दरवर्षीप्रमाणेच या वर्षीच्या उन्हाळ्यातही उमेश माझ्यासमोर नाक रक्ताने थबथबलेल्या रुमालात धरून बसला होता. उन्हात फिरल्यावर घुळणा फुटणे म्हणजेच नाकातून रक्तस्राव होणे अशी त्याची नेहमीचीच तक्रार होती. उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे हा त्रास त्याला वारंवार होत होता. त्यातच उन्हात फिरताना टोपी न घालणे, रात्री जागरण अशी अपथ्ये या त्रासाला हातभार लावत होती. उन्हाळ्यात असा त्रास अनेकांना होत असतो. उमेश हा त्यांचाच एक ‘रुग्ण’ प्रतिनिधी ! उन्हाळ्यात करावयाच्या आहार-विहाराचा विचार केल्यानंतर आपण या काळातील आजाराविषयी चर्चा करणार आहोत.
उमेशसारख्या ज्या व्यक्तींना घुळणा फुटणे असा त्रास होतो, त्यांना उत्तम औषध म्हणजे ‘दूर्वा’. दूर्वांचा रस अतिशय थंड असल्याने त्याचे थेंब नाकात सोडावेत. आडवे झोपून कपाळावर, नाकावर बर्फ ठेवावा. नाकातला रक्तस्राव थांबवण्यासाठी साखर पाण्यात विरघळवून त्याचे थेंबही नाकात सोडावेत. पद्मकादी तैल, चंद्रकला रस अशी औषधे यासाठी उपयुक्त आहेत. मात्र, त्यांचा उपयोग वैद्यकीय सल्ल्याने करावा. दूर्वांचा रस, साखरेचे पाणी यांचा उपयोग त्रास झाल्यावर करण्यापेक्षा ज्यांना असे त्रास वारंवार होतात, अशा व्यक्तींनी उन्हाळा सुरू झाल्याबरोबर करण्यास हरकत नाही. यात कोणताही अपाय तर नाहीच, उलट अशा आजारांना प्रतिबंध होऊ शकेल.
उन्हाळी लागणे म्हणजेच मूत्र प्रवृत्तीच्या वेळी आग होणे ही अशीच या ऋतूमधील महत्त्वाची तक्रार ! अशा वेळी शहाळ्याचे पाणी, लिंबू सरबत,आवळा सरबत यांचे अधिक प्रमाणात सेवन करावे. आवळा, धमासा, गोक्षुर, नागरमोथा अशी औषधे यासाठी उपयुक्त आहेत. उशीरासव, चंदनासव यांचासुद्धा उपयोग होतो. धने आणि जिरे उकळून तयार केलेले पाणी पिण्यासाठी वापरल्याने मूत्र प्रवृत्तीचे वेळी होणारी आग कमी होते.
हातापायांची आग होणे, संपूर्ण शरीराचा दाह होणे हे लक्षणसुद्धा अनेक लोकांमध्ये आढळते. या लोकांनी दूध, तूप, लोणी यांचा आहारात अधिक वापर. ठेवावा. औषधांमध्ये प्रवाळपिष्टी, गैरिक, ज्येष्ठमध, पद्मकाष्ठ, शतावरी, डाळिंब, फालसा यांचा चांगला उपयोग होत असतो. चंदन, मुलतानी माती, सारिवा या औषधांचा एकत्रित लेप अंगावर लावल्यानेही दाह कमी होतो. अंगाचा दाह कमी होण्यासाठी गुलकंद, मोरावळा असे पदार्थ नियमित घेणेही अत्यंत लाभदायी ठरते.
उष्णतेमुळे होणाऱ्या विकारांपैकी एक म्हणजे त्वचेवर फोड येणे. यालाच बोली भाषेत ‘घामोळ्या’ येणे असे म्हणतात. घामोळ्यांमध्ये आग होणे किंवा खाज सुटणे अशी लक्षणेही काही वेळा आढळतात. अशा वेळी नागरमोथा, वाळा, जीतसाया यांची चूर्णे पाण्यातून त्वचेवर लावावीत. आग खूप होत असल्यास साजूक तूप किंवा शतधौत घृत, लोणी यांचाही लेप उपयुक्त ठरतो. त्वचेवर टाल्कम पावडर सतत लावण्यानेही फायदा दिसून येतो. घामोळ्या आलेल्या व्यक्तींनी अशा औषधांबरोबरच एक महत्त्वाचे पथ्य पाळायला हवे. ते म्हणजे सिंथेटिक कपडे न वापरता सुती कपडे वापरावेत. कारण सिंथेटिक कपडे त्वचेवर घासल्यामुळे अधिकच अपाय होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे केमिकल्स असणाऱ्या साबणाचा वापरही टाळावा.
काही वेळा उन्हात फिरण्याशिवाय पर्याय नसतो. मग सतत उन्हात फिरल्यामुळे ‘त्वचा काळवंडणे’ अशी तक्रार दिसते. अशा वेळी निरनिराळी सनस्क्रीन लोशन्स, जेल यांचा उपयोग करावा. घरातून निघतानाच जर आपण अशी औषधे अंगावर लावून निघालो, तर त्वचेचे उन्हापासून संरक्षण होण्यास निश्चितच मदत होईल. उन्हामुळे त्वचा खरखरीत, कोरडी पडणे किंवा तडकणे यासाठीही या क्रीम्स, लोशन्स इत्यादींचा चांगला उपयोग होऊ शकेल. या तक्रारींसाठी आणखी एक उपयोगी औषध म्हणजे ‘कोरफड’. कोरफडीच्या पानातील गर त्वचेवर लावल्यामुळे तेथील पेशींना स्निग्धता मिळते. त्वचा टवटवीत होते. उन्हाळ्यात अनेकांना अंगावर पित्त उठते. यात त्वचेवर लाल रंगाचे गोलाकार चट्टे उठून खाज सुटते. अशा लोकांनी तत्काळ आमसुलाचे पाणी त्वचेवर लावावे. हे पाणी पिण्यासही वापरावे. खायचा सोडा पाण्यातून त्वचेवर लावावा.
डॉ . मयुरेश आगटे
सूचना :- कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर या लेखात नमूद केलेली सर्व औषधे वापरा.