिला त्रास सुरू होता. दोन दिवसांपासून हे ऐकल्यावर मी तिला एकच प्रश्न विचारला, ‘संगीता, आषाढी एकादशीचा उपवास जोरदार केलास वाटतं.’ माझ्या वाक्यावर तिनं होकारार्थी मान हलवली. ‘पण’ डॉक्टर, त्या दिवशी उपवास असल्यानं उपवासाचेच पदार्थ थोडे जास्त खाल्ले. पण उपवासाचेच पदार्थ घेऊनही त्रास का व्हावा. या प्रश्नाचे उत्तर देताना मला ‘उपवासा’त अपेक्षित शास्त्रीय दृष्टिकोन समजावून सांगावा लागला. आहाराचा विचार करताना आपण आता ‘उपवास म्हणजे नक्की काय ?’ हे बघणार आहोत.
आहार ही आपली मूलभूत गरज आहे. पण गरजेपुरते अन्न घेण्याऐवजी आपण त्याचे रूपांतर करतो ते ‘जिभेचे चोचले पुरवण्यात !’ अति आहाराची हीच सवय मग अनेकविध रोगांची निर्मिती करण्यास कारणीभूत ठरते. अजीर्णापासून स्थौल्य, मधुमेह आदी विकार टाळण्यासाठी प्रमाणात व हितकर आहार घेणे महत्त्वाचे असते आणि त्यासाठी आवश्यक असतो, तो जिभेवर संयम !
नेमका हाच उद्देश साध्य करण्यासाठी ‘उपवास’ ही संकल्पना निर्माण झाली. आपण एरवी हवे तसे खाणे करतोच. पण किमान चतुर्थी, एकादशी या निमित्ताने जिभेवर ताबा ठेवला जावा. या दिवशी उपासाच्या निमित्ताने ‘लंघन’ होणे हे अपेक्षित आहे. अशा लंघनाचे आयुर्वेदात अतिशय महत्त्व आहे. कारण त्याचे अनेक फायदे असतात. यामुळे पचनशक्तीवर एरवी पडणारा ताण टाळला जातो. पचनशक्तीला विश्रांती मिळते. नवीन अन्न न घेतल्यामुळे पूर्वीचे न पचलेले अन्नपदार्थ पचण्यास शरीराला अवकाश मिळतो. शरीराला हलकेपणा येतो. यामुळे उत्साह, स्फूर्ती मिळते. अति आहारामुळे निर्माण होणारे विविध आजार टाळण्यासाठी उपवासाच्या लंघनाचा नेहमीच उपयोग होत असतो. हे सगळे फायदे मिळावेत म्हणूनच ‘उपवास’ही शास्त्रीय परंपरा निर्माण झाली. भारतीयांची धार्मिकता लक्षात घेऊन ‘धार्मिक प्रथा’ या नावाखाली हे शास्त्र आमच्यापर्यंत पोचवण्यात आले एवढेच !
उपवासाचे हे सगळे फायदे मिळण्यासाठी त्या दिवशी कमी प्रमाणात आहार घेणे अपेक्षित आहे. तसेच जो आहार घ्यावयाचा तो पचायलाही हलका असा हवा. ज्यांना ‘कडक’ उपास सहन होतो, अशा लोकांनीच असे उपवास करावेत. अन्यथा थोडा हलका आहार दिवसभरात अधून-मधून घ्यावा.
उपवासाला नेमके कोणते पदार्थ खायला हवेत, हाच खरा प्रश्न आहे. कारण आपण उपवासाचे म्हणून जे पदार्थ घेतो ते साबुदाणा, बटाटा, रताळे, दाणे असे बहुतेक सगळेच पदार्थ पचायला जड आहेत. वरई, वेफर्स, साबुदाणावडा व वर उल्लेखलेले बरेचसे पदार्थ पित्तही वाढवतात. त्यात ‘एकादशी अन् दुप्पट खाशी’ या आपल्या सवयीची भर पडते. यातूनच उपवास केल्यानंतर संगीतासारखे त्रास अनेकांना होतात. या सगळ्या प्रकारात उपवासाचा मुख्य उद्देश बाजूला पडतो. मुळात उपवासाला हेच पदार्थ खावेत, हा नियम कसा आला हे सांगणे अवघड आहे. कदाचित नेहमीच्या पदार्थांमध्ये बदल म्हणून यांची वर्णी उपवासाच्या ‘मेनू’ मध्ये लागली असावी. उपवासामुळे अपेक्षित असणारे आरोग्याचे फायदे मात्र या पदार्थांनी मिळत नाहीत. राजगिऱ्यासारखे पदार्थच काय तो अपवाद ! म्हणूनच प्रचलित उपवासाच्या पद्धतीत आपण बदल करायला हवा. त्यानुसार पचायला हलके असे राजगिरा, नाचणी, साळीच्या लाह्या, मुगाचे पदार्थ, फुलके अशा पदार्थांचा समावेश आहारात करायला हवा. स्वास्थ्य टिकवण्यासाठी हे अतिशय आवश्यक आहे.
पोटाला विश्रांती मिळणे हा उपवासाचा मुख्य उद्देश असल्यामुळे जेव्हा जेव्हा खाण्याचा अतिरेक होईल, त्यानंतर दुसऱ्या दिवशी ‘खरा’ उपवास करायला हरकत नाही. त्यासाठी चतुर्थी, एकादशी यांची वाट बघण्याची गरज नाही. तसेच उपवास आरोग्यास हितकारक असला, तरी उगाचच वारंवार उपवास करणेही योग्य नाही. यामुळे कृशता, थकवा, दौर्बल्य आदी त्रास होतात. नवरात्र, श्रावण अशा व्रतांमध्ये सलग उपास केल्याने प्रकृतीस अपाय घडल्याची उदाहरणे अनेकदा बघण्यास मिळतात. म्हणून स्वत:ची क्षमता ओळखून योग्य ते आचरण करावे. जसा दैनंदिन आरोग्य टिकविण्यासाठी उपवासाचा उपयोग होतो, तसाच अनेक व्याधीत अत्यंत उपयुक्त चिकित्सा म्हणून होतो. आयुर्वेदात यालाच ‘लंघन चिकित्सा’ असे म्हणतात. ताप, अपचन, उलटी, आमवात, स्थौल्य अशा असंख्य रोगांत ही चिकित्सा लाभदायी आहे. अर्थात, व्याधी संदर्भात वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. एकूण रोगी व निरोगी दोन्ही अवस्थांमध्ये उपयुक्त अशी ही शास्त्रीय प्रथा आहे.
उपवासामागील आध्यात्मिक भूमिका मांडण्याची ही जागा नाही. मात्र, ‘आध्यात्मिक साधने’साठी आवश्यक असणारं शरीर हे ‘साधन’ उत्तम ठेवण्याचं सामर्थ्य ‘खऱ्या’ उपवासात नक्की आहे !
डॉ . मयुरेश आगटे