उन्हाळ्यात सतत तहान लागते. साहजिकच त्याच्या पूर्ततेसाठी आपणांस काही ना काही प्यावेसे वाटते. त्यात मुख्य गरज असते ती ‘पाण्याची’ ! या ऋतूत गार पाणी प्यावेसे वाटते. यासाठी मातीच्या माठात साठवलेले पाणी वापरावे. फ्रीजसारख्या साधनांचा वापर करून गार केलेले पाणीही आपण वापरतो. पण माठातल्या पाण्यापेक्षा हे पाणी पचण्यास जड असते, हे लक्षात घ्यावयास हवे. बर्फासारख्या पदार्थांचा उपयोग केलेले गार पाणी पिण्यासही हरकत नाही. पाण्यात वाळा टाकल्यासही त्याचा थंडावा वाढतो. वाळ्याप्रमाणेच चंदन, गुलाब, मोगरा, जाई-जुई, पारिजातक(स्वच्छ आणि रसायनमुक्त) इत्यादी सुगंधित फुलांचा संस्कार केलेले थंड पाणीही खूपच लाभदायी ठरते.
पाण्याच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना साक्षात विहिरी, तलाव यांमधून पाणी घ्यावे लागते, त्यांनी असे पाणी चांगले उकळून मगच वापरावे. कारण उन्हाळ्यात असे पाणी दूषित असण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. हल्ली पॅकबंद मिळणारे पाणी दर्जेदार असेल तर वापरणे स्वागतार्हच आहे.
तहान भागवण्यासाठी पाण्याप्रमाणेच निरनिराळ्या पेयांचाही उत्तम उपयोग होतो. पन्हे, वाळा, कोकम, लिंबू आदी सरबते, ताजी नीरा, लस्सी, शहाळ्याचे पाणी अशी सगळीच पेये या ऋतूमध्ये वारंवार घ्यावीत. या ऋतूत मिळणारा उसाचा रस हे सुद्धा उत्तम पेय आहे. उसाच्या रसात आले, लिंबू टाकल्याने तो चविष्ट बनतोच, शिवाय तो पचायलाही सुलभ होतो. अर्थात, यापैकी कोणतेही पेय घराबाहेर घेताना त्यांचा दर्जा, त्या ठिकाणची स्वच्छता आदी गोष्टी आरोग्यकारक आहेत याची खात्री करून घ्यावी.
निरनिराळ्या फळांचे रस हेसुद्धा या काळात भरपूर घ्यावेत. टरबूज, कलिंगड, द्राक्षे, मोसंबी, संत्रे, सीताफळ, रामफळ, डाळिंब, केळी अशी फळे रस स्वरूपात किंवा नुसती खाण्यासही हरकत नाही. विविध फळांचे जाम, जेली यांचाही समावेश आहारात असावा. फळांचे स्क्वॅशसुद्धा जरूर सेवन करावेत.
ज्याची नुसती कल्पना केली तरी संपूर्ण उन्हाळा सुसह्य होतो, असे फळ म्हणजे ‘आंबा’! उन्हाळ्यात होणाऱ्या सगळ्या त्रासाची भरपाईच जणू निसर्गानं या फळांच्या राजाच्या रूपात केली आहे. या ऋतूत नुसता आंबा खाणे किंवा आमरस करून घेणे म्हणजे आनंदाची पर्वणीच. आंबा पोळी, आंबा बर्फी, आम्रखंड या स्वरूपातसुद्धा आंब्याचा समावेश करण्यास हरकत नाही. इतर फळांच्या तुलनेत आयुर्वेदानुसार आंब्याचे एक वैशिष्ट्य आहे. शिकरण, फ्रूट सॅलेड याप्रमाणे इतर फळे दुधाबरोबर एकत्र करणे आयुर्वेदास मान्य नाही. कारण अशा पदार्थांचे दीर्घकाल सेवन त्वचारोगांसारखे आजार निर्माण करते. याला अपवाद आहे ‘आंब्याचा’ ! आंबा आणि दूध एकत्र केल्याने मात्र कोणताच अपाय होत नाही. म्हणूनच या काळात मँगो मस्तानी, मँगो कुल्फी अशा विविध पदार्थांचा पुरेपूर आस्वाद घ्यावयास हवा. आंबा हापूस, पायरी आदी विविध प्रकारांत मिळतो. आंब्याचे सगळेच प्रकार खाण्यास योग्य आहेत. यातही हापूसचा आंबा हा अधिक फलदायी आहे. गारवा निर्माण करणारी आइस्क्रीम्स, कुल्फी, मस्तानीसारखी पेयेसुद्धा या काळात अवश्य घ्यावीत.
उन्हाळ्यात जशा या गोष्टी सेवन कराव्यात, त्याचप्रमाणे काही पदार्थ हे चटण्या टाळावेत. टाळायलाच हवेत. या ऋतूत कोरडे पदार्थ उदाहरणार्थ – ब्रेड, मेथी, शेपू, शेवगा अशा भाज्या शरीरातील उष्णता वाढवतात. त्यामुळे त्या वर्ज्य कराव्यात. कारल्यासारखी भाजी शरीरात कोरडेपणा वाढवते. ताकदही कमी करते. डाळीचे पदार्थही असेच काम करतात. म्हणून हे सगळे पदार्थ आहारात नकोत. हिंग, मोहरी, ओवा, दालचिनी असे मसाल्याचे पदार्थही अतिशय उष्ण असल्याने त्यांचा उपयोग कमी प्रमाणात करावयास हवा. असाच आणखी एक वर्ज्य पदार्थ म्हणजे ‘लसूण’ ! मिरची, गरम मसाला, लाल तिखट यांचा वापरही जपून करावा. सुके किंवा भाजलेले मांससुद्धा या ऋतूमध्ये अपायकारक आहे. शिळे पदार्थ, आंबवलेले इडली, डोसा, ब्रेड यांसारखे पदार्थही कटाक्षाने टाळले पाहिजेत. बटाटेवडे, भजी असे तळलेले पदार्थही वर्ज्य करावेत.
डॉ . मयुरेश आगटे